पुण्यातील लक्ष्मीनगर भागात घरफोडी करणाऱ्या विधीसंघर्षित बालकास पोलिसांनी घेतले ताब्यात; ७६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

पुणे, महाराष्ट्र मिशन प्रतिनिधी : पुण्यातील लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी करून चोरी करणाऱ्या एका विधीसंघर्षित बालकाला तपास पथकाने ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. त्याच्याकडून लॅपटॉप, मोबाईल, स्पीकर, हेडफोन यांसह एकूण ७६ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याकडील दोन गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.
लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडणाऱ्या घरफोडीच्या घटनांच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांना गोपनीय बातमीद्वारे माहिती काढण्याच्या तसेच हद्दीत पेट्रोलिंग करून संशयित इसमांची तपासणी करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. या आदेशानुसार, दिनांक ६ ऑगस्ट २०२६ रोजी तपास पथकाचे सपोनि निखिल पवार व पथकातील अंमलदार हद्दीत गस्त घाालत असताना, पोलीस शिपाई राहुल परदेशी आणि किरण भागीत यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून बालाजीनगर, येरवडा येथून एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या बालकाला विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने बिडी कामगार वसाहत येथील दोन घरांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून Dell कंपनीचा लॅपटॉप, बॅग, हेडफोन, OnePlus कंपनीचा मोबाईल, स्पीकर, तांब्याचा हंडा आणि १ ग्रॅम सोन्याचे बेनटेक्सचे गंठण असा एकूण ७६,७०० रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याकडील गु.र.नं. १४५/२०२६ (भा.न्या.सं. कलम ३०५ (अ), ३३१(३)) आणि गु.र.नं. ९५/२०२६ (भा.न्या.सं. कलम ३०५) असे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार मयूर सूर्यवंशी करत आहेत.
सदरची धडक कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त (परिषेत्र-०४) चिलुमुला रजनिकांत, आणि येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम, गुन्हे पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप, तपास पथकाचे अधिकारी सपोनि निखिल पवार, सपोनि दत्तात्रय लिगाडे तसेच पोलीस अंमलदार यशवंत खंदारे, श्रीनाथ कांबळे, अतुल जाधव, राहुल परदेशी, भीमराव कांबळे, सुरज ओंबासे, कादिर शेख, अमोल गायकवाड, दत्तात्रय शिंदे, नितीन धायगुडे, किरण भागीत, अमोल वायाळ, अक्षय शिंदे आणि सचिन कुचेकर यांनी पार पाडली आहे.



