जेजुरीत भक्तिसागराला उधाण: दीड वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सोमवतीचा सोहळा भाविकांच्या उत्साहात संपन्न

जेजुरी | प्रतिनिधी : अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या तीर्थक्षेत्र जेजुरीत सोमवती अमावस्येनिमित्त भक्तीचा महापूर आला होता. दीड वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सोमवती अमावस्येची पर्वणी मिळाल्याने लाखो भाविकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला. तब्बल तीन लाखांहून अधिक भाविकांनी आज कुलदैवत खंडोबाच्या दर्शनाचा लाभ घेतला.
दीड वर्षांची प्रतीक्षा अन् भाविकांचा जल्लोष
सोमवती अमावस्या आणि त्या निमित्ताने होणारे कऱ्हा स्नान या दुर्मिळ योगासाठी मागील दीड वर्षांपासून भाविक उत्सुक होते. आज पहाटेपासूनच जेजुरी नगरी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषाने दुमदुमली होती. भंडाऱ्याची उधळण आणि देवाच्या नामाचा गजर यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.
पालखी सोहळा आणि कऱ्हा स्नान
रविवारी दुपारी १२:२० वाजता अमावस्येचा पर्वकाळ सुरू झाल्याने, ग्रामस्थांनी रविवारी मध्यरात्रीनंतर २ वाजता पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी काढण्याचा निर्णय घेतला. मानकरी पेशवे यांच्या मार्गदर्शनाखाली पालखीने मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घातली. त्यानंतर चिंचबाग, होळकर ट्रस्टचे गौतमेश्वर मंदिर, जानाई मंदिर चौक आणि शिवाजी महाराज चौक मार्गे हा सोहळा कऱ्हा नदीच्या घाटावर पोहोचला. सकाळी ७ वाजता उत्सवमूर्तींना विधीवत कऱ्हा स्नान घालण्यात आले.
प्रशासनाचे चोख नियोजन
गर्दीचे गांभीर्य लक्षात घेता मंदिर प्रशासनाकडून दर्शन रांगांचे चोख नियोजन करण्यात आले होते. पोलीस प्रशासनाने वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षेसाठी मोठा फौजफाटा तैनात केला होता. भाविकांची वाढती संख्या पाहता पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा आणि सुरक्षिततेसाठी विशेष काळजी घेण्यात आली होती.
दीड वर्षांनंतरच्या या सोमवती यात्रेने जेजुरी गड आणि कऱ्हा नदीचा परिसर भाविकांच्या गर्दीने आणि खंडोबाच्या जयघोषाने पुन्हा एकदा न्हाऊन निघाला होता.



