पुणे शहर

पेपर सेट करणाऱ्याच जेव्हा रक्षक ऐवजी भक्षक बनतात! पुण्यातून तिसरी अटक, CBI तपासात खळबळजनक खुलासे

विशेष प्रतिनिधी/महाराष्ट्र मिशन 

पुणे : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट’ (NEET-UG) परीक्षा पेपरफुटी प्रकरणात आता केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) तपासाला मोठी गती आली असून, याचे ‘पुणे कनेक्शन’ कमालीचे गडद झाले आहे. या रॅकेटमध्ये थेट राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या (NTA) परीक्षा पॅनेलवर असलेल्या आणि पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या पुणे येथील प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना सीबीआयने अटक केली आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली असून, पुण्यातून आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या तीनवर पोहोचली आहे.

तज्ज्ञ’ प्राध्यापिकाच निघाली सूत्रधार

मनीषा मांढरे या पुण्यात जीवशास्त्र (Botany/Zoology) विषयाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. अत्यंत गंभीर बाब म्हणजे, एनटीएकडून (NTA) त्यांची ‘विषय तज्ज्ञ’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि त्या मुख्य पेपर तयार करणाऱ्या प्रक्रियेचा भाग होत्या. ज्यांच्यावर परीक्षेची गोपनीयता राखण्याची जबाबदारी होती, त्यांनीच विश्वासघात केल्याचे तपासात समोर आले आहे. मांढरे यांच्या आधी पुण्यातून पी. व्ही. कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे यांनाही सीबीआयने बेड्या ठोकल्या आहेत.

घरातच भरायचे ‘डिक्टेशन’ वर्ग; हुबेहूब प्रश्नपत्रिकेचा पर्दाफाश

सीबीआयच्या तपासातून अत्यंत धक्कादायक आणि डोळे पांढरे करणारी माहिती समोर आली आहे. या टोळीने पुण्यात राहत्या घराचा वापर ‘गुप्त कोचिंग क्लास’ चालवण्यासाठी केला होता. परीक्षा होण्यापूर्वी या विशेष वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना बोलावून प्रश्न आणि त्यांची उत्तरे तोंडी सांगून (Dictation द्वारे) लिहून दिली जात होती. तपासादरम्यान, या वर्गांमध्ये लिहून दिलेले प्रश्न आणि NEET-UG ची मूळ प्रश्नपत्रिका यांची पडताळणी केली असता, ते प्रश्न ‘तंतोतंत’ जुळल्याचे निष्पन्न झाले आहे. म्हणजेच, मूळ पेपरमधील प्रश्न थेट विद्यार्थ्यांपर्यंत आधीच पोहोचवले गेले होते.

नफेखोरी’साठी लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ

या विश्लेषणातून स्पष्ट होते की, हे केवळ एका केंद्रापुरते मर्यादित रॅकेट नसून, परीक्षा यंत्रणेच्या सर्वोच्च पातळीवर लागलेली ही वाळवी आहे. कोचिंग क्लास आणि पेपर सेट करणाऱ्या तज्ज्ञांचे हे अभद्र युती (Nexus) असल्याचे दिसते. देशभरातून या घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

पेपरफुटीचा हा संपूर्ण प्रकार अत्यंत पद्धतशीर आणि संघटित गुन्हेगारीचा भाग असल्याने केंद्र सरकारने आधीच झालेली परीक्षा रद्द केली आहे. लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागल्यामुळे सीबीआय आता या रॅकेटच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहे. आगामी काळात पुण्यातून आणि देशाच्या इतर भागांतून आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page