लेखसंपादकीय अग्रलेखसामाजिक

राजेशाही थाटाला सोकावलेत छोटे मोठे लोकप्रतिनिधी, जनतेच्या नशिबी मात्र निकृष्ट दर्जाच्याच सुविधा

विधान भवनातील कॅन्टीन मध्ये तथाकथित निकृष्ट अन्न मिळाल्याने कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांना चोप देणारे संजय गायकवाड आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट या दोन संजय नामक लोकांमुळे सुसंस्कृत आणि निस्वार्थी भावनांचा पराजय झाला आहे. विद्यमान राजकारण कुठल्या थराला गेले आहे याचीही जाणीव या दोघांसह वाटेल त्या वाईट थराला जाणाऱ्या राजकीय नेत्यांमुळे होते आहे. नीतेश राणे, वाल्मिक कराड, संजय शिरसाठ, संदीपान भूमरे ,तानाजी सावंत,गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार असे एकेक नग आपापल्या दबंगगिरीमुळे अधूनमधून चर्चेत असतात. त्यामुळे महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षाची गुंडगिरी सुरू असावी असेच चित्र निर्माण झाले आहे. लायकी नसताना पदे व सत्ता मिळाली की दादागिरी, भ्रष्टाचार, घराणेशाही, खोटा बडेजाव यांच्यामुळे माणूस कसा मस्तवाल होतो त्याचे उदाहरण ही सारी तथाकथित लोकप्रतिनिधी मंडळी.

 

नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये शिंदे सेनेचे आमदार गायकवाड एखाद्या गुंडासारखे त्या कर्मचाऱ्याला मारताना दिसत आहेत. का तर म्हणे त्यांना शीळे अन्न खायला दिले. गोर गरीब जनतेला मिळणारे गहू , तांदूळ किती दर्जेदार असतात हे पण या गायकवाड साहेबांनी बघायला हवे.

दुसरीकडे शिंदे शिवसेनेचेच‌ मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नुकतीच एक नोटीस पाठवली. अशातच आता त्यांच्या हातात सिगारेट, खोलीत एक मोठी बॅग असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिरसाट यांची संपत्ती गेल्या ५ वर्षात १० पटीने वाढली. २०१९ पर्यंत त्यांच्याकडे तीन कोटी रुपये होते. २०२४ मध्ये त्यांच्याकडे ३४ कोटी रुपये आले आहेत. मे २०२५ पर्यंत त्यांची मालमत्ता सुमारे ५० कोटी रुपयांच्या पुढे गेली असे म्हणतात. उत्पन्नाचा हा आश्चर्यकारक मार्ग जाणून घेण्यासाठी आयकर विभागही उत्सुक आहे. सामान्य जनतेलाही याविषयी उत्सुकता आहे. विरोधक ज्या पद्धतीने शिरसाटांना उघडे पाडण्यासाठी डावपेच करत आहेत त्यामुळे कोटीच्या कोटी येतात कुठून हे भांडे फुटून सरकारची अब्रू जाऊ शकते. त्यामुळे ही चौकशी खरोखरच होईल की नाही हीच शंका आहे.

विदर्भाच्या बुलढाण्यातून संजय गायकवाड दोन वेळा आमदार झाले. ते यापूर्वी शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. २०१९ मध्ये त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांचा पराभव केला. हर्षवर्धन सपकाळ सध्या प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आहेत. गायकवाड २०२२ मध्ये शिवसेनेच्या शिंदे गटात सामील झाले. शिवजयंती मिरवणुकीत गायकवाड एका तरुणाला पोलिसांच्या लाठीने मारहाण करतानाचा एक व्हिडिओ समोर आला होता. आरक्षण व्यवस्थेवरील राहुल गांधींच्या विधानानंतर त्यांची जीभ कापणाऱ्याला ११ लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा याच गायकवाडांनी केली होती. हेच गायकवाड उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचे सदस्य होते, तेव्हा त्यांनी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक हल्ला चढवला. ते म्हणाले होते की त्यांना फडणवीसांच्या गळ्यात कोरोना व्हायरस घालायचा होता. आता तेच गायकवाड फडणविसांचे गुणगान करतात.

छत्रपती संभाजीनगरमधील वादग्रस्त विट्स हॉटेल लिलावाच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिल्यानंतर आयकर विभागाकडून संजय शिरसाट यांना नोटीस बजावण्यात आली. खुद्द संजय शिरसाट यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात याबाबत ‘आता काळा पैसा चालणार नाही ‘ असे उद्गार उघडपणे काढले. एखाद्या मंत्र्याला आयकर विभागाकडून थेट नोटीस मिळणे ही दुर्मीळ बाब मानली जात आहे.

शेतकऱ्यांचे जगण्याचे प्रश्न, शिक्षण, वैद्यकीय क्षेत्रात केली जाणारी लूट, शिक्षणाचे झालेले खासगीकरण, तसेच सरकारी कार्यालयात होणारी गोरगरीब जनतेची पिळवणूक, भ्रष्टाचार, महानगरांचा बकालपणा, प्रचंड लोकसंख्या, अपुरी प्रशासन व्यवस्था या विविध आणि अतिमहत्वाच्या गोष्टी सोडून राजकारणी महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करत आहेत. कोणी येते आणि कायदा व सुव्यवस्था बासनात बांधून ठेवते. असेच जर सुरू राहिले तर या पावन भूमी महाराष्ट्राचा बिहार होण्याला जास्त वेळ लागणार नाही.

चांगला पदार्थ मिळाला नाही म्हणून कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या आमदारांनाही भविष्यात असा मार देणे आवश्यक आहे. कारण यांच्या कमिशन खोरीमुळे निकृष्ट रस्ता, निकृष्ट पूल, निकृष्ट शासकीय बिल्डिंग, निकृष्ट शालेय पोषण आहार चालूच आहेत. भविष्यात निकम्मे आमदार आणि बिनकामाचे मंत्री यांना रस्त्यांवर, गावात, चौकात, किंवा जिथे सापडतील तिथे निर्वस्त्र करून बेदम चोप दिला पाहिजे. या आणि अशा, समाज माध्यमातून उमटलेल्या प्रतिक्रिया प्रातिनिधिक आहेत. सामान्य माणसाला भोगाव्या लागणाऱ्या अराजकेतून त्या उमटल्या आहेत. आणि स्वाभाविकही आहेत.

पुण्यात काय किंवा मुंबई, नाशिक, नागपूर सह अनेक शहरांत मुलभूत नागरी समस्या कोलमडलेल्या आहेत. पुण्यात तर परिस्थिती आवरण्यापलिकडे भीषण झाली आहे.‌ वाहतुकीच्या सैरावैरा राक्षसामुळे रोज लोक बळी पडत आहेत. सामान्य माणसाला सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर ते रात्री घरी परतेपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने गुदमलेल्या अवस्थेत जगावे‌ लागत आहे. अशातच राजकीय सामाजिक वातावरण चिघळलेले आहे. सुखी, समाधानी मनोभावना शोधावी लागत आहे

साऱ्या समाजात संतापाची कोंडलेली वाफ तयार झाली आहे. तिचा एक दिवस विस्फोट होऊन भयंकर परिणाम होऊ शकतात. त्यात पहिल्यांदा शोधले जातील ते लोकप्रतिनिधीच. अशा वेळी त्यांचे काय हाल होतील याची कल्पना केलेली बरी. खरेतर अशी वेळ येऊ नये. ती येऊ नये यासाठी मंत्री संत्री खासदार आमदार किंवा नगरसेवकांनी आताच जागे झाले पाहिजे. आपण लोकसेवक आहोत, राजे महाराजे नाही याचे भान ठेवले पाहिजे. अन्यथा काही खरे नाही!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page