“महाराष्ट्र मिशन” संपादकीय : ‘ससून’चा १६ नंबर वाॅर्ड

पुण्याचं ससून रुग्णालय हजारो गोरगरीब रुग्णांवर औषधोपचार करतं. अलिकडे ससून रुग्णालयाच्या सुविधांमध्ये खूप सकारात्मक बदल झालेत. सुरक्षा व्यवस्था बऱ्यापैकी असते. संपूर्ण महाराष्ट्रातून आजारी लोक अल्प शुल्कात उपचार घेऊन बरे होऊन घरी जातात. या एका मानवतावादी आरोग्य मंदिरात बसलेले काही पैसेखाऊ डाॅक्टर, कर्मचारी आणि कारागृह तसंच पोलीस कर्मचारी यांच्यामुळं या रुग्णालयास बट्टा लागतो. ससूनमध्ये गुन्हेगारांना विशेष आणि चोरट्या मार्गाद्वारे मिळत असलेल्या सुविधा व त्यामागे दडलेले भ्रष्टकारण याची मोठी चर्चा गेल्या आठवड्यात झाली. मालदार कैदी कारागृहात कमी आणि ससून मध्ये जास्त कसे राहू शकतात हे ऐकून येरवडा कारागृहातले न्यायाच्या आशेत खितपत पडलेले कैदी कमालीचे दु:खी झाले असतील.
ससून मधून कोट्यावधींच्या ड्रग्सचे रॅकेट चालवणारा, आजारपणाच्या नावाखाली ससून मध्ये दाखल झालेला ललित पाटील फरार झाला. जून महिन्यापासून रुग्णालयात राहून तो ड्रग्ज रॅकेट चालवत होता. ससूनमधून चालणारं अमली पदार्थ तस्करीचं रॅकेट गुन्हे शाखेनं उघड केलं. रुग्णालयातून पाटील पळाला. ससून रुग्णालयाच्या कारभारावर वादळी टीका झाली.
ससून रुग्णालयात १६ नंबर वाॅर्ड पूर्वीपासून कुप्रसिद्ध. इथं वैद्यकीय कारणाखाली दाखल झालेल्या गुन्हेगारांना खरोखरच आजार असतात का की येरवडा कारागृहात असलेल्या डाॅक्टरांना मलई खाऊ घातली की त्यांना आजार जडतात? ससूनच्या या कैदी असलेल्या वार्डात कैदी रुग्णांना सुविधा पुरविल्या जातात. कैद्याला रुग्णालयात नेण्याचा दाखला देणाऱ्या डॉक्टरांपासून वॉर्डमध्ये पहारा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांपर्यंत आणि ससूनच्या काही कर्मचाऱ्यांपर्यंत एक साखळीच मालदार कैद्यांच्या सेवेत गुरफटलेली असते.
कैद्यांना कारागृहातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांची आरोपी पार्टी असते. वैद्यकीय उपचारासाठी दाखल झालेल्या कैद्यांसाठी गार्ड असतात. या दोन्ही ठिकाणी पोलिसांच्या हजेरीतच गुन्हेगारांना मोबाईल, दारु, सारख्या सुविधा मिळतात. शनिवारी-रविवारीच मालदार कैदी, गुन्हेगार उपचारासाठी कारागृहाच्या बाहेर पडतात. कारण या दिवशी मोठ्या पदावरच्या अधिकाऱ्यांची सुटी असते. उपचाराच्या नावाखाली काही कैदी दिवसभर वाॅर्डबाहेर थांबून फोनवर बोलण्याबरोबरच नातेवाइकांच्या भेटीगाठी घेतात. मुंबईतील मोठ्या गुन्ह्यातील वादग्रस्त अधिकारी असलेल्या न्यायालयीन बंद्याला याच वाॅर्डात खास सुविधा पुरविल्या जात होत्या. अशा व्हीआयपी कैद्यांना किरकोळ आजारासाठी कारागृहाच्या रुग्णालयात उपचार का उपलब्ध करून दिले जात नाहीत? की तिथल्या खाटाही मालदार कैद्यांमुळं रिकाम्या नाहीत?
कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यापासून ते डीओ म्हणजे पोलिसांना काम नेमून देणारे ड्यूटी ऑफिसर ते थेट प्रभारी अधिकाऱ्यांना मलई खायला घालून मालदार कैद्यांचे खटाटोप तडीला नेले जातात का? ससून रुग्णालयातील कर्मचारीदेखील यामध्ये सहभागी आहेत का? कर्तव्यावर असलेल्या पोलिसांमध्ये कोणत्या आरोपीची पार्टी करायची, याची चुरस असते. एवढेच नाही तर ते गुन्हेगारदेखील आम्हाला हेच कर्मचारी आरोपी पार्टी म्हणून हवे असल्याचे सांगतात. जेवढी गुन्हेगार पार्टी तगडी तेवढे अधिक मलई असा जणू या साऱ्या भ्रष्ट मामल्यांमध्ये पायंडाच पडलाय.
देशातील बहुतेक कारागृहात सराईत गुन्हेगार, आर्थिक घोटाळ्यातील कैदी किंवा राजकीय आरोपींचा कारागृहात तसंच कारागृहाबाहेर सवलतींसाठी खटाटोप सुरू असतो. पोलिसांना हाताशी धरून सुविधा मिळविल्या जात असल्याचंही नुकतंच भायखळा कारागृहातील निलंबन प्रकरणातून समोर आलंय. या अशा सगळ्या वातावरणात सराईत गुन्हेगार थेट ससून रुग्णालयातूनच ड्रग्ज तस्करीचे रॅकेट चालवत असल्याचा प्रकार समोर आला. आता तरी गुन्हेगारांवर सुविधांची खैरात करणाऱ्यांचा शोध घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी घेणार की नाही. की काही काळानंतर चर्चेचे वादळ शांत झाल्यावर पहिले पाढे पंचावन्न होणार?
ससून रुग्णालयात काही कैदी खरोखरच आजारानिमित्त भरती होतात. परंतु, काही जण ठणठणीत असताना महिनोनमहिने ससून रुग्णालयात सुविधांचा उपचार घेत राहतात. अशा विशेष बंद्याना ठिक होण्यासाठी उशीर का लागतो याची चौकशी आरोग्य विभागाकडून झाली पाहिजे. आता या साऱ्या बेइज्जतीनंतर आरोग्य विभागानं समिती नेमून चौकशी सुरू केली.
या निमित्तानं सामान्य रुग्ण आणि गंभीर, अत्यवस्थ रुग्ण व त्यांचे चेहऱ्यांवर तणाव असलेले नातेवाईक यांना सुलभ वातावरण ससून रुग्णालयात राहता,थांबता येणार की नाही हे पाहणेही गरजेचे. गरजू रुग्णांसाठी वरदान असलेले ससून रुग्णालय गुन्हेगारांसाठी मोकळे रान तर बनणार नाही ना? याची काळजी समाज आणि राज्य कारभार चालवणाऱ्या सर्वांनी घेतली पाहिजे.
खरं तर ससून पुणेकरांमध्ये पूर्वी ढिसाळ वैद्यकीय सेवेमुळे कुप्रसिद्ध होतं. ससून मध्ये दाखल केलेला रुग्ण पुन्हा जिवंत घरी येत नाही असं म्हटलं जायचं. त्यातच ससूनच्या खाटा सदैव भरलेल्या असत. ससून मध्ये रोज येणाऱ्या शेकडो रुग्णांमुळं सुविधांवर ताण येत असे. तिथला कर्मचारी वर्ग उर्मटपणा करत असे. बहुतेक मजल्यांवरची स्वच्छतागृहं घाण आणि दुर्गंधीनं माखलेली असतं. भिंती गुटखा, पान, तंबाखू यांनी माखलेल्या असतं. अर्थात आपली बेजबाबदार आणि बेशिस्त जनता याला कारण होती. रुग्णांचे काही नातेवाईक वाॅर्डाबाहेर मुटकुळं करुन रात्री झोप काढत. एकदा बाळंतीण बायांच्या वाॅर्ड मधून नवजात अर्भक एका अपत्यहिन बाईंनं पळवून नेलं तर शवागारातून एका शवाचं शीरच कोणीतरी कापून नेलं होतं. आता या भयंकर परिस्थितीत बराच बदल झाला आहे. स्वच्छता, सुरक्षितता वाढली आहे. आधुनिक वैद्यकीय साधनांमुळं गंभीर रुग्ण हसत परत घरी जाऊ लागले आहेत. ससून विषयी असलेली वाईट प्रसिध्दी हळूहळू पुसली गेली. ससूनच्या सामाजिक जाणीवा असलेल्या काही वैद्यकीय अधिष्ठात्यांनी परिश्रम पूर्वक ससूनच्या प्रतिमेत बदल करण्यात यश मिळवलं. पण यावर पाणी पडतं ते अशा घटनांनी.


