भटक्या जीवनपद्धतीमुळे बालकांचे शिक्षण खंडित होऊ नये – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, कौशल्य विकास, स्वयंरोजगार आणि आर्थिक सक्षमीकरणाला प्राधान्य देण्याची गरज आहे. या समाजातील कोणत्याही बालकाचे शिक्षण त्यांच्या भटक्या जीवनपद्धतीमुळे बाधित होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले आहे.
फर्ग्युसन महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने आयोजित ‘भटके-विमुक्त दिवस’ या राज्यस्तरीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, भटके-विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धवराव काळे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव आप्पासो धुळाज, संचालक सोनाली मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
‘भटके-विमुक्त दिवस’ हा अन्यायातून मुक्ती, आत्मसन्मान आणि अधिकाराचा दिवस असल्याचे सांगत राज्यपाल वर्मा म्हणाले की, शिक्षण ही या समाजाच्या विकासाची सर्वात मोठी शक्ती आहे. पालकांच्या भटक्या जीवनपद्धतीमुळे मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, यासाठी कुटुंबे जिथे वास्तव्यास असतील तिथेच शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे. वसतिगृहे, आश्रमशाळा, शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक शिक्षणाच्या संधी वाढविण्यासोबतच मुलींच्या शिक्षणाला विशेष प्राधान्य देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
भटके-विमुक्त समाजाला स्थिर निवास, जमिनीचा अधिकार, शिक्षण, आरोग्य आणि शासकीय योजनांचा लाभ घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणी दूर करण्यासाठी जन्म प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र आणि रेशनकार्ड यांसारखी आवश्यक कागदपत्रे सहज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच, या समाजाच्या शेती, शिल्पकला, पशुपालन आणि लोककलेमधील योगदानाचा उल्लेख करत, त्यांच्या पारंपरिक कौशल्यांना आधुनिक तंत्रज्ञान व बाजारपेठेची जोड देऊन युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याचे आवाहन राज्यपाल वर्मा यांनी केले.



