भारत शांती आणि स्थैर्याच्या बाजूने : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या भीषण हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र चिंता व्यक्त करत शांतता आणि संवादाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून या संकटातून बाहेर पडण्यासाठी चर्चेशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, जगभरात सध्या तणावाचे वातावरण आहे. भारत नेहमीच शांतता आणि स्थैर्याचा समर्थक राहिला असून भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहे. भारत सर्व देशांसोबत सहकार्य करत संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. जेव्हा दोन लोकशाही देश एकत्र उभे राहतात, तेव्हा शांततेचा आवाज अधिक मजबूत होतो, असेही पंतप्रधानांनी नमूद केले. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर पंतप्रधान मोदींनी ही भूमिका मांडली. या भेटीदरम्यान भारत आणि कॅनडा यांच्यात युरेनियमविषयक ऐतिहासिक करारावर स्वाक्ष-या करण्यात आल्या. याशिवाय, अणुऊर्जा सहकार्य अधिक बळकट करत स्मॉल मॉड्युलर रिअॅक्टर्स क्षेत्रात दोन्ही देश संयुक्तपणे काम करणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.



