पुणे जिल्हा बँकेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा कायापालट; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे गौरवोद्गार!

पुणे : सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास कसा साधायचा, याचे उत्तम उदाहरण पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली या बँकेने अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काढले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने अत्याधुनिक ‘एआय’ (AI) तंत्रज्ञानावर आधारित ‘अजितदादा कृषी समृद्ध योजने’चा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पार पडला. या विशेष कार्यक्रमात शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग करून उत्पादन वाढवणाऱ्या गुणवंत शेतकऱ्यांचा सन्मानही करण्यात आला.
पुणे जिल्हा बँकेच्या या योजनेचा शुभारंभ म्हणजे केवळ एका योजनेची सुरुवात नसून, तो अजितदादांच्या विचारांना खरी आदरांजली आहे, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. या बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ६१,९०० पात्र शेतकऱ्यांना तब्बल ५२३ कोटी २२ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा मोठा लाभ मिळणार असून, बळीराजाचा सन्मान राखण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, हर्षवर्धन पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार शंकर मांडेकर, सत्यशील शेरकर, दिलीप मोहिते पाटील, अशोक पवार यांच्यासह बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे आणि इतर संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी बँकेच्या प्रगतीत अजितदादांच्या योगदानाला उजाळा दिला. १९९१ मध्ये अजितदादा बँकेचे संचालक झाले तेव्हा ठेवी ३१४ कोटी होत्या, ज्या आता वाढून १७,१८९ कोटी १३ लाख रुपयांवर पोहोचल्या आहेत, तर बँकेची उलाढाल ३०,६६७ कोटी ७४ लाख रुपयांवर गेली आहे. पुणे जिल्हा बँक देशातील पहिल्या ५ सहकारी बँकांपैकी एक असून, देशातील अर्थतज्ञांनी तिचा ‘केस स्टडी’ म्हणून अभ्यास करावा, असे ते म्हणाले. या कार्यक्रमात उपस्थित मंत्र्यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत, सकाळी कर्ज अर्जासाठी दिल्यास संध्याकाळी मंजुरी देणारी ही देशातील एकमेव बँक असल्याचे सांगत बँकेच्या वाटचालीचे कौतुक केले.



