संपादकीय अग्रलेख

पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल धक्कादायक आहे. लोक, काँग्रेस व मविआचे नेते, पदाधिकारी, तळागाळातील कार्यकर्ते, पत्रकार यांना हा निकाल अपेक्षित नव्हता. एक्झिट पोल मध्येही भाजपा युती व महाविकास आघाडी यांच्यात ‘काटे की टक्कर’ दिसली. त्यामुळे निकाल अविश्वसनीय वाटतो आहे. ही लढत संघटित व प्रत्यक्ष आर्थिक मदत करणारे विरुद्ध कलहग्रस्त, भविष्यातील आश्वासने देणारे यांच्यात झाली. याचा अटळ परिणाम निकालात दिसून आला. महायुतीची मेहनत आणि विरोधकांना लोकसभेच्या यशाच्या धुंदीतून बाहेर यायला लागलेला वेळ हे जय पराजयाचे खरे कारण आहे. अदानी आणि धारावी हे मुद्दे महाविकास आघाडीला यश देऊ शकले नाहीत.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला जनतेने घवघवीत यश दिले आणि  ५ महिन्यात एवढा बदल कसा झाला याची कारणे शोधली पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काँग्रेस पक्षाने याचा विचार करायला हवा की जिथे एकेकाळी आपल्याला दोनशे वीस जागा मिळायच्या तिथे तो कशाबशा वीसबावीस जागांवर कसे येऊन बसला? काँग्रेसने त्यांच्या आणखी एका संभाव्य विजयाचे अभूतपूर्व पराभवात रूपांतर करून दाखवले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा अत्यंत कमी मताने विजय झाला तर आठ वेळा विजयी झालेले बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांचा पराभव झाला. विरोधक जनतेला स्वतःचे महत्त्व पटवून देण्यास कमी पडले. आपापसातील मतभेद टाळू न शकल्याने आणि ते मतभेद जनतेसमोर जाहीरपणे आल्याने, ते काही करू शकतील यावरचा जनतेचा विश्वास उडाला. त्यामुळे ८५ वर्षांच्या शरद पवारांनी केलेल्या प्रचाराचे म्हणावे तेवढे चीज झाले नाही.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला तेरा जागा होत्या. त्या हिशेबाने  विधानसभेत ७८ अपेक्षित होत्या. शरद पवारांना ४८ आणि उद्धव ठाकरेंना ५४ मिळायला हव्या होत्या. मात्र तिघांना मिळून तीन आकडी जागाही मिळाल्या नाहीत. राज ठाकरे आणि शरद पवार हे दोन प्रमुख नेते या धक्क्यातून लवकर सावरणार नाहीत. शरद पवारांना सुध्दा आत्मपरीक्षण करता येईल की खरोखरच आपण वेगळा पक्ष स्थापन करुन समाजाचे नेमके हित कोणते साधले ? दोन्ही नेते मनस्वी आहेत. कधीही हार न मानण्याची वृत्ती, पुढे जात राहण्यात आनंद मानणारे. या दोघांचा फार मोठा अपेक्षाभंग या निवडणुकीने केला. त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल. कोणत्याही राजकीय पक्षाच्या आयुष्यात विजय आणि पराभव यात वेगळे काही नसते. म्हणजे आज विजय झाला म्हणजे उद्या पराभव असे काही नसते हे त्यांना आणि काॅंग्रेसच्या राहुल गांधींपासून ठाकरे गटाच्या संजय राऊतांपर्यंत सर्वांना माहिती करून घेणे या निकालामुळे भाग पडले आहे. आपल्या पराभवाचे नेमके कारण काय आहे याचा शोध या राजकीय नेत्यांनी घेऊन आपली निती ठरवली पाहिजे.

गेल्या अडीच वर्षांपासून महाविकास आघाडी मधल्या नेत्यांनी विशेषतः भाजपाला आणि शिंदे गटाला नको-नको ती दूषणे लावण्याचा सातत्याने केलेला प्रयत्न मतदारांनी हाणून पाडला असावा. महाविकास आघाडी मधल्या अनेक नेत्यांना पराभव पत्करावा लागला. शरद पवार ज्येष्ठ नेते असूनदेखील त्यांनी आखलेली रणनीतीसुद्धा फोल ठरली. लोकसभेच्या निकालांनंतर या आघाडीमधल्या नेत्यांनी दाखवलेला अति आत्मविश्वास नडला.

लाडकी बहीण योजनेतून महिला वर्गाला केलेली प्रत्यक्ष आर्थिक मदत, मुस्लिम अल्पसंख्याकांच्या धोक्याचा काल्पनिक बागुलबुवा आणि त्यासाठी समाजमाध्यमांचा बुध्दीचातुर्य दाखवत केलेला वापर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सक्रिय मदत ही कारणे महायुतीच्या अभूतपूर्व यशाला कारणीभूत ठरली आहेत हे कोणी नाकारू शकणार नाही. या माध्यमातून  गरीब व मध्यमवर्गीयांवर प्रभाव पाडण्यात भाजप प्रचारकांना यश आले. या तिन्ही घटकांसमोर महाविकास आघाडीचा आवाज उठू शकला नाही. उलट आघाडीतील अकाली प्रकटलेले हेवेदावे, काँग्रेसचे निष्प्रभ नेतृत्व, संविधान बचावचा महाराष्ट्र राज्यातील निरर्थक मुद्दा, गद्दारीबद्दलची उद्धव ठाकरे यांची सततची, कालबाह्य आणि भावनिक तक्रार आणि भावी आश्वासने याऐवजी खात्यात प्रत्यक्ष जमा झालेले रोख पैसे आणि पैसे देणारे मतदारांनी लक्षात ठेवले. मतदानाला भरभरून प्रतिसाद दिला. महागाई, बेरोजगारी व तोट्यातील शेती या राज्यापुढील मूळ प्रश्नांबाबत दोन्ही बाजूंकडे सांगण्यासारखे काही नव्हते.‌

लाडक्या बहिणींनी भावांना सत्तेत यायला चांगलीच मदत केली आहे याबद्दल शंका नाही. फक्त त्यासाठी तिजोरीत झालेली घट आणि अजून होत राहणारी घट कशी भरून काढायची आहे त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ओबीसींना वळविण्याची भाजपची धूर्त खेळी खूपच मदतीची ठरली.

नव्या सरकारने लाडकी बहिण योजना सुरु ठेवावी, शेतकरी कर्जमाफी, शेतीला २४ तास वीज पुरवठा, सोयाबीनला ६ हजार, कापसाला ९ हजार तर तांदुळाला १ हजार रुपये बोनस, एमएसपीपेक्षा कमी भाव मिळाला तर फरकाची रक्कम देणे, तरुणांना नोकऱ्या, भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र अशा आश्वासनांची पूर्तता करावी.

या निवडणुकीने महाराष्ट्रासमोर मोठी आव्हाने निर्माण केली आहेत. विरोधी पक्षांचा आवाज आता क्षीण असणार आहे. जनतेवररच प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका बजवण्याची जबाबदारी आली आहे.

गेल्या वीस,पंचवीस वर्षात  मध्यम वर्ग लोकहिताच्या चळवळीतून बाहेर ढकलला गेला, शहरी,निम शहरी,ग्रामीण चळवळीचे उद्दिष्ट तात्कालिक राहत आले आहे. शेतकरी चळवळ शरद जोशींच्या नंतर काही वर्षांनी संपुष्टात आली. कामगार चळवळीही संपत गेल्या. गरीबी, बेरोजगारी, नागरी प्रश्न आणि लोकसंख्येचा भस्मासूर ही कधीच न संपणारी दुखणी आहेत. त्याचे भान प्रत्येकाने ठेवून या महाराष्ट्राच्या वाटचालीचा गाडा ओढत नेला पाहिजे.

– नरसिंग कांबळे, मुख्य संपादक ‘महाराष्ट्र मिशन’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page