मुंबईकरांचा प्रवास महागला; रिक्षा, टॅक्सीसह सीएनजीच्या दरात वाढ!

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवाशांच्या खिशावर आता महागाईचा आणखी एक भार पडणार आहे. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने ऑटो-रिक्षा आणि काळी-पिवळी टॅक्सीच्या भाडेवाढीस मंजुरी दिली असून, सुधारित दर आज, १ सप्टेंबरपासून लागू झाले आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीसाठी या वाहनांवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
◾ऑटो-रिक्षा: किमान भाडे २६ रुपयांवरून २७ रुपये करण्यात आले असून, प्रति किलोमीटर भाडे १८.२२ रुपये झाले आहे.
◾काळी-पिवळी टॅक्सी: सुरुवातीच्या १.५ किलोमीटर अंतराचे किमान भाडे ३१ रुपयांवरून ३३ रुपये झाले असून, प्रति किलोमीटर भाडे २१.९० रुपये करण्यात आले आहे.
चालकांना सुधारित दरांनुसार भाडे आकारण्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये बदल करणे बंधनकारक आहे. मीटर न बदललेल्या वाहनांच्या चालकांना आरटीओने मंजूर केलेली भाडेतक्ता (चार्ट) प्रदर्शित करून भाडे आकारण्याची मुभा देण्यात आली आहे.
या दरवाढीसोबतच मुंबईत सीएनजीच्या दरातही वाढ झाली आहे. महानगर गॅस लिमिटेडने (MGL) १ सप्टेंबरपासून सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ केल्यामुळे तो ८८ रुपये प्रति किलो झाला आहे. तसेच घरगुती पीएनजीच्या दरात प्रति एससीएम १ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मध्यपूर्वेतील संकट आणि महागड्या आयातीवरील अवलंबित्व यामुळे ही दरवाढ करण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. या सततच्या दरवाढीमुळे चाकरमान्यांच्या दैनंदिन प्रवासाचा खर्च खात्रीने वाढणार आहे.



