मुंबईसामाजिक

संगीतक्षेत्रातील जादुई स्वर हरपला

आशा भोसले यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांच्यानंतर ज्यांच्या जादूई स्वरांनी तब्बल ७५ वर्ष रसिकांना आनंद दिला, त्या ज्येष्ठ पार्श्वगायिका,आशा भोसले यांचे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच निधन झाले. सर्व अवयव निकामी झाल्याने (मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे) त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी ११ ते २ दरम्यान लोअर परळ येथील आनंद भोसले यांच्या निवासस्थानी आशाताईंचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

शनिवारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आशा भोसले यांची नात जनाई भोसलेने त्यांना छातीच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल केले असल्याचे स्पष्ट केले होते. आशा भोसले यांना प्रचंड थकवा जाणवत असून छातीत संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्या लवकर बऱ्या होतील, असे जनाईने सांगितले होते.

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहित आशा भोसले यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली होती. मात्र डॉक्टरांचे प्रयत्न अयशस्वी ठरले असून रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आशा भोसले यांच्या निधनाचे कारण सांगितले.

आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी झाला. लता मंगेशकर यांची धाकटी बहीण असलेल्या आशाताईंनी शास्त्रीय, पॉप, कॅब्रे अशा विविध प्रकारची गाणी गात कलाविश्वावर अधिराज्य गाजवले आहे. १९४३ पासून त्यांनी चित्रपटांमध्ये गायनाला सुरुवात केली. आजवर त्यांनी विविध भाषांमध्ये १२ हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. आर. डी. बर्मन यांच्यासोबतची त्यांची जोडी खूप यशस्वी ठरली. आशा भोसले यांना पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि अनेक फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ‘दम मारो दम’, ‘चुरा लिया है तुमने’, ‘पिया तू अब तो आजा’, ‘ये मेरा दिल’ ‘मेरा कुछ सामान’अशी त्यांची अनेक गाणी गाजली आहेत.

आशा भोसले या गेल्या आठ दशकांहून अधिक काळापासून भारतीय संगीतसृष्टीत सक्रिय होत्या. २०२३ मध्ये त्यांनी दुबईत गाण्यांचा जाहीर कार्यक्रम करून आपला नव्वदावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता. लता मंगेशकर यांच्यानंतर आशा भोसले यांचेच नाव घेतले जात असून त्यांनी विविध भाषा आणि संगीत प्रकारांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. शंकर-जयकिशन, आर. डी. बर्मन, ओ. पी. नय्यर, इलैयाराजा, बप्पी लाहिरी, ए. आर. रेहमान यांसारख्या मोठमोठ्या संगीतकारांसोबत त्यांनी काम केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page