सिंहस्थ कुंभमेळ्यात केवळ हिंदूंनीच स्टॉल लावावेत नीतेश राणे यांचे प्रक्षोभक वक्तव्य; भाजप महिला खासदारांचीही तेढ निर्माण करणारी वक्तव्ये

मुंबई : नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात केवळ हिंदूंनीच स्टॉल लावावेत. इतरांनी लावले तर ते उखडून टाका, असे प्रक्षोभक विधान राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी केले आहे.
तर दुसरीकडे पुण्यातील राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आपण कट्टर हिंदू आहोत हे प्रदर्शन करण्यासाठी काही कृत्ये करत असल्याने मुस्लिम समाजात अस्वस्थता आहे.
राणे यांच्या विधानामुळे राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. दरम्यान , पुणे शहरात सामाजिक व धार्मिक सलोखा बिघडविणाऱ्या वक्तव्यांबाबत तात्काळ चौकशी करून खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत मनपा शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे केली.
नाशिक येथे लवकरच सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या मेळ्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नीतेश राणे यांनी जहाल विधान केले आहे. त्यांच्या हस्ते नाशिक येथे हिंदू हित रक्षाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या हिंदू व्यावसायिक कामगारांच्या सूचीचे प्रकाशन झाले. यावेळी त्यांनी कुंभमेळ्यात हिंदू वगळता इतर कुणी स्टॉल लावले तर ते उखडून टाकण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, ”हिंदूंनी हिंदूंकडून खरेदी केली पाहिजे, ही संकल्पना ज्यांनी मांडली त्यांचे मी स्वागत करतो. मी धारघरला अशीच भूमिका मांडली. आजूबाजूला जिहादी लोकांची दुकाने होती. तेव्हा मी बोललो. त्यानंतर माध्यमांनी मला झोड-झोड झोडले. पण मला तेव्हाही काही वाटले नाही. मला आताही काही वाटत नाही हिंदू राष्ट्रात हिंदूबाबतच बोलायचे नाही, तर मग पाकिस्तान, इस्लामाबादवर बोलायचे का? ते आम्ही धर्माधर्मात भांडणे लावतो असे म्हणतात. ते जे बोलतात ते त्यांनी येऊन सांगावे.”
नीतेश राणे म्हणाले, कुंभमेळ्याच्या निमित्ताने कुणीही हिंदूंशिवाय दुकाने लावणार नाही. सध्या रमजान सुरू आहे. त्यांच्या अन्नपदार्थाची दुकाने लागतील. तिथे एकतरी हिंदू माणूस शोधून दाखवा एकही सापडणार नाही. त्यांच्या कुराणमध्ये असे लिहिले आहे की, काफिरांकडून काहीही घ्यायचे नाही. त्यामुळे ते तसे वागतात. मग आम्ही जे काही करतो ते त्याहून वेगळे आहे का?
बाहेर दुकानाचे नाव वेगळे अन् आत अब्दुल
नीतेश राणे यांनी यावेळी बोलताना पुढे म्हणाले, सध्या कुंभमेळ्याची कामे जोरात सुरू आहेत. मी तुमच्या मागण्या सरकारकडे देतो पण सिंहस्थ कुंभमेळ्यात एकही जिहादी आला नाही पाहिजे. त्याला धाक, भीती वाटली पाहिजे. मी मागे त्र्यंबकेश्वरला गेलो होतो. तिथे दुकानावर नाव वेगळे होते, पण आतमध्ये अब्दुल बसला होता. त्यांना आता विषय कळला आहे. आम्ही आता देशभरात हिंदूंनी हिंदूंकडूनच वस्तू विकत घेण्याचा कार्यक्रम राबवणार आहोत.
धार्मिक सलोखा बिघडविणाऱ्या वक्तव्यांनी मेधा कुलकर्णींही वादग्रस्त
दर्ग्यामध्ये कार्यकर्ते घेऊन घुसणे, हिरव्या रंगावर भगवा रंग देणे, शनिवार वाड्यातील कबरीवर जाऊन तिथे आरती करणे, मंचर येथे मशिदीत जाऊन देवाचा फोटो लावण्याच्या प्रयत्न करणे, या सर्व गोष्टी मनाला पटत नाहीत. हे प्रसिद्धीसाठी आणि आपण कट्टर हिंदू आहोत हे प्रदर्शन करण्यासाठी पण असू शकते , परंतु शेवटी सगळ्यात पुण्याची शांती भंग होत आहे, असे संगीता तिवारी यांनी तक्रारीत म्हटले आहे.
तिवारी यांनी सांगितले की पुणे शहर हे ऐतिहासिकदृष्ट्या सर्व धर्म, जाती आणि समुदायातील लोकांचे आहे. आम्ही सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने व शांततेने पुण्यात राहतो. पुणे शहर हे पेन्शनरांचे शहर म्हणून ओळखले जाते. परंतु अलीकडील काळात काही राजकीय व्यक्तींमार्फत म्हणजेच कुलकर्णी या सार्वजनिक मंचांवर आणि माध्यमांमध्ये धर्माधर्मात जातीजातीत तेढ निर्माण करणारी वक्तव्ये व कृती करण्यात येत असल्याचे दिसत आहे.
स्फोटक बोलण्याने धार्मिक तेढ निर्माण होण्याची, दंगे होण्याची तसेच कायदा-सुव्यवस्थेला बाधा येण्याची शक्यता निर्माण होत आहे. विशेषतः मेधा कुलकर्णी यांच्या काही सार्वजनिक वक्तव्ये व कृतींविषयी विविध माध्यमांमध्ये चर्चाही झालेली आहे. अशा प्रकारच्या वादग्रस्त विधानांमुळे पुणे शहरातील नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊन समाजातील धार्मिक ऐक्य व सामाजिक सलोखा धोक्यात येऊ शकतो, असे तिवारी यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
शपथभंग करायचा होता तर शपथ घेतली कशाला?
भारतातील लोकप्रतिनिधी (खासदार, आमदार) संसदेत किंवा विधानसभांमध्ये आपले स्थान ग्रहण करण्यापूर्वी संविधानाच्या तिसऱ्या अनुसूचीनुसार शपथ किंवा प्रतिज्ञा घेतात. ही शपथ भारतीय संविधानाप्रती निष्ठा आणि सार्वभौमत्व राखण्याची असते. भारताच्या संविधानाप्रती निष्ठा: कायद्याद्वारे स्थापित भारतीय संविधानावर खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगण्याची शपथ.
सार्वभौमत्व आणि अखंडता: भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता राखण्याची शपथ हे मुद्दे या प्रतिज्ञेत असतात. ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत’ हे तर पहिलीपासून शाळेत शिकवले जाते. मात्र या दोन्ही प्रतिज्ञांचा विसर राणे आणि कुलकर्णी यांना पडला असेल. तेढ निर्माण करण्याची आणि लक्ष वेधून घेण्याची हौस असेल तर शपथ तरी कशाला घेतली, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.



