लेख

संपादकीय लेख: चेहऱ्यावर बुरखे घालून धिंड काढण्याने निर्लज्ज गुन्हेगार वठणीवर येतील? 

गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला, नाना पेठेत रक्त सांडले. १८ वर्षीय आयुष गणेश कोमकर, बंडूचा नातू आणि गणेश कोमकरचा मुलगा‌ आहे. ट्यूशननंतर घरी परतत असताना बेसमेंट पार्किंगमध्ये दोन बाईकवर आलेल्या हल्लेखोरांनी ९-११ गोळ्या झाडल्या. शरीरातून ९ गोळ्या बाहेर पडल्या, तो जागीच ठार झाला. यामुळे पुण्याच्या नाना पेठेत दहशत माजवणाऱ्या आंदेकर टोळीचा रक्तरंजित इतिहास पुन्हा समोर आला आहे. वर्चस्व राखण्यासाठी गुन्हेगार रक्ताच्या नात्यातल्या कोवळ्या पोरांनाही सोडत नाहीत हे दिसून आले आहे. या गुन्हेगारांमध्ये माणुसकी ऐवजी पशूत्व ठायीठायी भरलेले आहे हेही दिसून येते.

नाना, भवानी पेठेतील आंदेकर टोळीचा म्होरक्या असलेल्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याच्या घराची पुणे पोलिसांनी झडती घेतली. यावेळी त्याच्या घरातून मोठे घबाड सापडले. पोलिसांना आंदेकरच्या घरातून रोख रकमेसह सोने-चांदीचे दागिने,विसार पावत्या , कुलमुखत्यारपत्र, साठेखत अशा गोष्टी सापडल्या.

बंडू आंदेकर, अमन पठाण, यश पाटील, वृंदावनी, स्वराज व तुषार वाडेकर कुटुंबीय यांच्या घराची झडती घेतली. या झडतीत वृंदावनी, स्वराज आणि तुषार यांच्या घरातून २१ हजार रोख, १६ मोबाईल, दागिन्यांच्या पावत्या आणि दुचाकी जप्त करण्यात आली, तर टोळीचा म्होरक्या बंडूच्या घरातून ७७० ग्रॅम सोन्याचे दागिने, त्याची आजच्या बाजार भावानुसार ८५ लाखांहून अधिक किंमत आहे. ३१ हजार रुपयांची चांदी आणि २ लाख ४५ हजारांची रोकड पोलिसांनी जप्त केली. मध्यरात्रीपासून पहाटे चारपर्यंत बंडू आंदेकरच्या घराची झडती सुरू होती. आंदेकरने घराच्या शंभर मीटर परिसरात २५ पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचे पोलिसांना दिसून आले.

५ सप्टेंबर रोजी बंडू आंदेकर याची मुलगी कल्याणी हिचा मुलगा आयुष कोमकर याच्यावर गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. याप्रकरणात बंडू आंदेकरसह त्याच्या टोळीतील आठ जणांना पोलिसांनी अटक केली. आहे. सर्वांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. या घटनेनंतर पुण्यात आंदेकरच्या टोळीतील फुटीर आणि आंदेकर मध्ये पुन्हा टोळी युद्ध पेटण्याची भीती व्यक्त होत आहे.

१९८० च्या दशकात पुणे शहरात अनेक छोट्या-मोठ्या टोळ्या होत्या. जुगाराच्या अड्डे, दारूची अवैध विक्री आणि खंडणी ही मुख्य कमाई होती. सायकलच्या चेन, रामपूरी चाकू, तलवार आणि सोडा वॉटरच्या बाटल्या  हीच शस्त्रे वापरून टोळ्या आपले वर्चस्व सिद्ध करत होत्या. यातच आंदेकर टोळीची किड पुण्याला पोखरु लागली. या टोळीचा म्होरक्या होता बाळू आंदेकर. गुरुवार पेठ, नाना पेठ, भवानी पेठ आणि गंज पेठ या भागात या टोळीची पकड मजबूत झाली. सुरुवातीला ही टोळी माळवदकर गँगची मित्र होती, पण वर्चस्वाच्या लढाईतून शत्रू झाली.

१९८४ मध्ये बाळू आंदेकरला शिवाजीनगर कोर्टाच्या आवारात प्रमोद माळवदकरने संपवले. त्याच्या वडिलांच्या खुनाचा बदला घेतला आणि गोळ्या घालून हत्या केली. हा खून पुण्याच्या इतिहासातील पहिला मोठा गँगवॉर ठरला. त्यानंतर दहा वर्षे चाललेला माळवदकर-आंदेकर युद्धात सहा गुंड मारले गेले, आणि अनेक हल्ले झाले. १९९७ मध्ये पुणे क्राईम ब्रँचने काळेवाडी येथे प्रमोद माळवदकरचा एनकाऊंटर केला. याने माळवदकर टोळी संपली, पण आंदेकर टोळी मात्र मजबूत झाली. बाळूच्या चुलत भावाने सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकरने (६८ वर्षे) सूत्रे हातात घेतली. बंडूने पुण्याच्या अंडरवर्ल्डवर कंट्रोल मिळवला. बंडू आंदेकरवर फरासखाना पोलीस स्टेशनशी संबंधित खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झाली. तो तुरुंगात गेल्याने टोळी कमकुवत झाली.

पुण्याचे तत्कालीन कारभारी सुरेश कलमाडी यांनी पुण्यात वर्चस्व ठेवण्यासाठी झोपडपट्ट्या, गुन्हेगारी टोळ्यांना काॅंग्रेस मध्ये आश्रय देणे सुरू केले. १९९७ च्या पुणे महानगरपालिका निवडणुकीने आंदेकर टोळीला नवे रूप दिले. चार टोळकी नगरसेवक झाली., त्यात वत्सला आंदेकर, बंडूची चुलत बहीण १९९८-९९ मध्ये पुण्याची महापौर झाली. तिला “अक्का” म्हणून ओळखले जात असे. तिने गुन्हेगारीपासून अलिप्त राहून राजकारण केले, पण तिचे भाऊ मात्र विरोधकांना संपवत राहिले.

उदयकांत आंदेकर (१९९२ मध्ये नगरसेवक), राजश्री आंदेकर (२००७ आणि २०१२ मध्ये नगरसेविका) आणि वनराज आंदेकर (२०१७ मध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक) हे सर्व एका घराच्या कुटुंबातील राजकीय चेहरे बनले. पण राजकारण हा फक्त मुखवटा होता. मागे पडद्याआड खंडणी, हप्ते बाजी, गांजा, गावठी दारूचे धंदे ही गुन्हेगारी सुरूच राहिली. बंडूचे मुलगे वनराज आणि कृष्णा आंदेकर यांनी टोळीची सूत्रे घेतली. २००९ मध्ये दोघांनाही शहराबाहेर हाकलण्यात आले. बंडू बाहेर आल्यावर टोळी पुन्हा वाढली, पण इतर टोळ्यांशी संघर्ष वाढला.

१ सप्टेंबर २०२४ रोजी नाना पेठेतील डोके तालिमीजवळ वनराज आंदेकरची निर्घृण हत्या झाली. रात्री ९ वाजता वनराज आपल्या चुलत भाऊ शिवमशी बोलत असताना १०-१५ तरुणांनी सहा बाईकवर येऊन हल्ला केला. पाच गोळ्या झाडल्या, कोयत्याने डोके फोडले. हल्लेखोरांनी रस्त्याची वीज बंद केली आणि वनराजला वेढा घातला. तो जागीच ठार झाला. वनराजच्या हत्येला त्यांच्या घरातील कौटुंबिक कलह कारणीभूत असल्याचे समोर आले.

वनराजच्या दोन बहिणी संजीवनी आणि कल्याणी त्यांच्या पती जयंत आणि गणेश कोमकर यांच्याशी त्याचा संपत्तीवरुन वाद झाला. संजीवनीच्या छोट्याशा दुकानावर अतिक्रमण कारवाई झाली. जी वनराजने नगरसेवक असताना केली असल्याचा संशय होता. ३१ ऑगस्टला पोलीस स्टेशनमध्ये वाद झाला, संजीवनीने तुला सोडणार नाही अशी धमकी दिली होती.

त्यानंतर वनराजच्या हत्येचा कट  सोमनाथ गायकवाड आणि साथीदारांनी कट रचला. या सोमनाथ गायकवाडने २०२१ मध्ये टोळी सोडली आणि आंबेगाव पठारात स्वतंत्र गँग उभी केली. २०२३ मध्ये गायकवाडच्या मित्र निखिल अखाडेचा खून आंदेकर टोळीने केला होता, त्याचा बदला हा होता. त्यासाठी तो या कटामध्ये सहभागी झाला.

१९८० ते २०२५ या काळात पुण्याचा मोठ्या प्रमाणात कायापालट झाला. ठिकठिकाणी उपनगरे वाढली. बेकायदेशीर वस्त्या, झोपडपट्ट्या आणि तेथे आलेला हातभट्टी, गांजा, जुगार अशा धंद्यांना ऊत, कोयता गॅंग सारख्या प्राणघातक टोळ्यांचा प्रचंड वाढलेला उपद्रव अशा पार्श्वभूमीवर पारंपरिक गुन्हेगारी टोळ्यांचा वर्चस्ववादावरुन सुरू झालेला खूनखराबा यामुळे सामान्य माणसाला भयमुक्त वातावरणात राहणे कठीण वाटू लागले आहे.

अत्यंत घातक टोळ्यांवर पोलीस ‘मकोका’ सारखी कठोर कारवाई वापरत आहेत, पण साक्षीदार भीतीने बोलत नाहीत. सोशल मीडियावर धमक्या येतात, रील्समध्ये शस्त्रे दाखवतात. हे नाना पेठेपासून शहरात ठिकठिकाणी पसरलेले आणि पोसले जाणारे गॅंगवार संपणार नाही. वाहनांची तोडफोड करून दहशत माजवण्यापासून जमिनी बळकावण्यापर्यंत छोट्या मोठ्या टोळ्यांचा वाढलेला उपद्रव राज्यकर्ते आणि पोलिसांनी कठोरपणे संपवला पाहिजे. काही मानवी हक्कांचे कारण पुढे करून पुणे पोलिसांना गुन्हेगारांना भर रस्त्यात फटकावता येत नसेल. चेहऱ्यावर बुरखे घालून गल्लीत धिंड काढण्याने निर्लज्ज गुन्हेगार वठणीवर येणार नाहीत. आंदेकर टोळीच्या छोट्या मोठ्या पडछाया उन्मत्त झालेल्या आहेत हे वास्तव आहे.

गुन्हेगारी आणि राजकारणी यांच्या अभद्र युतीचे युग सध्या चालू आहे. सामान्य माणसाला मोकळा श्वास घेता यावा यासाठी गुन्हेगारांची पाळेमुळे निर्दयपणे उखडून काढल्याशिवाय कोणताही उपाय नाही. त्यामुळे निवडणुकांच्या कैफातून बाहेर येऊन सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र पोलिसांचा वचक दाखवून देणे ही काळाची गरज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page