पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीतून सांस्कृतिक मंत्र्यांना डावलणे गंभीर
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष प्रवक्त्यांची प्रतिक्रिया

मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना डावलले गेल्याची बाब अत्यंत गंभीर असून, हा केवळ प्रशासकीय निर्णय नसून सत्तेतील अंतर्गत राजकारणाचे स्पष्ट उदाहरण आहे.
मुख्यमंत्र्यांच्या जवळ डोईजोड करणाऱ्या, प्रश्न विचारणाऱ्या किंवा स्वतंत्र भूमिका मांडणाऱ्या नेत्यांना जाणीवपूर्वक दुरावले जात आहे, हे या निर्णयातून स्पष्ट होते. आज समितीतून डावलले, उद्या मंत्रिमंडळातूनही दुरावले अशीच ही सत्तेची नवी पद्धत दिसून येत आहे, अशी प्रतिक्रिया शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी दिली आहे.
आशिष शेलार यांच्यासारखा पक्षनिष्ठ, सुरुवातीपासून भारतीय जनता पक्षासाठी काम करणारा नेता असताना, त्यांना अशा महत्त्वाच्या प्रक्रियेतून दुरावले जाणे म्हणजे केवळ व्यक्तीचा अपमान नाही, तर कार्यकर्त्यांच्या निष्ठेचा अवमान आहे. हा प्रकार पाहता, मुख्यमंत्र्यांचा उद्देश स्पष्ट दिसतो पक्षातील अनुभवी आणि स्वाभिमानी नेत्यांना हळूहळू दुरावून, स्वतःची स्वतंत्र टीम उभी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज समितीतून डावलले, उद्या निर्णयप्रक्रियेतून बाजूला सारले, आणि परवा सत्तेच्या केंद्रातूनच दुरावले हा प्रवास सुरू झाला आहे,असे त्यांनी सांगितले.
मातेले म्हणाले की सांस्कृतिक मंत्र्यांना पद्म पुरस्कार समितीतून डावलणे प्रशासनातील असमतोलाचा नमुना निष्ठावंत नेत्यांना जाणीवपूर्वक दुरावण्याची प्रवृत्ती सत्ताकेंद्र स्वतःपुरते मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न भविष्यात स्वतःचा गट निर्माण करण्यासाठी अंतर्गत साफसफाई सुरू लोकशाही व्यवस्थेत मतभिन्नता ही शक्ती असते; पण सध्याचे सरकार मतभिन्नतेला दुरावून एकछत्री कारभार करण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्रातील जनतेने हे बारकाईने पाहिले असून, अशा कारभाराला जनता योग्य वेळी उत्तर देईल.



