
मुंबई : प्रसिद्ध अभिनेता आर. माधवनने तामिळनाडूतील पालनी येथे सेंद्रिय पद्धतीने तब्बल ३.५ वर्षांनी नारळाची बाग फुलविली. ही बाग फुलविण्यासाठी त्याने स्थानिक शेतकऱ्यांची मदत घेतली.
फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकार अभिनयाबरोबरच शेतीकडे वळताना दिसत आहेत. सलमान खान, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर हे कलाकारही फार्महाऊसवर वेळ घालवतात व शेतीत रमलेले दिसतात. मात्र या सर्वांपैकी ‘धुरंधर’ फेम आर. माधवनने मात्र एक अनोखे आणि कठीण आव्हान स्वीकारले
त्याने तामिळनाडूतील पालनी येथे एक पडीक जमीन विकत घेतली आणि ३.५ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर तिथे नारळाची बाग फुलवली. माधवन याचा हा विलक्षण प्रकल्प होता. या शेतात त्याने ‘नॉन-हायब्रिड’ नारळांची लागवड केली. हे नारळ गोड पाण्यासाठी आणि विशिष्ट सुगंधासाठी ओळखले जातात. याविषयी शुद्ध बुटक्या प्रजातीचे नारळ पिकवताना मला लवकरच स्थानिक शेतकऱ्यांसाठी एक लेख लिहायचा असल्याचे आर माधवनने एक्सवर लिहिले आहे.
माधवनने “ती ओसाड जमीन पुन्हा जिवंत केली. तिथून अपेक्षित उत्पन्न मिळविले. जमिनीसाठी योग्य खत तयार करण्यापासून ते विहिरीत योग्य प्रकारचे मासे सोडण्यापर्यंत तो शिकत गेला. यासाठी त्याने विलक्षण कष्ट घेतले.
या अनुभवाविषयी माधवन म्हणाला, हा आयुष्यातील सर्वात समाधानकारक अनुभव आहे. जमिनीचा पोत सुधारून ती पुन्हा सुपीक झालेली पाहणे खूपच भारी होते. आम्ही आता हाच प्रयोग भारताच्या इतर भागात आणि जगभरात राबवणार आहोत.
दरम्यान, कोरोना लॉकडाउनदरम्यान माधवनने त्याच्या गच्चीवरील बागेची झलक चाहत्यांना दाखवली होती. तिथे त्याने पिकवलेल्या ताज्या चेरी मोठ्या अभिमानाने सर्वांना दाखवल्या होत्या.



