पुण्यातील गणेशोत्सव सांस्कृतिक पद्धतीने व्हावा – मुख्यमंत्री फडणवीस!

पुणे : दरवर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चर्चेत येणाऱ्या ‘डिजे’ आणि ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. पुण्यात आयोजित भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना त्यांनी पुणेकरांना डिजेच्या वादात न पडता संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे थेट आवाहन केले आहे. पुण्यात नुकताच डिजेविरोधातील लढा तीव्र झाला असतानाच मुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
पुण्यातील गणेशोत्सवाच्या गौरवशाली परंपरेचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले, “पुण्यात गणेशोत्सवात डिजे वाजला पाहिजे की नाही, याबाबत मी पुणेकरांना सांगू इच्छितो की, पुण्यातच ती क्षमता आहे जी संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीने उत्सव साजरा करू शकते. हे केवळ पुणेकरच करू शकतात. त्यामुळे या वादात न पडता सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव कसा साजरा केला जातो, हे पुणेकरांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून द्यावे.” भाजपच्या या राज्य कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्र्यांसह सर्व प्रमुख पदाधिकारी, आमदार व खासदार उपस्थित होते.
दुसरीकडे, पुण्यात गणेशोत्सव आणि दहीहंडीदरम्यान डिजेच्या कर्णकर्कश आवाजाविरोधात नागरिकांचे आंदोलन तीव्र होत आहे. भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनीही डिजेच्या अनिर्बंध वापराला कडाडून विरोध दर्शवला आहे. “रस्त्यावर धांगडधिंगा घातल्यानेच धार्मिकता सिद्ध होते हे मला मान्य नाही. मोठ्या आवाजामुळे रुग्ण, गरोदर महिला व लहान मुलांना प्रचंड त्रास होतो. लोकमान्य टिळकांनी ज्या उदात्त हेतूने हा उत्सव सुरू केला, तो मूळ उद्देशच हरवला आहे; त्यामुळे मंडळांनी डिजे व लाऊडस्पीकर्स टाळायला हवेत,” असे परखड मत त्यांनी मांडले होते.
शहरात डिजेच्या वापरावरुन एकीकडे वाद सुरू असताना आणि काही पदाधिकाऱ्यांकडून डिजेचा आग्रह धरला जात असताना, मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे या वादावर पडदा पडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



