अग्रलेख – गद्दारी; कालची आणि आजची

लोकसभा निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहोचला असताना महाराष्ट्रात चर्चेच्या केंद्रस्थानी थोरले साहेब व दादा, ताई, आणि नव्यानं राजकारणात आलेले सुनेत्रा, पार्थ, रोहीत, युगेंद्र असे ‘पाॅवर’फूल लोक आहेत. वयाची ऐंशी वर्षे ओलांडल्या नंतर साहेब आणि वयाची साठी ओलांडल्या नंतर दादा ज्या पद्धतीने राजकारण हलवून सोडत आहेत, त्याला तोड नाही.
आजही थोरल्या साहेबांविषयी दादांसोबत असलेल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आदरच आहे. साहेबांशी थेट ओळख नसली तरी साहेबांची बाजू भक्कमपणे सोशल मीडियात, समाजात मांडत राहत. हा माणूस आपल्या विचारांचा आहे, त्यांनी आपल्याला ओळखले काय किंवा नाही ओळखले काय, काय फरक पडतो? आपण यांचे काम करत राहायचे अशी त्यांची धारणा होती.
आजकाल काही जुने जाणते लोक साहेबांबद्दल भावनिक झालेले आहेत. त्यांना असे वाटते की, दादांनी साहेबांचा पक्ष चोरला. ते गद्दार निघाले,त्यामुळे नकळतपणे साहेबांबद्दल सहानुभूती तयार झाली. भावनिक वातावरण तयार झाले. परंतु जे भावनिक होत आहेत, त्यांचे श्रद्धेय साहेब आयुष्यात एकदाही भावनिक झालेले नाहीत. काही लोकांना असे वाटते की, साहेबांच्या आयुष्याच्या सूर्यास्ताच्या सुमारास अशी फाटाफूट घडायला नको होती. साहेब आता वृद्ध झालेत, साहेबांचा कॅन्सर आजार या सगळ्याचे भावनिक भांडवल करून लोक त्यांच्या मोहात अडकल्याचे दिसतात.
मराठा आरक्षणासाठी सुमारे ११० जणांनी आत्मबलिदान केले तेव्हाही साहेब भावनिक झाले नाहीत. त्यांनी याविषयावर ब्र सुद्धा उच्चारलेला नाही. बहुसंख्य मराठा समाजात साहेबांनी मराठ्यांसाठी काही केले नाही असा रोष आहे. त्याचे काय करायचे? मराठा आरक्षणाबाबत साहेबांनी स्पष्ट भूमिका कधीही घेतलेली दिसून आलेली नाही. आर्थिक निकषावर आरक्षण दिले जावे, अशा भूमिकेचा त्यांनी वारंवार पुनरुच्चार केलेला दिसतो. त्यासाठी त्यांनी स्वतः काही केले का हा संशोधनाचा विषय आहे.
साहेबांनी आजपर्यंत ओबीसी, दलित, मुस्लिम यांच्या मतांसाठी व्यावहारिक राजकारणच केलेले आहे. सत्तेचे आणि बेरजेचे राजकारण करून त्यांनी आत्तापर्यंत राजकारणात ६० वर्षे काढली आणि राजकारण आपल्या कवेत ठेवले. जीवघेण्या आजारावर मात करत ते आजही महाराष्ट्र पालथा घालतात आणि इंडिया आघाडीसाठी धडपड करतात त्याबद्दल आश्चर्य मिश्रीत कौतुक नक्की आहे. ज्यांचे साहेबावर आंधळे प्रेम आहे,त्यांना अशा प्रकारचे विश्लेषण कदापिही पटणार नाही. परंतु वस्तुस्थिती कधी तरी मांडण्यासाठी इलाज नसतो.
साहेबांचा पक्ष फोडला म्हणून काही कार्यकर्ते भावनिक होत असतील तर ते साहेबांचा जुना इतिहास सोयिस्करपणे विसरून गेलेले आहेत.
सोनिया गांधींच्या परदेशी जन्माचा मुद्दा काढून साहेबांनी काँग्रेसकडून हाकालपट्टी करून घेतली. स्वदेशी असा नवीन पक्ष स्थापन केला. मग ती गद्दारी नव्हती का? २०१४ च्या निवडणुकीत साहेबांनी भाजपने न मागता पाठिंबा देऊन टाकला. ती गद्दारी नव्हती का? २०१९ ला भाजप सोबतच सरकार येता येता राहून गेले, ते काय होते? ते सोडा, साहेबांच्या मातोश्री शारदाबाई शेकापच्या कट्टर कार्यकर्त्या होत्या. पण साहेबांनी आई-वडिलांच्या विरोधात भूमिका घेतली. साहेबांचे ज्येष्ठ बंधू वसंतराव पवार बारामती विधानसभा मतदार संघातून शेकापचे उमेदवार होते, त्यांच्या विरोधात साहेबांनी काँग्रेस उमेदवारासाठी काम केले. कालांतराने वसंतदादा पाटलांचे काँग्रेस सरकार पाडून जनसंघाच्या, आताचा मदतीने ‘पुलोद’ सरकार स्थापन केले. वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला. आता दादा भाजपसोबत गेले तर ती गद्दारी कशी काय ठरते?
जर स्वतः साहेब भावनिक होत नसतील तर मग कार्यकर्त्यांच्या भावनिक होण्याला काय अर्थ आहे? स्वतः साहेब स्वतःला कधीच वृद्ध समजत नाहीत.त्यांनी त्यांच्या आजाराचे कधीही भांडवल केले नाही. मग त्यांच्या त्या गोष्टींचे भांडवल काही कार्यकर्ते का करतात?
साहेबांना मत म्हणजे फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला मत अशा प्रकारचा एक मतप्रवाह दिसून येतो आहे, परंतु तो सर्वांचा भ्रम आहे. साहेब स्वतः किंवा त्यांचा पक्ष कधीही पुरोगामी असल्याचे जाणकारांना जाणवलेले नाही. सत्तेच्या बाहेर गेले की पुरोगामी व्हायचे आणि सत्तेत आले की प्रतिगामी होऊन लोकांशी वागायचे हे त्यांच्या राजकारणाचे सूत्र राहिले आहे.
आज महाराष्ट्रात पुरोगामी चळवळी जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्या चळवळी जगाव्यात यासाठी साहेबांनी कोणती पावले आतापर्यंत उचलेली आहेत? साहेब हे फक्त सत्तेचे आणि बेरजेचे राजकारण करतात. मर्जीतल्या लोकांना विचारायचे आणि बाकीच्यांना गृहीत धरायचे हे त्यांचे राजकारण आहे.
वारा येईल तशी पाठ फिरविण्याचे, काळाच्या मागणीनुसार भूमिका घेवून राजकारण करण्याचे हे थोरल्या साहेबांचे वैशिष्ट्य आहे. मग त्यात राजकीय गुरू स्व.यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या भूमिकेशी विसंगत भूमिका घेणे असो किंवा राज्यात पाडापाडीचे राजकारण असो, काळाच्या मागणीनुसारच त्यांनी राजकारण केले.त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या दादांनी काळाच्याच मागणीनुसार घेतलेली भूमिका साहेबांना का पटत नाही ? विश्वासघात, अविश्वासार्हतेला मूठमाती देणारी रोखठोक पुरोगामी तत्त्वांशी इमान राखणारी भूमिका दादा घेत असतील तर काय बिघडले ?ज्यांचा इतिहास आणि वर्तमान कोलांट्या उड्यांनी भरलेला आहे. त्यांच्याकडून पक्षनिष्ठा शिकणे हे हास्यास्पद नाही का? साहेबांनी राजकारण केले की मुत्सद्दीपणा आणि इतरांनी केली की गद्दारी कशी?
भावनिकते मधून बाहेर येऊन आपण विकासाच्या मुद्द्यावर राजकारण केले पाहिजे अगणित प्रश्न सुटलेले नाहीत, ते कसे सुटतील यासाठी नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे. निव्वळ आंधळ्या प्रेमापोटी कोणाचे तरी समर्थन करून आपण आपल्याच पायावर धोंडा मारून घेणे बरे नाही.
– संपादक
नरसिंग कांबळे


