नागपुर

ई-पॉसमधील तांत्रिक बिघाडामुळे रेशनिंगचे धान्यवाटप ७ दिवस रखडले

नागपूर :- ई-पॉस मशिनमधील तांत्रिक बिघाडामुळे महाराष्ट्रात रेशनिंगच्या धान्याचे वाटप ठप्प झाले आहे. ई-पॉस मशिन गेल्या आठवड्यापासून बंद असल्याने ३ महिन्यांचे धान्य वाटप रखडले असल्याचे समोर आले आहे.

तांत्रिक माहिती अपडेट नसल्याने ग्राहकांना धान्य मिळण्यात अडचण येत असून ९ एप्रिल उलटूनही राज्यात अनेक ठिकाणी धान्य वितरण सुरू झाले नसल्यामुळे सामान्य नागरिकांची मोठी परवड होत असल्याचे चित्र आहे.

केंद्र सरकारने ३ महिन्यांचे धान्य एकत्रित देण्याचे निर्देश दिले होते मात्र राज्यातील यंत्रणा तयार नसल्याने गोंधळ उडाला असून याचा परिणाम अनेक दिवसांपासून रेशन दुकाने बंद आहेत. ऐन सणासुदीच्या दिवसात नागरिकांना तांदूळ आणि गव्हासाठी वाट पाहावी लागत आहे.

ई-पॉस मशिन बंद असल्याने येथील स्वस्त धान्य दुकानदारांकडे धान्य उपलब्ध असूनही शिधापत्रिका धारकांना त्यांच्या हक्काच्या धान्यापासून मुकावे लागत आहे.

शासनाने गरिबांसाठी पाठवलेले स्वस्त धान्य त्यांच्या पर्यंत न पोहोचता काळ्या बाजारात पोहोचत असल्याच्या राज्यभरातून तक्रारी प्राप्त होत असल्याने शासनाने बायोमेट्रिक द्वारा धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला होता.

शासनाकडून २०१७ मध्ये ई-पॉस यंत्रणेसाठी एनआयसी नवी दिल्ली या कंपनीकडून ई-पॉस मशीन दुकानदारांना दिल्या गेल्या आहेत.मात्र या मशीन कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे वारंवार तांत्रिक अडचणी येत आहेत.

तसेच या मशीनची देखभाल दुरुस्ती करण्याचे काम बंगळुरू येथील एका कंपनीला दिले आहे. देखभालीची सर्व जबाबदारी या कंपनीकडे सोपवली आहे. ई-पॉसचा वापर सुरू झाला तेव्हा टु-जी इंटरनेट वापरले जात होते. त्यामुळे ई-पॉस मशीनमध्ये टु-जी यंत्रणेचा वापर केला होता. २०२० पर्यंत या मशीन व्यवस्थित सुरू होत्या. मात्र आता फोर-जी यंत्रणेचा वापर सुरू झाला असून, लवकरच फाईव्ह-जीचा वापरदेखील केला जाणार आहे.
मशीन सुरू नसल्यामुळे धान्य वितरण करणे अशक्य झाल्याचे दुकानदारांनी सांगितले आहे.

या समस्येमुळे नागरिक धान्यापासून वंचित राहत असून प्रशासनाने तातडीने ई-पॉस मशीन दुरुस्त करण्याची मागणी जोर धरत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page