सुप्रिया सुळेंच्या गाडीला मराठा आंदोलकांचा घेराव, शरद पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी

मुंबई : मनोज जरांगे सध्या मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. काहीही झाले तरी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. जरांगे यांच्या या भूमिकेमुळे राज्य सरकारपुढे नवा पेच निर्माण झाला आहे. राज्यातील एक एक नेता जरांगे यांची भेट घेत आहे. त्यात खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील आझाद मैदानात दाऊन जरांगे यांची भेट घेतली. या भेटीनंतर मात्र काही मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात घोषणाबाजी करत गोंधळ घातला.
सुप्रिया सुळे रविवारी आझाद मैदानावर मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. भेट झाल्यानंतर सुळे आझाद मैदानावरून त्यांच्या कारकडे निघाल्या होत्या. मात्र काही मराठा आंदोलकांनी त्यांना घेरले आणि एक मराठा-लाख मराठा असी घोषणाबाजी केली. काही आंदोलकांनी तर खासदार शरद पवार यांच्याविरोधातही घोषणाबाजी केली. या सर्व प्रकारामुळे जरांगे यांच्या आंदोलनाच्या परिसरात काही काळासाठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र काही मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांना वाट काढून दिली आणि त्यांना कारपर्यंत पोहोचवलं.
मराठा आंदोलक आक्रमक झाल्यानंतर सुप्रिया सुळे मात्र शांत होत्या. त्यांनी प्रत्येक आंदोलकाला हसतमुखाने नमस्कार केला. तसेच प्रत्येकाच्या हातात हात मिळवला. सर्वांनाच नमस्कार करून त्या नंतर कारमधून निघून गेल्या. नंतर आंदोलकांनी त्यांच्या कारचाही पाठलाग केला. त्यांच्या कारलाही आंदोलकांनी घेराव घातला आणि जोरदार घोषणाबाजी केली. या सर्व घडामोडीमुळे सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पण काही आंदोलकांनी भान राखून सुळे यांच्या कारला वाट करून दिली.
सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
खासदार सुळे म्हणाल्या, “मनोज जरांगे यांच्यासह सर्व मराठा आंदोलकांचा निरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणं ही आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना माजी हात जोडून विनंती आहे की सर्वपक्षीय नेत्यांना बोलवा, बैठक बोलवा, विधानसभेचं एकदिवसीय अधिवेशन बोलवा आणि मराठा आरक्षणावर मार्ग काढा.”
हुडदंगबाजी करून काहीच मिळणार नाही – मुख्यमंत्री फडणवीस
आंदोलकांनी खासदार सुप्रिया सुळे यांना घेराव घातल्याच्या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “असं करणं योग्य नाही. शेवटी कुठलेही नेते आंदोलनस्थळी आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी गेले असतील तर त्यांना योग्य वागणूक मिळायला हवी. त्यांना घेराव घालणं, बाटल्या फेकणे हे असले प्रकार करून, हुडदंगबाजी करून काहीच मिळणार नाही.”



