राष्ट्रीय

तेलंगणामध्ये महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना; देशासह राज्यात संतापाची लाट

संगारेड्डी/नाशिक : तेलंगणामध्ये समाजकंटकांनी महात्मा जोतिबा पुले यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोलिस असताना काही समाज कंटकांनी हा प्रकार केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि कार्यकर्त्यांना पिटाळून लावले. पण या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. संगारेड्डी जिल्ह्यात ही घटना घडली. समाजकंटकांना अटक करण्याची आणि कठोर शासन करण्याची मागणी होत आहे. या सर्व घटनेवर राज्यातही संताप व्यक्त होत आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि समता परिषदेचे अध्यक्ष आणि मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत. संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर या गावातील ही घटना आहे. समाजकंटकांमुळे इथं बराच काळ तणाव दिसून येत होता. कायदा सुव्यवस्था बिघडली. समाजकंटकांनी महात्मा जोतिबा फुले यांचा पुतळा विद्रुप करण्याचा आणि तो हलवण्याचा प्रयत्न केला. समाजकंटकांच्या या कृतीमुळे काही काळ तणाव निर्माण झाला. आंदोलनांतील काही जणांनी आणि पोलिसांनी त्यांना वेळीच रोखले. ही घटना वा-यासारखी पसरल्यानंतर लोकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली. यावेळी अनेकांकडून समाजकंटकांचा निषेध व्यक्त करण्यात आला.

या हल्ल्यामागे आरएसएस : प्रकाश आंबेडकर

या घटनेवर वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केली आहे. या घटनेमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला. हा केवळ महात्मा जोतिबा फुले यांच्यावर झालेला हल्ला नसून दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजावर झालेला हल्ला आहे. संघाला महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा तिरस्कार वाटतो. संघाचं केवळ मनुवाद आणि ब्राह्मणवादावर प्रेम आहे. हा हल्ला वंचितांच्या आणि बहुजनांच्या समतेच्या चळवळीवरील आघात आहे, असा प्रहार त्यांनी केला. त्यांनी मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांना तेलंगणात अशा घटना वारंवार घडत असताना तुम्ही हात बांधून गप्प का बसला आहात, असा सवाल केला आहे.

सामाजिक समतेवरच घाला : भुजबळ

तर या घटनेवर समता परिषदेचे अध्यक्ष आणि मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले. महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी छगन भुजबळ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे केली आहे. तेलंगणात सामाजिक विचारांवर हल्ला सुरू असल्याचा आरोप करत महात्मा फुले पुतळा विटंबनेवर भुजबळ आक्रमक झाले. महात्मा फुले पुतळा विटंबना प्रकरण अमित शाहांकडे तातडीच्या कारवाईची मागणी त्यांनी केली. महात्मा फुले यांच्या पुतळ्यावर हल्ला म्हणजे सामाजिक समतेवरच घाला असल्याचे मत भुजबळांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page