क्रेन कोसळली, दोन कुटुंबांचा आधार हरपला! नागपुरात बांधकामस्थळी हाहाकार
नागपुरात क्रेन दुर्घटनेने हाहाकार; भंडाऱ्यातील विश्वनाथ कटाने आणि उत्तर प्रदेशातील मुकेश निषाद यांचा मृत्यू| झारखंडचे दोन मजूर गंभीर जखमी | सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

नागपूर : म्हाडाच्या बांधकामस्थळी सुरू असलेल्या कामादरम्यान टॉवर क्रेनचा सुमारे १०० फूट उंचीवरील भाग अचानक कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन मजुरांचा मृत्यू झाला, तर झारखंडमधील अन्य दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी (३० ऑक्टोबर) सकाळी नागपूरच्या गणेशपेठ परिसरातील कॉटन मार्केट चौकाजवळील गीतामंदिर परिसरातील म्हाडा कॉलनीत ही घटना घडली. मृतांमध्ये भंडारा जिल्ह्यातील विश्वनाथ कटाने आणि उत्तर प्रदेशातील मुकेश निषाद यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडा परिसरात टेक्सटाईल पार्क आणि व्यावसायिक संकुलाचे बांधकाम सुरू आहे. याच कामासाठी दोन क्रेन कार्यरत होत्या. शुक्रवारी सकाळी सुमारे १०.३० वाजता एका क्रेनचे डिस्मँटलिंग अर्थात सुटे भाग करण्याचे काम सुरू असताना तिचा वरचा भाग अचानक तुटून खाली कोसळला. हा भाग जवळच असलेल्या दुसऱ्या क्रेनवर आदळला. या दुर्घटनेत चार मजूर प्रभावित झाले. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून, दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना तातडीने ओरियन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दोन जणांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. क्रेन कोसळण्यामागे तांत्रिक बिघाड होता की मानवी चूक, याचा तपास केला जाणार आहे. यासाठी संबंधित यांत्रिकी विभागातील तज्ज्ञांची मदत घेतली जाणार असून, बांधकामस्थळी आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याचीही चौकशी होणार आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बांधकामस्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
म्हाडाच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या या बांधकामाचे कंत्राट बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनीशी संबंधित कंत्राटदाराकडे असल्याची माहिती समोर आली आहे. क्रेनसारख्या अवजड यंत्रसामग्रीचे काम करताना आवश्यक तांत्रिक दक्षता आणि कामगारांच्या सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली होती का, हा महत्त्वाचा प्रश्न या दुर्घटनेनंतर उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे, क्रेनचा कोसळलेला भाग मुख्य रस्त्यावर पडण्यापासून थोडक्यात बचाव झाल्याची माहितीही समोर आली आहे.
कामगारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची, यंत्रसामग्रीची तपासणी नियमित केली जात होती का आणि दुर्घटनेला जबाबदार कोण, या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे आवश्यक आहे. दोन मजुरांचा जीव गेल्यानंतर तरी बांधकामस्थळांवरील सुरक्षा व्यवस्थेची कठोर तपासणी होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.



