अहिल्यानगरमध्ये रिलायन्स स्मार्ट बाजार चोरीचा उलगडा; ८.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर : रिलायन्स स्मार्ट बाजारच्या सर्व्हररूमचे गज आणि काच फोडून तिजोरीतील चार लाख ६६ हजार ३९० रुपयांची रोकड चोरल्याचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी दोन वर्षांपूर्वी याच ठिकाणी काम करणाऱ्या दोन माजी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून आठ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्मार्ट बाजारच्या सर्व्हररूममध्ये प्रवेश करून चोरट्यांनी तिजोरीतील रोकड लंपास केली होती. या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. तपासादरम्यान याच आस्थापनात पूर्वी काम केलेल्या दोन माजी कर्मचाऱ्यांचा या चोरीतील सहभाग समोर आला. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली.
या कारवाईत पोलिसांनी एकूण आठ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासामुळे चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा झाला. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पुढील तपास सुरू आहे.



