पोलिसांनी आनंदी, तणावमुक्त राहून कर्तव्य बजावावे; संजय कुमार

पुणे : पोलिसांनी आनंदी आणि तणावमुक्त राहून आपले कर्तव्य बजावणे गरजेचे आहे. पोलिस दलाने आपल्याला खूप काही दिले आहे. त्या विभागासाठी काम करताना आपण काय देतो हे खूप महत्त्वाचे आहे. पोलिसांनी उत्कृष्ट कार्य करून आपल्या विभागाचे नाव उंचवावे, असे आवाहन पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) संजय कुमार यांनी केले. पोलिस संशोधन केंद्र (सीपीआर) येथे सोमवारी पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह आणि विशेष सेवा पदक विजेत्यांना पोलिस महासंचालक संजय कुमार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी ते बोलत होते. पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, अतिरिक्त आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम) राजेंद्र डहाळे, रोषिता संजय कुमार, अनुप्रिया रितेश कुमार, पोलिस अधीक्षक ज्योती क्षीरसागर आदी या वेळी उपस्थित होते. संजय कुमार म्हणाले, पदक विजेत्या पोलिसांनी यापुढेही चांगली सेवा बजावावी. केवळ परिश्रम केल्यामुळे यश मिळत नाही. तर, यशासाठी आवश्यक घटकांपैकी एक आहे. जीवनात यश आणि अपयश मिळत असते. परंतु आनंदी राहणे जीवनाचा एक भाग असावा. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पदक विजेत्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, पोलिस महासंचालक संजय कुमार हे ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी पोलिस दलात सर्वोत्कृष्ट अधिकारी म्हणून कार्य केले आहे. भविष्यातही त्यांच्या अनुभवाचा सर्वांना फायदा होइल. अतिरिक्त आयुक्त डॉ. सुपेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी २८ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह- २०२० (पदक) आणि १५ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गडचिरोली येथे नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल विशेष सेवा पदकाने गौरविण्यात आले.




