महाराष्ट्र

रत्नागिरीत दोन भीषण अपघात; अंजणारीत ३८ प्रवासी जखमी, आंबा घाटात एसटीची टेम्पोला धडक

अंजणारीतील आठ जणांची प्रकृती गंभीर; आंबा घाटातील अपघातात वाहकासह प्रवासी जखमी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) पहाटे दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या बस अपघातांमध्ये अनेक प्रवासी जखमी झाले. मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा तालुक्यातील अंजणारी पुलावर भरधाव ट्रकने खासगी आराम बसला मागून धडक दिल्याने बस उलटली. या दुर्घटनेत ३८ प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. दुसरीकडे, रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटात पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला एसटी बसने धडक दिली.

अंजणारी पुलावर पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. विरार येथून मालवणच्या दिशेने जाणाऱ्या खासगी आराम बसला गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने मागून धडक दिली. धडकेनंतर बस रस्त्यावर उलटली आणि सुमारे २०० मीटरपर्यंत फरफटत गेली. बसमधील काही प्रवासी आत अडकले होते. स्थानिक नागरिक, पोलीस आणि रत्नागिरी एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य करून त्यांना बाहेर काढले. जखमींना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयासह पाली आणि लांजा येथील रुग्णालयांत दाखल करण्यात आले. आठ गंभीर जखमींवर रत्नागिरी येथे उपचार सुरू आहेत.

दरम्यान, आंबा घाटातील गोवरेवाडी बसथांब्याजवळ पहाटे पाचच्या सुमारास दुसरा अपघात झाला. टायर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला धाराशिव-लांजा मार्गावरील एसटी बसने मागून धडक दिली. या अपघातात वाहक रोकडेश्वर तोटेवार यांच्यासह फुलाजी बत्तलवाड आणि वैष्णवी बत्तलवाड हे जखमी झाले. साखरपा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमींना स्वतःच्या वाहनातून प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. पुढील उपचारांसाठी त्यांना रत्नागिरी येथे हलविण्यात आले.

अंजणारी पुलावरील अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील गोव्याच्या दिशेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून एकेरी वाहतूक सुरू केली. दोन्ही अपघातांची संबंधित पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page