संपादकीय अग्रलेख

अग्रलेख: पूजा अन् सजा!

पैशांचा माज, पैसा फेकून वाकवता येणाऱ्या यंत्रणा, जमिनजुमल्याच्या खरेदीतून येणारा बेदरकारपणा, अतिश्रीमंतीचं बटबटीत प्रदर्शन, अशी लागोपाठ उदाहरणं महाराष्ट्रात पहायला मिळाली. पुण्यातलं आगरवाली पोराचं पोर्शे कार हीट अँड रन प्रकरण, मुंबईतल्या वरळीत मिहीर शहा नावाच्या भाजप नेत्याच्या कार्ट्यानं कारची धडक देत २ किलोमीटर फरफटत नेऊन ठार केलेली कोळी कुटुंबातील महिला, अंबानींच्या लाडक्या पोराचं शहेनशाही थाटालाही लाजवेल असं महालग्न आणि पुण्याच्या प्रशिक्षणार्थी आयएएस बाईची मिजास अशा घटनांतून ही उदाहरणं पुढं आली.

प्रत्येक यशामागे काही तरी गुन्हा असतो असं म्हणतात ते खोटं नाही. वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे प्रताप दररोज उघड होत आहेत. भर तिच्या आईच्या दबंगगिरीमुळं पडली. खासगी ऑडी कार वापरल्यानं, परवानगी न घेता ऑडीवर महाराष्ट्र शासन असा स्टिकर आणि अंबर रंगाचा दिवा लावल्यानं, वरिष्ठ अधिकाऱ्याची केबिन बळकावल्यानं पूजा खेडकर वादाच्या भोवऱ्यात सापडली. तिच्या या दबंगपणामागं राजकारणाचं पाठबळ निश्चित आहे. तिची आई पाथर्डीच्या भालगावची सरपंच होती. तर दिलीप खेडकर नावाच्या बापानं नगर जिल्ह्यात थेट लोकसभेची निवडणूक वंचित बहुजन आघाडीकडून लढवली होती. राजकारणात असलेल्या लोकांना आपण राजे महाराजे आहोत,आपलं कोणी काही बिघडवू शकत नाही असा पक्का आत्मविश्वास असतो. त्यातून ते कायदा वाकवतात, सरकारी यंत्रणांना झुकवतात आणि सामान्य लोकांना नागवतात. पूजा खेडकर हे याच मस्तीतून निर्माण झालेलं लाडकं बाळ आहे.

पूजा खेडकरची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती झाली तेव्हा मुलीच्या केबिनसाठी तिचे वडील, माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर अधिकाऱ्यांना दमदाटी करत होते. नॉन क्रिमिलेयर आणि बहुविकलांगता या दोन प्रकारांतून खेडकरची नियुक्ती झाली. ‘यूपीएससी’ने सांगूनही त्या सहा वेळा वैद्यकीय तपासणीसाठी गैरहजर राहिली. तिनं अपंगत्वाचं प्रमाणपत्र नगरच्या जिल्हा सरकारी रुग्णालयातून घेतलं. ते कठोर परीक्षा घेण्यासाठी ख्याती असलेल्या यूपीएससी परीक्षा संचालकांनी मान्य कसं केलं? इथेही काही वशिलेबाजी किंवा दमदाटी होती का? प्रमाणपत्र देणाऱ्यांनी काय तपासणी करून दिलं याची चौकशी झाली पाहिजे. कारण पाणी इथेच मुरायला सुरुवात झाली.

पुण्यात आगरवाली पोराच्या बेधडकपणानंतर त्याच्या बापाला,आजोबाला आणि आईला सुध्दा वेगवेगळ्या कायद्याच्या कचाट्यात अडकवण्यासाठी सरकारनं जणू ससेमिरा लावला. तसाच तो पूजा खेडकरच्या मागे सुध्दा लावला जातो आहे. एक एक प्रकरणं जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस, महानगर पालिका आदी यंत्रणांच्या कारवाईतून पुढे येत आहेत. तिच्या आईनं आणि बापानं काय काय उलथापालथ करुन माजमस्ती करत नको त्या गोष्टी केल्या तेही पुढं येईल. कारण श्रीमंत लोकांविषयी सामान्य लोकांना छुपा मत्सर असतोच, एखादा अतिश्रीमंत किंवा त्याचे बालबच्चे एखाद्या लफड्यात अडकले तर त्यांची पाळंमुळं खोदून काढल्याशिवाय लोक स्वस्थ बसत नाहीत.

पूजाच्या निवडीला केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात (कॅट) आव्हान देण्यात आलं होतं. न्यायाधिकरणानंही पूजाच्या विरोधात निर्णय दिला. बाणेर मधल्या बंगल्याची पाहणी महानगर पालिका करते आहे. ऑडी कारवर वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. पूजा खेडकरनं खासगी कारवर अंबर दिवा लावला होता. त्याचबरोबर महाराष्ट्र शासन अशी पाटी लावली होती. याप्रकरणी पोलीस चौकशी करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. बंगल्याजवळ पोहोचल्यानंतर त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. पोलिसांनी आवाज देऊनही कुणी गेट उघडले नाही. पूजाची आई मनोरमा माध्यमांच्या कॅमेऱ्यांवर धावून गेली.

 

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव?

खेडकर कुटुंबीयांची मुळशी तालुक्यात २५ एकर जमीन आहे. जमीन खरेदी करताना शेजारच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरही अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला. पूजा पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे प्रशिक्षणासाठी असताना पौड पोलीस ठाण्यात गेली. तिच्या कुटुंबीयांनी मुळशीच्या जमिनीबाबत पोलिसांवर दबाव टाकला. नशीब, तिचा बाप आणि आई राजकारणात खूप पुढं आले नाहीत. नाही तर या खेडेकरांनी खूप खोड्या काढून जगाला ताप दिला असता.

लाल दिव्याच्या किंवा अंबर, निळ्या दिव्याच्या गाडीमध्ये बसलेल्या व्हीआयपी मंडळींच्या आलिशान गाडीच्या झगमग दिव्याचा प्रकाश गावोगावी फिरत असतो पण या गाडीत बसलेल्या राजकीय नेत्याच्या किंवा सरकारी अधिकाऱ्याच्या डोक्यात खरोखर जनसेवेचा प्रकाश पडला आहे का ? हा खरा प्रश्न आहे. या अधिकाऱ्यांनी किंवा मंत्र्यांनी सामान्य पीडित,वंचितांना किती आधार दिला आहे आणि किती जणांची आयुष्य सावरली आहेत हे तपासून पाहिलं पाहिजे. अगदी साधी राहणी असलेले आयएएस व, आयपीएस अधिकारी या पार्श्वभूमीवर आठवणीत येतात. पुण्यात पोलीस आयुक्त पदी नियुक्ती झाल्यानंतर सरकारी निवासस्थान वेळीच ताब्यात न मिळाल्यानं धनंजय जाधव सहकुटुंब पोलीस मुख्यालयात एका हाॅलमध्ये विनातक्रार काही दिवस राहिले होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या व्ही.राधा या खेडोपाड्यातल्या महिलांचे प्रश्न समजावून घेण्यासाठी मिसळता यावं म्हणून साध्या साड्या परिधान करत असत.

आता पूजा खेडकर वरील आरोपांच्या चौकशीसाठी केंद्रानं एकसदस्यीय समिती नेमली आहे. ‘झोपा केला आणि बैल गेला’ ही म्हण सरकारनंही खरी केली. बूँद से गयी वो हौद से आती नहीं हे लक्षात घेऊन सरकारने सतर्क राहिले पाहिजे‌ सरकार म्हणून थेट कारभार सांभाळणारे अधिकारी कसे असतात, कसे वागतात याकडे कोणाचंच लक्ष नसतं. यापुढं दुर्लक्ष महागात पडेल. अशीच बेलगामपणाची पूजा ठिकठिकाणी होत राहिल. पूजाच्या निमित्तानं बेबंद वागणाऱ्या बाबूगिरी आणि मॅडमशाहीवर चाप आणण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याची वेळ आताच आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page