राष्ट्रीय

अभिनेत्री अनिता अडवाणी यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का; राजेश खन्नांसोबतच्या नात्याला विवाहाचा दर्जा देण्यास नकार

'लक्झरी लिटिगेशन' अशी टिप्पणी करत याचिका फेटाळली; डिंपल कपाडिया यांच्याशी राजेश खन्नांचा विवाह कायदेशीररीत्या कायम असल्याचा मुद्दा ठरला महत्त्वाचा

नवी दिल्ली : दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्यासोबतच्या लिव्ह-इन नात्याला विवाहाचा कायदेशीर दर्जा मिळावा आणि स्वतःला त्यांची विधवा म्हणून मान्यता मिळावी, यासाठी दीर्घकाळ न्यायालयीन लढा देणाऱ्या अभिनेत्री अनिता अडवाणी यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. गुरुवारी (२९ ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. या प्रकरणाला ‘लक्झरी लिटिगेशन’ असे संबोधत न्यायालयाने याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.

न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. अनिता अडवाणी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या १ एप्रिल २०२६ रोजीच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका स्वीकारण्यास नकार दिला.

अडवाणी यांनी राजेश खन्ना यांच्यासोबत अनेक वर्षे एकत्र वास्तव्य केल्याचा आणि समाजात पती-पत्नीप्रमाणे वावरत असल्याचा दावा केला होता. राजेश खन्ना यांच्या निधनानंतर जुलै २०१२ मध्ये त्यांच्या वांद्रे येथील ‘आशीर्वाद’ बंगल्यातून आपल्याला बाहेर काढण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले होते. या नात्याला विवाहाचे स्वरूप असल्याची कायदेशीर घोषणा व्हावी, अशी त्यांची मागणी होती.

मात्र, राजेश खन्ना यांचा अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्याशी १९७३ मध्ये झालेला विवाह त्यांच्या निधनापर्यंत कायदेशीररीत्या कायम होता. दोघे अनेक वर्षे वेगळे राहत असले, तरी त्यांचा घटस्फोट झाला नव्हता. त्यामुळे अडवाणी आणि खन्ना यांचे नाते कायद्याच्या दृष्टीने विवाहासारखे मानता येणार नाही, असा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाने काढला होता. सर्वोच्च न्यायालयानेही या निर्णयात हस्तक्षेप केला नाही.

दरम्यान, अडवाणी यांनी २०१५ मध्ये दाखल केलेल्या दिवाणी दाव्यात स्वतःला राजेश खन्ना यांच्या विधवा म्हणून मान्यता देण्यासह अन्य दिलासे मागितले होते. यापूर्वी २०१३ मध्ये त्यांनी कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत डिंपल कपाडिया आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात तक्रारही दाखल केली होती. मात्र, त्या प्रकरणातही त्यांना अपेक्षित दिलासा मिळाला नव्हता.

सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निर्णयामुळे राजेश खन्ना यांच्यासोबतच्या नात्याला विवाहाचा दर्जा मिळावा, यासाठी अनिता अडवाणी यांनी केलेल्या दीर्घ न्यायालयीन प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page