संपादकीय अग्रलेख

अपघाती मरण आणि थर्ड क्लासची दैना

काश्मीरच्या पहलगाम मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हल्ला झाला. अनेक जण हकनाक बळी पडले. पर्यटक सुरक्षित नाहीत. मुंबईत लोक लोकल ट्रेनमधून रुळावर पडून मरतात. अहमदाबादमध्ये उड्डाणानंतर काही मिनिटांतच प्रवासी विमान तांत्रिक चुकीमुळे कोसळले.‌ प्रवासी, जमिनीवर असलेल्या लोकांसह एकूण मृतांची संख्या ३०० पेक्षा जास्त असू शकते. इकडे रस्त्यांवर वेगवेगळ्या अपघात रोज शेकडो लोक मरतात. भारतासारख्या देशात जेथे रस्ते वाहतुकीमध्ये शिस्तीची बोंब आहे तेथे जितकी माणसे वर्षभरात रस्ते अपघातांमध्ये मरतात, तितकी गेल्या ५० वर्षांत जगभरातील एकूण विमान अपघातांमध्ये मिळूनही दगावलेली नाहीत.

२०२१ या एका वर्षात भारतात रस्ते अपघातांमध्ये २ लाख १४ हजार नागरिक मृत्युमुखी पडले. पत्रसूचना कार्यालयाची २०१८ ते २०२२ अशी पाच वर्षांच्या आकडेवारीची सरासरी वार्षिक दीड लाखाच्या थोडी वर दिसून येते. म्हणजे इतके जण रस्त्यांवर प्राण सोडतात. त्यांच्या कुटुंबियांचे काय हाल होत असतील हे कोणी पाहत नाही. खरोखरच या देशात महानगरांमध्ये काय किंवा खेडोपाड्यांपर्यंत असलेल्या महामार्गांवर मरण स्वस्त झाले आहे. विमानातून प्रवास करणाऱ्यांना सहसा अपघात होत नाहीत, पण झाला तर साऱ्या जगाचे लक्ष वेधले जाते. दुसऱ्यांच्या चुकीमुळे, सरकारी यंत्रणेच्या भिकार कारभारामुळे रस्त्यावर मरणाऱ्यांचे मात्र मेल्यावर सुद्धा हाल असतात. भोवतालच्या अशांत, अस्थिर परिस्थितीत जगणे केव्हाच कठीण झाले होते ते आता क्षणभंगुर सुध्दा असते हे वारंवार दिसून येते आहे.

खरे तर विमान उड्डाणांमध्ये इतर कोणत्याही वाहतूक माध्यमापेक्षा जोखीम सर्वाधिक असते आणि म्हणूनच खबरदारी देखील सर्वाधिक घेतली जाते. तरीही अहमदाबाद सारख्या दुर्घटना घडतात. अहमदाबादहून लंडनला निघालेल्या विमानात एकूण २४२ लोक होते. त्यापैकी १६९ प्रवासी भारतीय होते. याशिवाय विमानात ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक होते. यापैकी फक्त एक ब्रिटिश भारतीय नागरिक विश्वास रमेश कुमार आश्चर्यकारक वाचला. एअर इंडिया विमानाने अहमदाबादमधील सरदार पटेल विमानतळावरून दुपारी १.३८ वाजता लंडनमधील गॅटविक विमानतळासाठी उड्डाण केले. तीन मिनिटातच विमान कोसळले. विमान बोईंगचे ७८७ ड्रीमलायनर होते. वारंवार तक्रारी करूनही, एअर इंडियाच्या सततच्या निष्काळजीपणामुळे अहमदाबाद विमानतळाभोवती २४० हून अधिक प्रवासी बळी गेले. पूर्वी केलेल्या उड्डाणात दिल्लीहून अहमदाबादला आलेले हेच विमान खराब होते. त्याचे थेट वर्णन याच विमानातून प्रवास केलेल्या आता परदेशी असलेल्या आकाश वत्स याने ट्विटमध्ये केले होते, ज्यामध्ये एअर इंडियाला टॅग केले होते. आकाश वत्स दिल्लीहून अहमदाबादला आला तेव्हा विमानात खूप ‘विचित्र’ घडत होते. एसी काम करत नव्हते. टीव्ही स्क्रीन, रिमोट काम करत नव्हते. दुसऱ्या प्रवाशानेही विमानात काही समस्या असल्याचे दाखवण्यासाठी विमानाचे काही फोटो अपलोड केले आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार वेळीच काही ठोस पावले उचलली गेली असती, तांत्रिक बिघाडाच्या चौकशीसाठी विमान तळावर ठेवले असते, तर हा अपघात टाळता आला असता.

अन्य घटनांपैकी मुंबईच्या घाटकोपर रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेनमधून उतरताना एका प्रवाशाचा घसरून मृत्यू झाला. सेंट्रल लाईनवरील घाटकोपर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म १ वर रात्री ८ वाजता हा अपघात झाला. त्यापूर्वी पाच दिवस आधी ठाणे जिल्ह्यात दोन लोकल ट्रेनमधून पडून भर सकाळी ४ प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातात ६ जण जखमीही झाले. दोन गर्दीच्या लोकल ट्रेन एकमेकांना समांतर जात होत्या. गर्दीमुळे आणि कदाचित ट्रॅकच्या तीव्र वळणामुळे, फूटबोर्डवर लटकलेल्या नोकरदारांचा तोल गेला आणि ते रेल्वे ट्रॅकवर पडले. त्यांच्या विषयी विमान अपघाताइतकी तीव्र संवेदना दिसून आली नाही.‌ रेल्वेतून पडून मुंबईत रोज ४ ते ५ जण मरतात. देशात रस्ते अपघाताबाबत पोलीस आणि शासन गंभीर नसल्यामुळे अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या दहा वर्षांत देशभरात झालेल्या अपघातात १५ लाख ३० हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. अपघातांमध्ये बळींच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक आहे. पहिल्या, दुसऱ्या स्थानावर उत्तरप्रदेश आणि तामिळनाडू गेल्या दोन वर्षांपासून कायम आहेत.

देशातील सध्याच्या अराजक व्यवस्थेने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना इतके बेफिकीर केले आहे की ते त्यांच्या जबाबदाऱ्याही विसरले आहेत, मग तो सरकारी नोकर असो वा बिगरसरकारी नोकर, सरकारी कंत्राटदार असो वा सरकारी व्यापारी, सर्वांना पैसे हवे असतात. कोणालाही प्रामाणिकपणे काम करायला आवडत नाही. त्यामुळे जीविताचे आणि पैशाचे प्रचंड नुकसान होते. शेकडो कुटुंबे संकटाच्या खाईत लोटली जातात. पहलगाममध्ये जनतेच्या सुरक्षेसाठी कोणतीही व्यवस्था नव्हती, गुजरात विमान अपघातात आपत्कालीन कामही झाले नाही. आजही मुंबईत लोकल धोकादायक अवस्थेत प्रवाशांना कोंबून धावताहेत. रस्त्यावर प्रचंड प्रमाणात अपघात होत असताना सरकारचा बधीर नाकर्तेपणा घातक ठरतो आहे. अतिरेकी हल्ल्यात जेवढे लोक मरत नाहीत त्याच्या हजारो पटीने सामान्य, निष्पाप लोक मरताहेत हे कधी लक्षात घेणार?

अपघातानंतर सरकारतर्फे जी मदत जाहीर केली जाते ती ५ लाखांपासून १ करोड रुपयांपर्यंत दिसून येते. विमान प्रवास करणारे लोक संपन्न परिस्थितीतील असतात. एसटी बस, रेल्वे अशा सार्वजनिक वाहनांमध्ये कोंबून घेत, लटकत प्रवास करणारे अर्थातच सामान्य परिस्थितीतले लोक असतात. मरणाऱ्यांच्या जीवांची खरे तर कोणी किंमत ठरवू शकत नाही. मात्र सरकारने ती निश्चितच केली आहे. त्यातही हाय क्लास, थर्ड क्लास असा भेद आहेच. मरणाचा सुध्दा दर्जा असतो हे सरकारनेच दाखवून दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page