संपादकीय अग्रलेख

प्रशांत जगताप; तुम्ही मतदारांची लाज ठेवलीत!

कोरोना महामारीनंतरही साऱ्या सामाजिक वातावरणाला अवकळा आली. कोणत्याही प्रकारे, कशाही परिस्थितीत ग्रामपंचायतीपासून ते विधीमंडळातल्या सत्तेपर्यंत खुर्ची मिळवण्यासाठी मूल्य, तत्व, निष्ठा या साऱ्या गोष्टी गुंडाळून ठेवल्या गेल्या. कधी नव्हे इतके वेगवेगळ्या विचारसरणी पक्ष एकत्र आले. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली. काॅंग्रेसने सुध्दा त्यांना साथ देत महाविकास आघाडीचा प्रयोग पुढे नेला. कालांतराने तिकडे भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादीत पध्दतशीर फूट पाडत महायुतीचे राजकारण सुरू केले.

आज राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीच्या वातावरणात कोणता नेता कोणत्या पक्षात आहे हेच कळेनासे झाले आहे. पुणे हे नेहमीच सर्वधर्मसमभावाचे प्रतीक राहिले आहे. या शहरातील समाजाने नेहमीच लोकशाही मूल्यांवर, संविधानावर आणि धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवला आहे. मतभेद असले तरी संवाद, संयम आणि मतपेटीच्या माध्यमातून आपली भूमिका मांडण्याची परंपरा या समाजाने जोपासली आहे.

पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून सर्व अटकळींना पूर्णविराम दिला. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करू शकते अशा शक्यतेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख असलेले जगताप यांनी युतीला विरोध केला होता. दोन वेळा माजी नगरसेवक राहिलेले जगताप राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना महापौर होते. पक्ष फुटण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख होते. शरद पवार यांच्या जवळचे राहिले. जगतापांचा निर्णय वानवडी आणि हडपसर मतदारसंघातील मतदारांच्या हिताचा आहे, ज्यांनी त्यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत धर्मनिरपेक्ष विचारसरणीवर आधारित त्यांना पाठिंबा दिला.

जगतापांच्या काँग्रेसमध्ये प्रवेशामुळे पुणे महानगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या आशा वाढल्या आहेत. निवडणुका १५ जानेवारी रोजी होत आहेत आणि अशा वेळी येत आहेत जेव्हा अनेक काँग्रेस उमेदवार इतर पक्षांमध्ये सामील झाले आहेत. २०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला फक्त नऊ जागा मिळाल्या, त्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेपेक्षा कमी आहेत.

कोंढव्यात जुना प्रभाग क्रमांक २७ मध्ये अजित पवार गटाचे ३ मुस्लिम नगरसेवक असताना चेतन तुपे यांना फक्त २६०० तर प्रशांत जगतापांना २८००० हजार मतदान दिले होते. हे मतदान केवळ एखाद्या उमेदवाराच्या बाजूने नव्हते, तर ते एका विचारसरणीच्या समर्थनार्थ होते. धर्मनिरपेक्षतेच्या समर्थनार्थ,

संविधानाच्या मूल्यांच्या समर्थनार्थ, आणि राजकारणात नैतिकतेची जागा असावी, या विश्वासाच्या समर्थनार्थ. हा मतदानाचा कौल अजित पवारांसाठी एक इशारा होता की सत्तेचे समीकरण जुळवताना समाजाचा विश्वास दुर्लक्षित करता येत नाही.

शिवसेनेच्या दोन्ही गटांनी जगताप यांना त्यांच्यात सामील होण्यासाठी आमंत्रित केले होते. शिवसेना ‘उबाठा’ कडूनही जगताप यांना आमंत्रित करण्यात आले होते, परंतु कोणत्या पक्षात सामील व्हायचे हा त्यांचा स्वतःचा निर्णय होता. जर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत, जी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा भाग आहे सोबत युती केली तर त्यांनी महापालिका निवडणुकीदरम्यान त्यापासून अंतर राखले पाहिजे, असा शिवसेनेलाही वाटत होते.

जगतापांनी धर्मनिरपेक्ष विचारसरणीवर आधारित पाठिंबा मागितला होता. तो ते कायम ठेवू इच्छितात आणि समर्थकांना किंवा मतदारांना खात्री देऊ इच्छितात की आपण यासाठी वचनबद्ध आहोत. विश्वासघात करू शकत नाही. काँग्रेस धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे पालन करते, म्हणून त्यांच्या पुढील राजकीय प्रवासासाठी ती पहिली पसंती होती.

या संपूर्ण प्रक्रियेत प्रशांत जगतापांनी या सर्व मतदारांची लाज ठेवली. हा केवळ एक वाक्प्रचार नाही, तर समाजाच्या अपेक्षांना न्याय देणाऱ्या भूमिकेची पावती आहे. राजकारणात विश्वास तुटलेला असताना, मतदारांनी दाखवलेला हा विश्वास जपणे ही मोठी जबाबदारी असते, आणि ती जबाबदारी योग्य प्रकारे निभावली गेली, हीच समाधानाची बाब आहे.

अजित पवार हे नाव अनेक वर्षे पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष राजकारणाशी जोडले गेले होते. शरद पवारांच्या विचारसरणीचा वारसा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. अल्पसंख्याक समाजातही अजित पवारांबद्दल एक विश्वास होता की ते कोणत्याही परिस्थितीत धर्मनिरपेक्षतेची कास सोडणार नाहीत. परंतु जेव्हा अजित पवारांनी धर्माधारित राजकारण करणाऱ्या पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा महाराष्ट्रातील दलित, मुस्लिम समाजाला हा निर्णय केवळ राजकीय नव्हे, तर भावनिक धक्का देणारा वाटला. हा निर्णय सत्तेसाठी असू शकतो, राजकीय गणितासाठी असू शकतो; पण तो निर्णय अनेकांच्या मनातील विश्वास तुटण्यास कारणीभूत ठरला.

राष्ट्रवादी काँग्रेस हा शरदचंद्र पवार असो की अजित पवारांचा, ९० टक्के पक्ष अजितदादांमुळे सत्तेत आहे. २-३ पेक्षा सुद्धा कधीच निवडून न येणारे १० पेक्षा जास्त राज्यसभा धरून खासदार झाले. आमदारांची संख्या वाढली. बाकी सुप्रिया सुळे खासदार राहील्याच. रोहित पवार आमदार आहेतच. सगळे काही पहिल्यापेक्षा एकदम छान आहे. राग फक्त धनंजय मुंडे,छगन भुजबळ,हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांच्यावर आहे. बाकी प्रशांत जगताप सारखे तोफेच्या तोंडी दिले गेले. पण तात्विक लढाई ते कायम लढणार हे त्यांनी दाखवून दिले.

फक्त पवार साहेबांच्या संगतीने उद्धव ठाकरेंचे सगळे गणित अवघड झाले. खरे तर त्यांचे गणित भाजप युती सोबत अवघड झाले नसते. पण त्यांना कपाळमोक्ष करून घ्यायचा होता. आता मुंबई हातची जाऊ नये म्हणून ते राज ठाकरेंसोबत गेलेत. आता पाहू या की मुंबईकर मराठी माणूस त्यांच्या संधीसाधू राजकारणाला साथ देतो की भाजपच्या हाती मुंबई देतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page