महाराष्ट्रमुंबईराजकारणसामाजिक

लाडक्या बहि­णींसह शेतक-यांना कर्जमाफीच्या फसवणुकीसह सरकारवर जोरदार टीका

बाळासाहेब थोरातांनी काढले ‘महायुती’चे वाभाडे

अहिल्यानगर : काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजप महायुती सरकारच्या कारभाराचे चांगलेच वाभाडे काढले आहेत.लाडक्या बहि­णींसह शेतक-यांना कर्जमाफीच्या फसवणुकीसह वेगवेगळ्या मुद्यांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुती सरकारवर जोरदार टीका केली. भाजप महायुती सरकारमधील मंत्र्यांनी वागावे कसे, सांगण्याची वेळ आली आहे, हे दुर्दैव आहे, असा टोला देखील बाळासाहेब थोरातांनी लगावला.

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींसाठी २१०० रुपये देण्याची घोषणा केली. त्यांना काही दिले नाही. कर्जमाफीबाबत शेतक-यांना फसवले. आमदारांच्या मारामा-या सुरू आहेत. मंत्र्यांना नीट वागता येत नाही. ती सांगण्याची दुर्दैवाने वेळ आली आहे. अनेक मंत्री पैशांचे घोटाळे करत आहेत. भ्रष्टाचार सुरू आहे. मुख्यमंत्री त्यांच्यावर पांघरूण घालत आहेत. अशी राज्याची दयनीय परिस्थिती असून महायुती ही सत्तेसाठी एकत्र असून, महायुती सरकारमुळे महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे सुरू आहे, असा घणाघात बाळासाहेब थोरात यांनी केला.

मंत्र्यांनी कसे वागावे हे सांगण्याची वेळ येते, हे अत्यंत दुर्दैवी आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे चुकलेच आहेत. अनेक मंत्री घोटाळे करत आहेत. भ्रष्टाचार करत आहेत. आमदारांचा गोळीबार, मारामारी, सत्ताधा-यांची बेताल वक्तव्ये सुरू असताना मुख्यमंत्री त्यांच्यावर पांघरूण घालत आहेत, हे राज्य सरकारचे दुर्दैव आहे, असेही थोरात यांनी म्हटले.

सुप्रीम कोर्टाने तीन हजार कोटींचा घोटाळा निदर्शनास आणून दिला. की वर्क ऑर्डर रद्द करावी लागली, ते कुठेही दाखवले जात नाही. आमदारांचे भाऊ आता गोळीबार करू लागले आहेत. पुरोगामी विचारांचे प्रवीण गायकवाड यांच्यावर हात उचलला गेला आहे. बीडमध्ये मोठी भयानक अवस्था निर्माण झाली आहे. विधान भवनामध्ये गुंड शिरतायेत, हाणामा-या करत आहेत आणि भाजप त्यांना संरक्षण देत आहे हे अत्यंत वाईट आहे, अशी टीका देखील थोरातांनी केली.

लोकशाही मार्गाने आंदोलनाचा अधिकार काढून घेण्यासाठी जन सुरक्षा विधेयक या सरकारने पास करून घेतले आहे. देशामध्ये इतर राज्ये पुढे जात असताना पुरोगामी महाराष्ट्राची आता अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे. लोकशाहीत विरोधकांचे महत्त्व मोठे आहे. परंतु अलीकडे विरोधकांना चिरडून टाकले जात आहे, असा गंभीर आरोप थोरात यांनी केला.

थोरात यांनी निधी वाटपावरून देखील महायुती सरकारवर ताशेरे ओढले, पूर्वी निधी वाटपामध्ये कधीही दुजाभाव केला जात नव्हता. परंतु आता विरोधक आमदारांना शून्य टक्के निधी दिला जात आहे. तो त्रास त्या आमदाराला नसून जनतेला होतोय. राज्यातील कॉन्ट्रॅक्टरचा कामांमधील एक लाख कोटींपेक्षा जास्त निधी देणे बाकी आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना या अत्यंत गोरगरिबांसाठी असलेल्या योजनांसाठी पैसे नाहीत. सात महिन्यांपासून या लोकांना कोणतेही पैसे मिळत नसल्याकडे लक्ष वेधले.

शेतक-यांची पूर्ण कर्जमाफी व लाडक्या बहिणीला २१०० रुपये देण्याची घोषणा केली होती. शेतकरी व महिलांना त्यांनी फसवले आहे. पैसे नाहीत, तर ५७ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या कशा मान्य केल्या, असा सवाल विचारताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी आमदारांना निधी देणार आहेत, हा दुजाभाव होत आहे, असा आरोप थोरात यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page