संपादकीय अग्रलेख

मराठीचा जाणीवपूर्वक तिरस्कार मोडून काढा!

मराठीचा जाणीवपूर्वक तिरस्कार मोडून काढा!

भाषा माणसाने निर्माण केली. तिला चिन्ह, त्याला अर्थ माणसांनी दिले. त्यामुळे हजारो भाषा निर्माण झाल्या. त्यातील एक भाषा म्हणजे मराठी. तिला २००० वर्षाचा इतिहास आहे. तिच्यातील शिलालेख, ताम्रपट, लिखित साहित्य आजही उपलब्ध आहे. भाषा आपल्याला आईसारखीच असते. म्हणून तिला मातृभाषा म्हणतात. मराठी इतक्या समृद्ध भाषा फार कमी आहेत. ज्या भाषेत आपल्या सगळ्या भावना विचार नेमकेपणाने व्यक्त करता येतात ती भाषा समृद्ध मानली जाते. मराठीचे वेगळेपण अनेक प्रकारे सिद्ध करता येते.

मराठीतील म्हणी, वाक्प्रचार कान टवकारायला लावणारे आहेत. मराठी भाषेची विशेषणे सुद्धा खूप छान आहेत. लुसलुशीत पोळी, खुसखुशीत करंजी, ठणठणीत तब्येत, चटपटीत मिसळ, गुटगुटीत बाळ, चुणचुणीत मुलगी अशी कितीतरी विशेषणे डोळ्यांसमोर चित्र उभे करतात.एखाद्या क्रियापदाचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने केला तर त्याचा अर्थ बदलत जातो उदाहरणार्थ भरणे आदी क्रियापदांचा वापर जसा तुम्ही कराल तसा त्याचा अर्थ बदलत जातो. नळाचे पाणी भरणे, मनात एखादी व्यक्ती भरणे, कान भरणे, लक्ष्मी पाणी भरणे, जखम भरणे, अंगाने भरणे, वगैरे. प्रत्येक भरण्याचा अर्थ वेगळा अर्थछटा वेगळ्या आहेत. मराठी भाषेला काना, मात्रा, वेलांटी, स्वल्पविराम ,पूर्णविराम,असे अनेक चिन्हे आहेत. यांच्या माध्यमातून ती भाषा अधिक अर्थपूर्ण, सुंदर दिसते. मराठी भाषा संपन्न व समृद्ध आहे पण ‌दुर्दैवाने आज मातृभाषेपेक्षा इंग्रजी काही ठिकाणी हिंदी भाषा वरचढ होऊ लागली आहे. अलीकडे बोलीभाषेचा वापर कमी होऊन प्रमाण भाषेचा वापर जास्त होत आहे. त्यामुळे बोली भाषेतील अनेक म्हणी, वाक्प्रचार काळाच्या ओघात नष्ट होत आहे. अशी भाषा बोलणारी माणसेही कमी झाली आहेत.

इंग्रजीमध्ये बोलले म्हणजे आपल्याला कोणीतरी मोठे असल्यासारखे वाटते. हिंदीत बोलून आपण राष्ट्रीय पातळीवर जाऊन बसल्याची ऐट मिरवतो, पण भाषा ही ऐकून येत असते. घरात वेगळी भाषा, शाळेत वेगळी भाषा, समाजात वेगळी भाषा. असे असेल तर त्या मुलांना कोणत्याही एका भाषेत नीटपणे आपले विचार व्यक्त करता येत नाहीत. आपले म्हणणे जर योग्य रीतीने मांडता आले नाही तर त्या व्यक्तीची घुसमट होते. अशा मुली, मुले आत्मकेंद्री व एकलकोंडी होतात. ते चार लोकांत मिसळू शकत नाहीत, त्याचा परिणाम त्यांच्या करिअरवरही होतो.

गेल्या काही वर्षांत सोशल मीडियामुळे प्रमाण भाषेचा वापर होत आहे. परंतु तोही शुद्ध स्वरूपात नाही. इंग्रजी व हिंदी भाषेचा प्रभाव येणाऱ्या पिढीवर अधिक होत आहे. यासाठी मराठीतील साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत कसे जाईल आणि मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त कसा करता येईल, याचाच विचार करण्याची गरज आहे.

शालेय शिक्षण मातृभाषेत असेल तर विद्यार्थ्यांना विषय समजायला खूप सोपे जाते. मराठीतून शिक्षण घेतल्याने मूलभूत संकल्पना समजतात, विचारशक्ती वाढते आणि आत्मविश्वास वाढतो. शासकीय कामकाज, शिक्षण, न्यायव्यवस्था आणि प्रसारमाध्यमांमध्ये मराठीचा वापर झालाच पाहिजे.

मराठी केवळ भाषा नाही, ती आपल्या ओळखीचा मुख्य भाग आहे. तिचे संवर्धन आणि विकास करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य असले पाहिजे , पुढील पिढ्यांपर्यंत हा समृद्ध वारसा पोहोचवला पाहिजे. मराठी भाषा इंग्रजी, हिंदी पेक्षा निश्चितच संपन्न व समृद्ध आहे. या भाषेचे वेगळेपण अनेक बाबतीत आहे. त्यामुळे मराठीचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. आपली मराठी भाषा आपणच टिकवली पाहिजे. त्यात आवर्जून बोलले पाहिजे. त्यातील भाषिक सौंदर्याचा लाभ घेतला पाहिजे.

१९६० मध्ये मराठीला महाराष्ट्राची राजभाषा म्हणून घोषित करण्यात आले. २०२४ मध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान करण्यात आला. संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये २२ अनुसूचित भाषांची यादी समाविष्ट आहे. या भाषांमध्ये आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, संथाली, सिंधी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू यांचा समावेश होतो.

भारतातील इतर राज्यांमधील अनिवार्य प्रादेशिक भाषांमध्ये तमिळनाडूत अधिकृत कामकाजासाठी तमिळ भाषेचा वापर अनिवार्य आहे, आणि सरकारी नोकऱ्यांसाठी इयत्ता १० वीच्या स्तरावरील तमिळ भाषेचे ज्ञान (पदवी) आवश्यक आहे. तमिळ भाषेचा वापर अनिवार्य आहे आणि सरकारी नोकऱ्यांसाठी, इयत्ता १० वीची तमिळ परीक्षा उत्तीर्ण होणे ही एक पूर्वअट आहे. कर्नाटकात फलकांवर ६० टक्के कन्नड भाषेचा वापर अनिवार्य करण्याव्यतिरिक्त, येथे सरकारी कार्यालये आणि व्यावसायिक आस्थापनांच्या फलकांवर कन्नड भाषेचा वापर करणे सक्तीचे आहे.

झारखंड मध्ये सरकारी नोकऱ्यांसाठी प्रादेशिक आणि आदिवासी भाषांचे ज्ञान असणे अनिवार्य करण्यात आले आहे; या आदेशानुसार, उमेदवारांनी मुंडारी, संथाली, हो किंवा कुरुख यांसारख्या भाषांमध्ये किमान ३० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. पश्चिम बंगाल मध्ये सरकारी नोकऱ्यांसाठी बंगाली भाषेत पारंगत असलेल्या उमेदवारांच्या भरतीला प्रोत्साहन देते.

या साऱ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात रिक्षा, टॅक्सी सारखी सार्वजनिक वाहने मुंबईत ज्यांच्या हातात सर्वाधिक आहेत, त्या उत्तर भारतीयांना मराठी शिकण्याचा विरोध करणे किंवा मराठीचा जाणीवपूर्वक तिरस्कार करणे चुकीचे असल्याचे दिसून येते. ही मुजोरी सरकारने लायसन्स रद्द करुन आणि मराठीप्रेमी संस्था, संघटनांनी दबावगट निर्माण करून मोडून काढली पाहिजे. हिंदीचा दुराग्रह म्हणजे आपण जिथे पोट भरण्यासाठी आलो तिथल्या लोकांवर एक प्रकारची जबरदस्तीच. ही जबरदस्ती उद्या हिंदी भाषक डोईजड होऊन ‘हम करे सो कायदा ’ या राजकीय स्वरुपात पुढे येण्याची भिती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page