लेख

संपादकीय लेख : मन नवे असल्याशिवाय नवीन विचार कसे येणार ?

नवीन वर्ष विशेष

‘नवीन वर्ष नेहमीप्रमाणे येते, पण त्याचे स्वागत करण्याच्या पद्धती जुन्या आहेत – तेच फटाके, रंगीबेरंगी पार्ट्या, मादक नृत्य आणि अभिनंदनाच्या शुभेच्छा. हे जुन्या मनाचे लक्षण आहे. मन नवे असल्याशिवाय नवीन विचार कसे करता येतील?

मन कसे नवीन असू शकते? जुन्या आठवणींनी, विचारांनी, अनुभवांनी मनात भरलेला कचरा रिकामा करणे आवश्यक आहे. जोपर्यंत त्याचे ठसे तुमच्या डोळ्यांवर राहतील तोपर्यंत तुम्ही स्पष्ट डोळ्यांनी पाहू शकणार नाही. जर तुम्हाला पाहायचे असेल तर शब्दांचा व्यत्यय आणू नका. अगदी मनापासून पहा. हे पाहून तुमचे डोळे शुद्ध होतील.

दुसरे, वर्तमान क्षणात जगा. एखाद्या व्यक्तीकडे पहा, जर तो ओळखीचा असेल तर जुन्या आठवणी, जुने अनुभव आणू नका. या क्षणी तो आज आहे तसा त्याला पहा. तुम्हाला एक नवीन व्यक्ती दिसेल. एखाद्यामध्ये नवीनता पाहण्यासाठी, आपण नवीन असणे आवश्यक आहे, जे खूप आनंददायक आहे. तुम्हाला रोज ताजे वाटेल. ‘

परमगुरु ओशोंचे हे विचार आहेत. मात्र आपण तसे जगतो का? २०२४ वर्ष उजाडत असताना ३१ डिसेंबर २०२३ च्या रात्री उशिरापर्यंत झालेल्या ओल्या पार्ट्यांमुळं बहुसंख्य लोक १ तारखेला ताजे असत नाहीत. सुरुवातीचे निर्धार आठवड्यात गळून पडतात. कोणी सकाळी पायी फिरायला जाण्याचा निर्धार केलेला असतो. कोणी सिगारेट, तंबाखू किंवा बाटली सोडण्याचा, कोणी न रागावण्याचा तर कोणी वाईट न वागण्याचा. पण हे सगळे निर्धार हळूहळू गळून पडतात. त्याची वेगवेगळी कारणं असतात.

शांत मनानं पुण्यासारख्या शहरात कामधंद्याठी घरातून बाहेर पडावं तर ट्रॅफिक जाम मध्ये अडकून राहावं लागतं आणि चीडचीड सुरु होते. कधी पाणी पुरवठाच वेळेत होत नाही. तर कधी महत्वाचं काम सुरू असताना लाईट जाते. कधीकधी आपल्यापुढून टु व्हिलरवर जाणारं कोणी पचकन गुटखा तंबाखू थुंकतं. कोणी बेदरकारपणे राॅंग साईडनं येतं. कधीकधी बसच वेळेवर येत नाही. या अशा साऱ्या सामाजिक कारणांमुळं मनाची शांतता विस्कटते. व्यसनं, वासना यांचं वैशिष्ट्यच अजून पाहिजे या स्वरुपाचं. मेंदूला त्यांची सवय लागलेली असते. नव्या वर्षात व्यसन सोडण्याचा संकल्प केलेले लोक दुसऱ्या दिवशी पुन्हा तिकडे वळतात.

महाराष्ट्र पोलीस दलाची ६३ वर्षे

२ जानेवारी १९६१ रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना करण्यात आली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला. ऐतिहासिक दिनानिमित्त पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा. त्यांनी गुन्हेगारीला आळा घालून सामान्य लोकांना निर्भय जगता यावे यासाठी काम करावे, हीही नव्या वर्षात अपेक्षा.

सावित्रीबाई फुले; भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक

सावित्रीबाई फुले, ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे एका दलित कुटुंबात जन्मलेल्या या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवेसे आणि आईचे नाव लक्ष्मी होते. शिक्षिका असण्याव्यतिरिक्त, सावित्रीबाई फुले या भारताच्या स्त्री मुक्ती चळवळीच्या पहिल्या नेत्या, समाजसुधारक आणि मराठी कवयित्री होत्या. मुलींच्या शिक्षणासाठी त्यांना समाजाच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. अनेकवेळा त्यांना सवर्ण, सनातनी लोकांच्या दगडफेकीलाही सामोरे जावे लागले. १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतीराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. वाड्याच्या जागी राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी गेल्या तेरा वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्याला पूर्णविराम मिळाला.

भिडे वाडा महापालिका प्रशासनाने ताब्यात घेतला. सर्वोच्च न्यायालयाने दोन नोव्हेंबरला भिडे वाड्याची जागा महिनाभरात पालिकेच्या ताब्यात देण्याचा आदेश याचिकाकर्त्यांना दिला होता. त्यानुसार, प्रशासनाने भिडे वाड्यातील व्यावसायिकांना सकाळी नोटिसा बजावल्या आणि रात्री उशिरा बांधकामे पाडून जागा ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली. भिडे वाड्याच्या जागी राष्ट्रीय स्मारक नव्या वर्षात आकाराला येवो ही अपेक्षा.

अशीच प्रेमळ साथ हवी आहे

सर्वात शेवटी, माणसं भेटतं गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो. आपण या वर्षात माझ्या सुख दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात याबद्दल मी तुमचा आभारी आहे. या वर्षात माझ्याकडून कळत न कळत तुमचे मनं दुखावले असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा.सगळेच जण काहीतरी नवीन मागतील.मला फक्त तुमची अशीच प्रेमळ साथ हवी आहे.असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असू द्या.

– नरसिंग कांबळे, मुख्य संपादक, महाराष्ट्र मिशन 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page