धर्मेंद्र प्रधानांकडून राजीनाम्यानंतर शिवाजीपार्कवर ठाकरे बंधूंची एकत्र हजेरी; ‘जेन-झी’च्या आंदोलनाचे सर्वत्र कौतुक

मुंबई : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्याच्या पार्श्वभूमीवर, मुंबईतील ऐतिहासिक शिवाजीपार्क मैदानावर एका भव्य ‘विजयी जल्लोषाचे’ आयोजन करण्यात आले होते. कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मिळालेल्या यशानंतर आयोजित या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघेही एकाच व्यासपीठावर आले. यावेळी हातात तिरंगा घेऊन उसळलेल्या तरुणाईला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली.
हा लढा निवडणुकीसाठी नाही, देशाच्या भविष्यासाठी
“देशात सुरू झालेला हा संघर्ष कोणत्याही निवडणुकीसाठी नसून भाजपविरोधात भारत असा आहे. धर्मेंद्र प्रधानांकडे राजीनामा मागितल्यानंतर शिवाजीपार्कवर जमलेली ही गर्दी निवडणूक झाल्यानंतरची नसून अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकल्यानंतरची आहे,” असे सांगत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांची मस्ती सहन करणार नाही, असा इशारा दिला. “मोदीजी, तुमच्या लाडक्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढताना तुम्हाला जितक्या यातना झाल्या, त्यापेक्षा कैक पटींनी जास्त वेदना पेपरफुटीमुळे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना झाल्या आहेत. मोदींना मते चोरता येतील, पण माणसे चोरता येणार नाहीत,” असा घणाघात त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता पक्ष फोडण्यापेक्षा देशाच्या कारभारावर लक्ष केंद्रित करावे, अशी उपरोधिक टीका करीत त्यांनी इतर मंत्र्यांच्या कामगिरीवरही ताशेरे ओढले. निर्मला सीतारामन, राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधत त्यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचा आणि अकार्यक्षमतेचा आरोप केला.
राज ठाकरेंकडून तरुणांच्या संघर्षाचे कौतुक
या विजयी जल्लोषात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही तरुणांच्या संघर्षाचे भरभरून कौतुक केले. “या देशातील ‘जेन-झी’ (Gen-Z) पिढी सरकारच्या झिंज्या कशा उपटते, हे या ऐतिहासिक आंदोलनातून दिसून आले,” असे सांगत त्यांनी नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे दुर्दैवाने आत्महत्या केलेल्या २१ विद्यार्थ्यांची नावे वाचून दाखवली आणि उपस्थितांना त्यांना श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमापूर्वी राज ठाकरे यांनी आपल्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानाच्या गॅलरीतून उद्धव ठाकरे, अमित ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्यासह जमलेल्या लक्षावधी तरुणांच्या गर्दीला अभिवादन केले.
शिवजीपार्कमध्ये तरुणाईचा महापूर
या विजयी जल्लोषामध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईसह राज्यभरातून हजारो तरुण-तरुणींनी शिवाजीपार्क परिसरात गर्दी केली होती. शिवसेना भवन ते वीर सावरकर मार्गापर्यंत उसळलेल्या या जनसागरात ‘रंग दे बसंती’ आणि ‘वंदे मातरम’च्या नाऱ्यांनी परिसर दुमदुमून गेला. प्रत्येकाच्या हातात तिरंगा आणि सरकारविरोधातील रोष व्यक्त करणारे फलक होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार, शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. काँग्रेस पक्षाने मात्र या जल्लोषाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.



