शेतकऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षा, मराठवाडा आणि विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग पावसाअभावी संकटात

मुंबई : राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. सध्या राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली आहे तर काही भागात ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी पुढील २ आठवडे म्हणजे दि. २४ जुलैपर्यंत मुंबईसह कोकण वगळता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात उघडिपीचीच शक्यता अधिक आहे. आधीच मराठवाड्यात पावसाने दडी दिली. त्यामुळे कोवळी पिके माना टाकत आहेत. त्यातच आता मराठवाड्यात सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढली असून, प्रचंड उकाडाही जाणवत आहे. त्यामुळे कोवळी पिके संकटात सापडली आहेत.
मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, नाशिक, विदर्भात जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे या भागातील नद्या, नाले, तलाव तुडुंब भरले असून, अनेक प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग करावा लागला. त्यामुळे या भागात पाणीच पाणी झाले आहे. परंतु मराठवाडा आणि विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग पावसाअभावी संकटात सापडला आहे.
पावसाळ्याच्या अगोदर मराठवाडा आणि इतर ब-याच भागांत पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे मागच्या कित्येक वर्षांत यंदा प्रथमच विहिरी, ओढे, नाले तुडुंब भरून वाहात होते. परंतु मागच्या २० ते २५ दिवसांपासून पावसाने मराठवाड्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे पेरणी होऊन पिके तरारायला लागली, तेव्हाच पाऊस गायब झाले. त्यामुळे कोवळी पिके माना टाकायला लागली आहेत. त्यामुळे मराठवाड्यात खरीप हंगाम संकटात सापडल्याचे चित्र आहे.
दरम्यान, पुढील २ आठवड्यांत मुंबईसह कोकणात केवळ मध्यम पावसाची शक्यता ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली तर संपूर्ण विदर्भ व सांगली सोलापूर, धाराशिव जिल्ह्यात गुरुवार-शुक्रवार दि. १६ ते १७ जुलै रोजी २ दिवस केवळ मध्यम पावसाची शक्यता व्यक्त केली. तसेच उत्तर जळगाव जिल्ह्यात ४ दिवस म्हणजेच १६ जुलैपर्यंत तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे, असे खुळे म्हणाले.
🔴कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उघडीप🔴
बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार झाले आहे. हे पूर्व भारतात जोरदार पाऊस पडत असून, पश्चिम बंगाल व ओरिसातून उत्तर व उत्तर-वायव्येकडे मार्गक्रमण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अरबी समुद्रातून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकणारे मान्सून वारे कमकुवत झाले आहे. मान्सूनच्या पश्चिमी टोकाचेही काहीसे उत्तरेकडे सरकल्यामुळे या दोन आठवड्यांत पावसाचा जोर कमी जाणवत आहे.
🔴हलक्या सरींची शक्यता🔴
सध्या मान्सूनचा आस असणारा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सक्रिय असून राजस्थानपासून ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. आज विदर्भातील नागपूर, अमरावती, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट आहे. उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी हजेरी लावणार असून जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.



