संपादकीय अग्रलेख

लेख: बापाने विकली जमीन, पोराच्या हाती ‘बेरोजगारीचा’ कागद: महाराष्ट्रातील तरुण पिढीची विदारक कहाणी!

आज महाराष्ट्राच्या मातीत एक अत्यंत भयानक आणि मन सुन्न करणारं वास्तव निर्माण झालं आहे. ग्रामीण भागातील ज्या आई-वडिलांनी स्वतःच्या पोटाला चिमटा घेतला, सुक्या भाकरीवर दिवस काढले, बँकांचे उंबरठे झिजवून कर्ज काढली आणि प्रसंगी सोन्यासारखी शेतजमीन विकली, ती केवळ आपल्या मुला-मुलींना शहरात पाठवून लाखो रुपये खर्च करून उच्च शिक्षण देता यावं म्हणून. पण आज जेव्हा या पोरांच्या हातात पदवीचे कागद आलेत, तेव्हा बाजारात त्यांच्या घामाची आणि शिक्षणाची किंमत कवडीमोल झाली आहे. राज्यातील लाखो सुशिक्षित तरुण-तरुणी नोकरीच्या शोधात उन्हा-तान्हात वणवण भटकत असून त्यांच्या वाट्याला फक्त आणि फक्त नैराश्य येत आहे.

ज्या क्षेत्राचे शिक्षण घेण्यासाठी आई-वडिलांनी लाखो रुपये शैक्षणिक संस्थांच्या घशात घातले, त्याच क्षेत्रात आज साधी १०-१२ हजारांची नोकरी मिळणे दुरापास्त झाले आहे. घराची बिकट आर्थिक परिस्थिती, डोक्यावर असलेले कर्जाचे डोंगर आणि समाजाचे टोमणे यामुळे शेवटी या तरुण पिढीला परिस्थितीपुढे गुडघे टेकावे लागत आहेत. आज महाराष्ट्रात धक्कादायक चित्र निर्माण झाले असून एमबीए, इंजिनिअरिंग आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले तरुण नाईलाजाने डिलिव्हरी बॉय, कॉल सेंटरमधील कर्मचारी, हॉटेलमध्ये वेटर किंवा सुरक्षा रक्षक म्हणून भेटेल ते काम करत आहेत. हे केवळ तरुणांचे अपयश नसून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचे आणि शासन व्यवस्थेचे ढळढळीत अपयश आहे.

हा भ्रष्टाचार केवळ खाजगी नोकऱ्या किंवा स्पर्धा परीक्षांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर थेट माणसाचा जीव वाचवणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रापर्यंत पोहोचला आहे. गरिबाच्या, कष्टकऱ्याच्या हुशार मुलाने रात्रंदिवस एक करून, डोळ्यात तेल घालून अभ्यास करायचा आणि ‘नीट’ (NEET) परीक्षेत उत्तम गुण मिळवून डॉक्टर बनण्याचं आणि पुण्यात-मुंबईत शिकण्याचं स्वप्न पाहायचं, पण या स्वप्नांचा गळा घोटला जातोय तो पैशांच्या नंगानाचामुळे. एका बाजूला गरीब, सर्वसामान्य कुटुंबातील मुलं वर्षानुवर्षे स्वतःला खोलीत कोंडून घेऊन, क्लासेसची अवाढव्य फी कशीतरी भरून प्रामाणिकपणे अभ्यास करतात, तर दुसऱ्या बाजूला काही गर्भश्रीमंत, राजकारणी आणि उद्योगपती आपले पैसे फेकून, भ्रष्ट दलाल आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून परीक्षेआधीच पेपर विकत घेतात. ज्या मुलांनी कधी पुस्तकाला नीट हातही लावला नसेल, ती मुलं पैशाच्या जोरावर ९९ पेक्षा जास्त पर्सेन्टाईल मिळवून देशातील नामांकित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सीट लाटतात. हा केवळ गुणांचा घोळ नसून प्रामाणिकपणाचा थेट खून आहे. पैशाच्या जोरावर अभ्यास न करता डॉक्टर बनू पाहणारी ही पिढी उद्या देशाच्या आरोग्याशी खेळणार असून असा संतप्त सवाल आज प्रत्येक गरीब पालक विचारत आहे.

खाजगी क्षेत्रात हक्काची नोकरी मिळत नाही आणि वैद्यकीय क्षेत्र गरिबांच्या आवाक्याबाहेर गेलंय, म्हणून ग्रामीण भागातील गरिबांची, शेतकऱ्यांची पोरं स्पर्धा परीक्षांकडे म्हणजेच एमपीएससी, तलाठी, पोलीस भरती, सरळसेवा यांकडे वळतात. पुण्याच्या शनिवार पेठ, सदाशिव पेठेत किंवा इतर शहरांच्या गल्लीबोळात, डबा लावून, एका लहानशा खोलीत चार-चार जण राहून हे तरुण दिवस-रात्र लायब्ररीत अभ्यास करतात, कारण त्यांच्या डोळ्यात एकच स्वप्न असतं की एक दिवस सरकारी नोकरी मिळवून बापाच्या कष्टाचं चीज करायचं.

पण इथेही त्यांच्या नशिबी क्रूर थट्टाच लिहिलेली असते. वर्षानुवर्षे अभ्यास करायचा, फॉर्म फीसाठी पैसे गोळा करायचे, आणि परीक्षेचा दिवस उजाडला की अचानक पेपर फुटल्याची बातमी समोर येते. एका रात्रीत काही भ्रष्ट दलाल व अधिकाऱ्यांच्या पैशांच्या हव्यासापोटी लाखो प्रामाणिक तरुणांच्या स्वप्नांचा चक्काचूर होतो. परीक्षा रद्द होतात, वर्षानुवर्षे कोर्टात खटले चालतात, ज्यामध्ये या ग्रामीण तरुणांचे वय निघून जाते आणि त्यांच्या उमेदीच्या वर्षांना पार विरजण लागते.

हा प्रश्न फक्त नोकरीचा किंवा प्रवेश परीक्षेचा उरलेला नसून तो तरुणांच्या जगण्याचा झाला आहे. शहरात पदरी निराशा घेऊन जेव्हा हा तरुण गावात परततो, तेव्हा गावातही त्याच्यासाठी काही उरलेलं नसतं. शेती आधीच निसर्गाच्या लहरीपणावर आणि हमीभावाच्या अभावामुळे तोट्यात चाललीय आणि ग्रामीण भागात उद्योगधंद्यांचा पत्ता नाही. अशा कोंडीत सापडलेला सुशिक्षित तरुण आज चिडचिड, नैराश्य आणि व्यसनाधीनतेच्या खाईत लोटला जात आहे.

शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या शिक्षण संस्था आणि केवळ निवडणुकांचे राजकारण करणाऱ्या राज्यकर्त्यांना आज या तरुणांचा आक्रोश ऐकू येत नाही. ‘नीट’ असो वा ‘एमपीएससी’, पेपरफुटी आणि भ्रष्टाचारात सामील असणाऱ्या गुन्हेगारांना थेट फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा देणारा कडक कायदा का केला जात नाही? गुणवत्तेचा खून करून पैशाच्या जोरावर डॉक्टर आणि अधिकारी बनणाऱ्यांवर कायमची बंदी का घातली जात नाही? केवळ कागदी पदव्या वाटण्याऐवजी उद्योगांना पूरक असणारे कौशल्याधारित शिक्षण का दिले जात नाही? प्रत्येक वेळी नोकरीसाठी मुंबई-पुण्याकडेच धाव का घ्यावी लागते, ग्रामीण भागात एमआयडीसीचा विकास का होत नाही, असे गंभीर प्रश्न आज उपस्थित होत आहेत.

आजचा तरुण हा देशाचा कणा आहे, पण जर हा कणाच बेरोजगारीच्या आणि भ्रष्टाचाराच्या ओझ्याखाली मोडला, तर राज्याचे भविष्य काय असेल? लाखो रुपये खर्चून घेतलेल्या शिक्षणाचा आदर राखला जावा, गुणवत्तेला न्याय मिळावा आणि प्रत्येक सुशिक्षित हाताला काम मिळावे, हीच आजच्या महाराष्ट्रातील तरुण पिढीची आर्त हाक आहे. सरकारने आता तरी जागे व्हावे, अन्यथा हा सुशिक्षित तरुणांचा असंतोष उद्या मोठा ज्वालामुखी बनल्याशिवाय राहणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page