नवी दिल्ली

रशियन इंधनाची ‘विक्रमी’ आयात; भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट, जागतिक बाजारपेठेत भारताचा दबदबा

नवी दिल्ली : युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाश्चात्य देशांनी रशियावर निर्बंध लादले असताना, भारताने आपल्या ऊर्जा गरजा आणि आर्थिक हिताला प्राधान्य देत रशियाकडून विक्रमी जीवाश्म इंधनाची (फॉसिल फ्यूल) खरेदी केली आहे. मे २०२६ मध्ये भारताने तब्बल ५.८ अब्ज युरो (सुमारे ६.७ अब्ज डॉलर) मूल्याच्या हायड्रोकार्बनची आयात करून जागतिक ऊर्जा बाजारपेठेत आपले स्थान अधिक मजबूत केले आहे.

‘सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर’ (CREA) च्या ताज्या अहवालानुसार, भारताच्या एकूण आयातीत कच्च्या तेलाचा वाटा ८३ टक्के (४.८ अब्ज युरो) इतका मोठा आहे. त्यासोबतच ५५० दशलक्ष युरोची तेल उत्पादने आणि ४२९ दशलक्ष युरोचा कोळसा भारताने रशियाकडून आयात केला आहे. विशेष म्हणजे, मे महिन्यात भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीत मागील महिन्याच्या तुलनेत ८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

महाराष्ट्रासह देशातील रिफायनरींचा वेग वाढला

देशांतर्गत ऊर्जा सुरक्षेसाठी सरकारी आणि खासगी रिफायनरींनी रशियन तेलाची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. गुजरातच्या वाडिनार आणि जामनगर रिफायनरीसोबतच, सरकारी क्षेत्रातील न्यू मंगलोर आणि विशाखापट्टणम येथील रिफायनरींमध्ये पुरवठा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. ओडिशातील पारादीप रिफायनरीने तर गेल्या दोन वर्षांतील अनलोडिंगचा उच्चांक गाठला आहे.

चीन पहिल्या, तर भारत दुसऱ्या क्रमांकावर

रशियाच्या एकूण कच्च्या तेल निर्यातीत चीन पहिल्या क्रमांकावर असून, रशियाने आपल्या एकूण निर्यातीपैकी ५० टक्के तेल चीनला, तर ३६ टक्के तेल भारताला पाठवले आहे. रशियाला मिळालेल्या उत्पन्नापैकी ७ अब्ज युरो चीनकडून, तर भारताकडूनही मोठ्या प्रमाणावर परकीय चलन रशियाला मिळाले आहे.

निर्बंधांना बगल आणि जागतिक व्यापार

अमेरिकेसह पाश्चात्य देशांनी भारताला रशियन तेल खरेदीवर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले होते. मात्र, भारताने स्वस्त दरातील इंधनामुळे आपला ऊर्जा खर्च मर्यादित ठेवला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, रशियन कच्च्या तेलावर प्रक्रिया करून तयार झालेली उत्पादने आता भारत, तुर्की आणि इतर देशांमार्फत युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला निर्यात केली जात आहेत. रिलायन्सच्या जामनगर रिफायनरीसह अनेक ठिकाणांहून ही उत्पादने जागतिक बाजारपेठेत पोहोचत आहेत, ज्यातून हे स्पष्ट होते की, भारताचे ‘ऊर्जा धोरण’ आज जागतिक पुरवठा साखळीचा एक अविभाज्य घटक बनले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page