राजकीय दाबाचा बळी! फलटणच्या आणखी एका तरुण डॉक्टरची आत्महत्या

विशेष प्रतिनिधी | महाराष्ट्र मिशन
पुणे / फलटण : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय अनास्था, वरिष्ठांचा सततचा मानसिक त्रास आणि राजकीय दबावाला कंटाळून वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र जगन्नाथ रूपनवर (वय २७, रा. फडतरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी मुंबईत टोकाचे पाऊल उचलल्याची अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. उपचारादरम्यान सोमवारी (दि. ३१) दुपारी त्यांची प्राणज्योत मावळली. काही महिन्यांपूर्वी याच रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांनीही शासकीय यंत्रणेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. सलग घडलेल्या या दोन भीषण घटनांमुळे ‘देवदूतांच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या आरोग्य विभागाच्या कारभाराला नेमकी कुणाची सावली लाभली आहे?’ असा संतप्त सवाल आता उपस्थित होत असून, शासकीय रुग्णालयातील अनास्थेची साडेसाती पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. या लालफितीच्या कारभारामुळे राज्यभरातील वैद्यकीय क्षेत्रात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मृताच्या कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला असून, ‘मार्ड’ संघटनेने तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. याप्रकरणी फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या उपाधीक्षक डॉ. लीला मदने यांना निलंबित करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, मागील जुलै महिन्यात माजी मंत्री तानाजी सावंत यांचा खासगी सचिव (पीए) असल्याचा दावा करणारा प्रसाद प्रदीप कोंडे-देशमुख हा फलटण उपजिल्हा रुग्णालयात शस्त्र परवान्यासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय ‘फिटनेस सर्टिफिकेट’साठी पोहोचला होता. वेळेची मर्यादा संपलेली असतानाही तात्काळ प्रमाणपत्र देण्याचा तगादा त्याने लावला. मात्र, डॉ. रूपनवर यांनी नियमबाह्य प्रमाणपत्र देण्यास स्पष्ट नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि वरिष्ठांच्या हस्तक्षेपाने तोडगा काढल्यानंतरही प्रसाद कोंडे-देशमुख याने डॉ. रूपनवर यांना धमकावले आणि धक्काबुक्की केली. एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याने नियमांचे पालन केले म्हणून त्याला थेट धमकावण्याची अरेरावी चालतेच कशी? असा प्रश्न याद्वारे निर्माण होतो. याप्रकरणी डॉ. रूपनवर यांनी फलटण पोलिसांत तक्रार देऊन गुन्हाही दाखल केला होता. तसेच, रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. लीला मदने यांच्याकडून सातत्याने त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता.
या संपूर्ण प्रकारामुळे तीव्र नैराश्यात आलेल्या डॉ. रूपनवर यांनी यापूर्वी हातावर शेवटचा संदेश लिहून टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा दिला होता. हातावर सुसाईड नोट लिहिल्याचा फोटो आणि त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. पोलिसांनी त्यांचे समुपदेशनही केले होते. २९ जुलै रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता आणि ३० जुलैपासून ते कामावर आले नव्हते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. वरिष्ठांच्या निर्देशानुसार चौकशी समितीही नेमण्यात आली; मात्र महिना उलटूनही चौकशीचा अहवाल का जाहीर करण्यात आला नाही? प्रशासनाला नेमके कोणाला पाठीशी घालायचे आहे? अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अहवाल न मिळाल्याने १८ ऑगस्ट रोजी त्यांनी पुन्हा आत्महत्येचा इशारा दिला होता. अखेर, २७ ऑगस्ट रोजी सकाळी सायन रेल्वे स्थानक परिसरातील उच्चदाबाच्या (हायहोल्टेज) टॉवरवर चढून त्यांनी गळफास घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच धाव घेऊन त्यांना खाली उतरवले आणि गंभीर अवस्थेत सायन महानगरपालिका रुग्णालयात दाखल केले. सुरुवातीला प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले, मात्र ३१ ऑगस्ट रोजी दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सुषमा अंधारे आणि रोहित पवार यांचे गंभीर आरोप; यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
या प्रकरणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खंत व्यक्त करताना सांगितले की, “दीड महिन्यापूर्वी डॉ. राजेंद्र रूपनवर यांनी माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तक्रार केल्यास नोकरीवरून काढले जाईल व वरिष्ठ आणखी त्रास देतील, या भीतीने ते उघडपणे बोलायला तयार नव्हते. मृत्यूपूर्वी त्यांनी जरी माझी कोणतीही तक्रार नाही आणि देहदान करण्यात यावे, असे म्हटले असले तरी हा जबाब स्वखुशीने की दबावाखाली, हे तपासावे लागेल. त्यांनी आधी संपर्क साधला असता तर कदाचित प्राण वाचू शकले असते.”
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त करत, “सामान्य माणसाला जीवदान देणाऱ्या डॉक्टरांचाच जर असा पद्धतशीर छळ करून त्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलले जात असेल, तर या राज्याला वाली कोण?” असा सणसणीत सवाल केला आहे. मागील वर्षी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर आरोग्य विभागाने काय बोध घेतला, असा जाब विचारत त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
या सलग दुर्घटनेमुळे आरोग्य विभागाच्या सुस्त यंत्रणेचा आणि राजकीय दबावाखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा खरा चेहरा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. निष्पाप डॉक्टरचा बळी गेल्यानंतर तरी शासन आणि प्रशासन खडबडून जागे होणार का, आणि दोषींवर कठोर कारवाई करून न्याय देणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.



