लेख: फडणवीस विरोधकांना पुन्हा संधी नाही; महाराष्ट्रही आता थांबणार नाही!

‘असाही एक शांत सरळ पंत।
निंदा केली ओकले गरळ जंत ॥
तरी ना मनी मरगळ ना खंत ।
म्हणूनच लोकांनी केले पसंत ॥”
अशी एक चारोळी ऐतिहासिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल समाजमाध्यमांतून फिरते आहे. खरे तर या ४ ओळींनी फडणविसांविषयी इतके काही सांगितले आहे की आणखी काही सांगण्याची गरज नाही.
परवाच्या शपथविधीसाठी जमलेल्या अथांग जनसागराला पाहून फडणविसांना आनंद तर झालाच पण खूप मोठ्या, जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या जबाबदारीची जाणीवही झाली. यश केवळ उत्सव साजरे करण्यासाठी नाही याची जाणीव मला झाली असे त्यांनी दूरदर्शनच्या मुलाखतीत म्हटले आहे. गेल्या अडीच वर्षांपासून विरोधकांनी आणि त्यांच्या ट्रोलर्सनी त्यांना टार्गेट केले. असभ्य भाषेत टीका केली. मात्र फडणवीस शांत राहिले. जनतेमध्ये त्यांच्या विषयी सहानुभूतीने वातावरण निर्माण झाले. स्वतः फडणवीस यांनी विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी हिंमत बांधली आणि त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसून आला. फडणवीस यांच्या मनात विरोधकांविषयी कोणतीही सूड भावना नाही तर, जिंकण्यासाठी इच्छा निर्माण करण्यासाठी ते टीकाकारांना धन्यवाद देतात. त्यांच्या संयमी , संतुलित व्यक्तीमत्वाच्या वैशिष्ट्यांमागे आणि ‘ मी परत येईन ‘ या प्रचंड आत्मविश्वासाच्या मागे काय दडले आहे? या हिमालया एवढ्या उत्तुंग नेतृत्वाच्या जडणघडणीत नेमके काय आहे याचा शोध घेतला पाहिजे. तो नव्या पिढीतून राजकारणात येणाऱ्यांसाठी आवश्यकही आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्र आणि राज्यातील भाजपमध्ये सक्षम संघटक आणि कार्यक्षम प्रशासक म्हणून ओळखले जातात. कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या ५ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन विकास प्रकल्पांना गती दिली आणि पुढे नेले. त्यामुळे त्यांच्या संघटनात्मक कौशल्याचे त्यांचे पक्ष आणि त्यांच्या समर्थकांकडून कौतुक होत असतानाच, ते त्यांच्या प्रशासकीय कार्यक्षमतेसाठी आणि त्यांच्या कृती आणि धोरणांसाठी देखील ओळखले जातात.
उपमुख्यमंत्री असतानाही त्यांनी विकासपुरुष म्हणून आपली प्रतिमा कायम ठेवली, त्यासाठी लोकांनीही भाजपला बंपर मत देऊन बक्षीस दिले. देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आहेत, जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते नंतर काही वर्षे उपमुख्यमंत्री राहिल्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले आहेत. गुरुवारी शपथविधीची औपचारिकताही पूर्ण झाली.
तळागाळातील नेता, सक्षम संघटक आणि कार्यक्षम प्रशासक अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामे आणि प्रशासकीय सुधारणा झाल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेचे आणि व्यवस्थापन कौशल्याचे कौतुक होत आहे.
फडणवीस यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या नागरी विकासाला नवी दिशा मिळाली. मुंबई मेट्रो, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, स्मार्ट सिटी योजना यासारखे प्रकल्प सुरू करण्यात आले. कृषी आणि ग्रामीण विकासही त्यांच्या नेतृत्वाखाली झाला. त्यांच्या कार्यकाळात शेतकरी कर्जमाफी योजना, जलयुक्त शिवार योजना अशा योजना सुरू झाल्या, त्यामागे शेतकऱ्यांना दिलासा देणे आणि पाण्याची समस्या सोडवणे हा उद्देश होता. या पुढील काळात फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जी कामगिरी करेल ती गुजरातलाही मागे टाकणारी असावी अशी मराठी जनांची इच्छा आहे.
कार्यक्षम प्रशासकीय कार्यशैली
राजकारणातील स्वच्छ प्रतिमा आणि कार्यक्षम प्रशासकीय कार्यशैलीमुळे ते एक तगडे नेते मानले जातात. फडणवीस यांनी ३० जानेवारी २०१५ रोजी ‘मुंबई नेक्स्ट’ लाँच केले. तो देशाच्या आर्थिक राजधानीचे जागतिक आर्थिक आणि मनोरंजन केंद्रात रूपांतर करण्याचा रोडमॅप होता. फेब्रुवारी मध्ये फडणवीस सरकारने प्रकल्पाअंतर्गत एक हाय -प्रोफाइल परिषद आयोजित केली होती, ज्यामध्ये टाटा सन्स लिमिटेडचे अध्यक्ष सायरस मिस्त्री, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि इतर प्रमुख व्यावसायिक नेते उपस्थित होते.
सप्टेंबर २०१५ मध्ये फडणवीस यांनी नागपुरात महाराष्ट्र क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीमचे (CCTNS) उद्घाटन केले, ज्यामुळे पोलिस दल डिजिटल करण्याच्या राज्याच्या महत्वाकांक्षेला चालना मिळाली. राज्याचे गृहमंत्री असलेले फडणवीस म्हणाले होते की, सीसीटीएनएस उपक्रमामुळे राज्यातील सर्व पोलीस ठाणी ऑनलाइन आणि पेपरलेस होणार आहेत. या. अंमलबजावणीनंतर, भारतातील पहिले क्राइम-ऑफेंडर ट्रॅकिंग नेटवर्क (CCTNS) स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य बनले.
२०१६ मध्ये, त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात, महाराष्ट्राने ७० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक डिजिटल उपक्रम सुरू केले. ज्याअंतर्गत सायबर प्रयोगशाळा आणि ग्राम डिजिटलायझेशन सुरू करण्यात आले. फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात, महाराष्ट्र शासनाने नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन वे हा एक उपक्रम प्रस्तावित केला. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी या पायाभूत सुविधांची उभारणी सुरू करण्यात आली. हा महामार्ग मुंबई आणि नागपूर तसेच नियोजित नवीन शहरांदरम्यान सुरक्षित आणि जलद वाहतूक सक्षम करण्यासाठी डिझाइन केलेला आहे. आगामी काळात एक्स्प्रेसवे प्रवासाचा वेळ ८ तास कमी करेल. या द्रुतगती मार्गात इलेक्ट्रिकल वाहनांसाठी (EVs) चार्जिंग स्टेशन असतील. समृद्धी महामार्ग येत्या काही वर्षांत रोजगार आणि रोजगाराची नवीन दारे उघडेल, ज्यामुळे ग्रामीण आणि शहरी दरी कमी होईल. सरकारने या महामार्गाचे नामकरण आता “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग” असे केले आहे.
२०१८ मध्ये, फडणवीस यांनी महाराष्ट्रातील अनाथांच्या शिक्षणासाठी आणि सरकारी नोकऱ्यांसाठी खुल्या प्रवर्गात १ टक्का सरकारी आरक्षण जाहीर केले. असे धोरण करणारे महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही अमृता करवंदे या अनाथ महिलेला नोकरी नाकारण्यात आल्यानंतर फडणवीस यांनी हे धोरण सुरू केले होते.
२०१४ ते २०१९ दरम्यान समृद्धी महामार्ग, अटल सेतू, कोस्टल रोड, जलयुक्त शिवार योजना, मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प सुरू करण्यात आले. सारथी/बार्टी/टार्टी/अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांसारख्या संस्थांची परिस्थिती अधिक भक्कम झाली. १ रुपयात पीक विमा, मागेल त्याला सौर पंप, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढविणे अशीही तळागाळापर्यंत चर्चा झालेली कामे त्या सरकारने केली.
२०१९ ते २०२२ मध्ये विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ असताना फडणविसांनी जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका पार पाडली. वीज बिलाच्या प्रश्नावर आक्रमक धोरण घेतले. कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्राचा दौरा केला. आरोग्य खात्यातील गैर कामांना कडाडून विरोध केला. शिक्षण, आरोग्य, उद्योग अशा विविध क्षेत्रांच्या विकासासाठी प्रयत्न केले. जनहिताच्या विविध प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले.
२०२२ ते २४ दरम्यान उपमुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ असताना शेतकऱ्यांना मोफत वीज, लाडकी बहिण योजना, महिलांना एसटी प्रवासात ४० टक्के सूट, लेक लाडकी योजना , नमो शेतकरी महासन्मान योजना, अन्नपूर्णा योजनेत प्रत्येक कुटुंबाला ३ मोफत गॅस सिलेंडर अशा योजना फडणवीस आणि सहकाऱ्यांनी सुरू केल्या.
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदें, अजित पवार यांच्या सरकारने अडीच वर्षांपूर्वी सुत्रे हाती घेतली. त्यानंतर अनेक योजना सुरू करुन वेगाने त्या राबवल्या. या तीनही पक्षांना वेगवान काम करण्याचा अनुभव आहे. भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. आता जुन्या योजना गतिमान होतील. नव्या योजना सुरू होतील. नदीजोड प्रकल्प ही त्यातली महत्वाकांक्षी योजना आहे. ती यशस्वी झाली की महाराष्ट्र दुष्काळ मुक्त होईल. अपारंपारिक ऊर्जा म्हणजे ग्रीन एनर्जी वर विशेष भर पुढच्या काळात दिला जाणार आहे. सुमारे ५२ टक्के वीज सौर ऊर्जेचा वापर करुन निर्माण केली जाईल. त्याचा मोठा उपयोग उद्योग आणि शेतीसाठी होऊन मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. नदीजोड प्रकल्प आणि हरीत उर्जा या दोन प्रकल्पांमागे ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही ‘ या घोषवाक्यामागे हेच प्रकल्प आहेत.
गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्राला अनेक प्रश्नांनी वेढलेले आहे. भक्कम आधार नसल्याने फडणवीस यांना मर्यादा आल्या. आता ते महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते आणि शासक असल्याने वाढती गुन्हेगारी, महानगरांमध्ये कोसळलेली, बेशिस्त वाहतूक, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे, दूध उत्पादकांचे प्रश्न, महिलांची सुरक्षितता अशा आव्हानांना कणखरपणे सामोरे जाऊ शकतील. पुढच्या काळात सामान्य माणसाला मोकळा श्वास घेण्यासाठी दिलासादायक वातावरण निर्माण होईल अशी आशा करायला हरकत नाही.



