आरोग्यठाणेमहाराष्ट्रमुंबईसामाजिक

कबुतरांना मारणे म्हणजे भगवान शंकरांवर हल्ला करण्यासारखे

जैन धर्मगुरूंचे वादग्रस्त वक्तव्य

मुंबई : दादर येथील कबुतरखान्यावरून कबुतरांना खाद्य देण्यावर बंदी घालण्याच्या निर्णयाविरोधात जैन मुनींनी अत्यंत वादग्रस्त आणि आक्रमक वक्तव्य केल्याने नवा वाद उभा राहिला आहे. ‘कबुतरांना मारणे म्हणजे भगवान शंकरांवर हल्ला करण्यासारखे आहे,’ असे एका मुनींनी म्हटले आहे, तर ‘एखादा व्यक्ती कबुतराच्या विष्ठेमुळे मेला, तरी काही फरक पडत नाही’ असे धक्कादायक विधान दुस-या मुनींनी केले आहे.

कबुतरांच्या विष्ठेमुळे होणा-या श्वसनविकारांच्या धोक्याकडे दुर्लक्ष करत जैन मुनींनी डॉक्टरांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, मी तर डॉक्टरांना देखील मूर्ख म्हणतो. एखाद्या व्यक्तीचा जीव गेला, तर तो काही कबुतराच्या विष्ठेमुळे गेला का? त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत फडणवीसांना आम्ही मोठे केले, असे वक्तव्य केले. तसेच, कबुतरखाना हटवण्यात सरकारची मिलीभगत असल्याचा आरोपही केला. कबुतरांसाठी आम्ही शस्त्र देखील हाती घ्यायला तयार आहोत, असा थेट इशाराही एका जैन धर्मगुरूंनी दिला.

आरोग्य खाते बंद करूया का? कायंदे

शिवसेना (शिंदे गट) नेत्या आमदार मनीषा कायंदे यांनी या वक्तव्यांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी जैन मुनींच्या विधानांना ‘वडाचे पान पिंपळाला जोडणे’ असे संबोधले. त्या म्हणाल्या, हा अतिरेकीपणा आहे. या वक्तव्यावर आता जैन डॉक्टरांनी प्रतिक्रिया दिली पाहिजे. जर हेच खरे असेल, तर आपण सगळे आरोग्य खाते बंद करूयात आणि सर्व डॉक्टरांना घरी बसवूयात. आता तब्येत बिघडली तर भोंदू बाबांकडे जायचे काय?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page