महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा अलर्ट!

मुंबई : कोकण, मुंबई उपनगरसह अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. वाढत्या मुसळधार पावसामुळे ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीसाठी उच्च लाटांचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्यानुसार ३.५ ते ३.८ मीटर उंच लाटा येण्याची शक्यता आहे.
उत्तर कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, दक्षिण कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात पावसाचा इशारा
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह गडगडाटी पाऊस, हलका ते मध्यम पाऊस, ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
बोटींना समुद्रात न जाण्याचा इशारा
हवामान खात्याने हा इशारा १८ जूनपासून ते १९ जूनपर्यंत दिला आहे. या दरम्यान लहान बोटींना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीजवळील पर्यटन व जलक्रीडा पूर्णत: थांबवण्याचाही इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.
पर्यटन स्थळावर जाण्यास बंदी
हवामान खात्याच्या इशा-यानुसार मुंबई उपनगरातील नरिमन पॉईंटसहित अन्य समुद्री पर्यटन स्थळावर पर्यटकांना जाण्यास बंदी घातली आहे. या भागात पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला असून चौपाटीचा परिसर रिकामा केला जात आहे.



