पुण्यातील जबरी चोरी आणि गोळीबार प्रकरणाचा २४ तासांत पर्दाफाश; इंदूरमधून तिन्ही सराईत गुन्हेगार जेरबंद

पुणे, महाराष्ट्र मिशन प्रतिनिधी : पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी घडलेल्या थरारक जबरी चोरी व गोळीबार प्रकरणातील परराज्यातील सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकाला अवघ्या २४ तासांत मोठे यश आले आहे. इंदूर (मध्य प्रदेश) येथून या तिन्ही कुख्यात आरोपींना जेरबंद करण्यात आले असून, या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
दिनांक ०५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास, शिरसवडी (ता. हवेली, जि. पुणे) येथील गावडेवाडीत पंडित गावडे यांच्या बंगल्यासमोर ही घटना घडली. फिर्यादींचे भाऊ त्यांच्या कारमधून जात असताना, तीन अज्ञात इसमांनी त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने अचानक बेछूट गोळीबार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील तब्बल ११ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन चेन बळजबरीने हिसकावून आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले होते. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने हलवली. घटनास्थळावर सापडलेली मोटारसायकल आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गोपनीय माहिती गोळा करत अवघ्या ४ ते ५ तासांत पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सह. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, आणि त्यांच्या पथकाने आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे इंदूर (मध्य प्रदेश) येथे सापळा रचून या गुन्हेगारांना २४ तासांच्या आत बेड्या ठोकण्यात आल्या. गुन्ह्यात लुटलेला ऐवज आणि वापरलेल्या शस्त्राबाबतचा कसून तपास सध्या सुरू आहे.
अविनाश क्रिशनचंद्र त्रिपाठी (वय ४३, रा. बकोरीगाव, पुणे, मूळ रा. उत्तर प्रदेश) हा या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असून, त्याच्यावर भारत आणि नेपाळमध्ये मोठे दरोडे टाकल्याप्रकरणी ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर होते. त्याच्याविरुद्ध उत्तर प्रदेशात खून, खुनाचा प्रयत्न आणि दरोड्याचे तब्बल २० गंभीर गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे, सन २०१८ मध्ये उत्तर प्रदेश एसटीएफने लखनौ येथे चकमकीनंतर त्याला जेरबंद केले होते.
सुरेंद्रपाल रामचंद्र पाल (वय ३२, रा. बाराबंकी, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध उत्तर प्रदेशमध्ये चोरी व लुटीचे १२ ते १३ गुन्हे नोंद आहेत. मोहम्मद शोएब वसीम खान (वय ३७, रा. बाराबंकी, उत्तर प्रदेश) याच्यावरही उत्तर प्रदेशात ५ गुन्हे दाखल आहेत.
वाहन चोरी व दरोडा विरोधी पथक (ADS-2) च्या सहा. पोलीस निरीक्षक अफरोज पठाण आणि त्यांच्या पथकाने या तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन सुरक्षितपणे पुणे येथे आणले आहे.
सदरची धडक कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळीक, आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-३) शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या संपूर्ण तपासात व यशस्वी कारवाईमध्ये गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड, साहाय्यक पोलीस निरीक्षक मोहसीन पठाण, पोलीस अंमलदार परेश सावंत, संदीप येळे, विनायक येवले, प्रफुल मोरे, विक्रांत सासवडकर, पांडुरंग नाणेकर यांच्यासह पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, राम राजमाने, वाहिद पठाण, श्रीमती कांचन जाधव, सहा. पोलीस निरीक्षक अफरोज पठाण, श्रीकांत चव्हाण, मदन कांबळे, पोलीस उप-निरीक्षक राहुल कोळपे, युनिट-७ आणि दरोडा व वाहनचोरी पथक-०२ मधील अमोल ढोणे, किरण पलांडे, विनायक साळवे, सारंग दळे, निलेश साळवे, गिरीष नाणेकर, भरत उकीर्डे, सुहास तांबेकर, राहुल इंगळे आदी अधिकारी व अंमलदारांचे विशेष योगदान आहे.



