कोल्हापुरात ‘दामदुप्पट’च्या नावाखाली ३ कोटींचा गंडा घालणारी महिला ताब्यात

कोल्हापूर : श्रीमंता बाजारच्या माध्यमातून दामदुप्पटचे आमिष
दाखवून तीन कोटींचा गंडा घालणाऱ्या टोळीतील संशयित महिलेला आर्थिक गुन्हे शाखेने पुणे येथून अटक केली.
वैशाली काशिनाथ गुरव (वय ३५, रा. हलकर्णी, ता. गडहिंग्लज) असे महिलेचे नाव आहे. मुख्य सूत्रधार श्रीकांत रामाचार व धर्मेंद्र सिंगर पसार आहेत. न्यायालयाने वैशाली हिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून याप्रकरणी अकरा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गुंतवणूकदारांकडून ३४ हजारांच्या रकमेला पंचाहत्तर दिवसांत दुप्पट रकमेचे आमिष दाखवून गुंतवणूक करून घेण्यात आली होती. या प्रकरणातील सूत्रधार वैशाली गुरव पसार होती.
पुण्यातील चतुःश्रृंगी परिसरात ती असल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक महेश इंगळे यांनी पथकासह छापा टाकून तिला अटक केली.
वैशाली गुरव ही मुख्य सूत्रधार श्रीकांत रामाचार व धर्मेंद्र सिंगरसोबत सुरुवातीपासून कार्यरत आहे. लोकांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी तिने अनेक फंडे अवलंबले होते. तिला मिळालेल्या मोबदल्यातून दोन मोटारीची खरेदी तिने केली होती. तसेच इतर रक्कम मालमत्ता, दागिन्यांत गुंतविल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. मध्य प्रदेशातील तिचा साथीदार सिंगर अद्याप पोलिसांना मिळून आलेला नसल्याने त्याचाही शोध सुरू आहे.
गडहिंग्लमधील काही गुंतवणूकदार सुरुवातीला तिच्याकडे परताव्याची मागणी करण्यासाठी गेले होते. पण, तिने अनेकांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचे तपासात समोर येत आहे. महिला असल्याचा गैरफायदा घेत तिने आजपर्यंत पोलिसांना गुंगारा देत आली आहे.



