छ. संभाजीनगर

खाकीचा ‘खुनी’ चेहरा: पोलिसांच्या गाडीत वाळूमाफिया अन् निष्पाप शिक्षक सुरेश बोरसेंचा बळी; वेरूळ हादरले!

विशेष प्रतिनिधी/छत्रपती संभाजीनगर/वेरूळ :

“आई, मामांना काही लोक मारत आहेत आणि त्यांना बळजबरीने गाडीत कोंबून घेऊन जात आहेत…” हे शब्द होते १२ वर्षांच्या चिमुरड्या वरदचे. हे ऐकताच घरातील शांतता भंग पावली आणि एका दुर्दैवी घटनेची मालिका सुरू झाली, ज्याचा शेवट शिक्षकाच्या खुनाने झाला. आरोपीच्या शोधाच्या नावाखाली आलेल्या वैजापूर पोलिसांच्या पथकाने आणि त्यांच्यासोबत असलेल्या कुख्यात वाळूमाफियाच्या टोळक्याने केलेल्या मारहाणीत जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सुरेश रूपचंद बोरसे (५२, रा. कौशिकी गल्ली, वेरूळ) यांचा बळी घेतला आहे. या घटनेने संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, पोलिसांच्या खाकी वर्दीला काळीमा फासणारी ही घटना असल्याचे बोलले जात आहे.

बुधवारी (दि.१०) रात्री १२ वाजेच्या सुमारास शिक्षक सुरेश बोरसे आपल्या १२ वर्षांचा भाचा ‘वरद’ याला सोबत घेऊन घराबाहेर आईस्क्रीम आणण्यासाठी गेले होते. दरम्यान, काही संशयित वाहने त्यांच्या घराजवळ थांबलेली होती. घराजवळ गोंधळ सुरू असल्याचे पाहून बोरसे यांनी विचारपूस केली. तिथे ‘पोलिस’ अशी पाटी असलेली पांढरी कार आणि समोर नंबर प्लेट नसलेली, मात्र मागे ‘३०२’ नंबर लिहिलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ उभी होती. जेव्हा बोरसे यांनी कोणत्याही अधिकृत ओळखपत्राशिवाय, वर्दीत नसलेल्या त्या टोळक्याला जाब विचारला, तेव्हा संतापलेल्या टोळक्याने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला.

पत्नी आणि मुलींच्या डोळ्यासमोर अमानवीय मारहाण

बोरसे यांना मारहाण होत असल्याचे कळताच त्यांच्या पत्नी अनिता आणि दोन्ही मुली घटनास्थळी धावल्या. त्यांनी पतीला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु बेभान झालेल्या पोलीस आणि वाळूमाफियांच्या टोळक्याने त्यांची अजिबात दाद घेतली नाही. बोरसे यांना खाली पाडून त्यांच्या छातीवर लाथाबुक्क्या मारण्यात आल्या. त्यांना मरणासन्न अवस्थेत गाडीत कोंबले असताना, बोरसे यांच्या मुलीने गाडीपुढे आडवे होऊन “माझ्या वडिलांना कुठे घेऊन चाललाय?” असा आर्त टाहो फोडला. प्रकरण अंगाशी येत असल्याचे पाहून हे टोळके बोरसे यांना तेथेच सोडून पळून गेले. त्यांना तात्काळ उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

पोलिसांच्या अजब कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

या प्रकरणात वैजापूर पोलिसांचे उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे आणि अंमलदार वाल्मीक बणगे यांच्या भूमिकेवर गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. आरोपी संदीप आवारे याला पकडण्यासाठी पोलिसांनी चक्क फिर्यादी रवींद्र आवारे याला सोबत नेले होते. रवींद्र आवारे हा बेकायदा दारू आणि वाळूतस्करीशी संबंधित असून तो एका खुनाच्या गुन्ह्यातील माजी कैदी आहे. तपासासाठी सरकारी वाहनाऐवजी वाळूमाफियाच्या खासगी गाड्यांचा वापर केल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सर्वत्र टीकेची झोड उठत आहे.

पोलीस प्रशासनाची मलमपट्टी की दिशाभूल?

मृताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून खुलताबाद पोलिसांनी सात अज्ञात व्यक्तींविरुद्ध कलम १०६ (१) आणि १३१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पोलीस डायरीत पीएसआय नागरगोजे आणि अंमलदार बणगे हे खासगी वाहनाने तपासासाठी गेल्याची नोंद असूनही, आणि व्हिडिओमध्ये ते स्पष्ट दिसत असूनही, पोलिसांनी आरोपींची नावे टाळल्याने जनतेत प्रचंड असंतोष आहे.

जनक्षोभ आणि आंदोलनाचा भडका

या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी वेरूळ येथील रस्ता चार तास रोखून धरला होता. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पोलिसांच्या या मनमानी कारभाराचा निषेध केला. अखेर प्रकरण चिघळत असल्याचे पाहून, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी या प्रकरणात खुनाचा (कलम ३०२) गुन्हा दाखल करण्याचे संकेत दिले असून चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. तसेच, संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करून त्यांच्यावर खातेनिहाय कारवाईचे आदेश दिले आहेत.

निष्पाप शिक्षकाचा बळी घेणाऱ्या या प्रकरणातील दोषींवर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, अशी भूमिका बोरसे कुटुंब आणि ग्रामस्थांनी घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page