अजितदादा महाराष्ट्राला न मिळालेले सर्वोत्तम मुख्यमंत्री

मुुबई : विधानसभेत अजित पवार यांच्या शोकप्रस्तावावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत भावनिक शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली. दादा आपल्यात नाहीत, ही खंत मनाला चटका लावणारी आहे, असे सांगताना त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. अजितदादा हे महाराष्ट्राला न मिळालेले सर्वोत्तम मुख्यमंत्री होते, असे स्पष्ट विधान त्यांनी केले.
अजित पवारांविषयी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत भावनिक शब्दांत त्यांचे कौतुक केले. फडणवीस म्हणाले की, दादांची राजकीय कारकीर्द मोठी आणि प्रभावी होती. राजकारणात ते अजून मोठी इनिंग खेळतील, अशी अपेक्षा अनेकांना होती. मात्र जीवनाच्या प्रवासात त्यांनी पहिल्यांदाच टायमिंग चुकवले, असे भावनिक विधान त्यांनी केले. दादांचा वक्तशीरपणा सर्वपरिचित होता, त्यामुळे हे अचानक घडलेले वास्तव अधिक वेदनादायी असल्याचे त्यांनी सांगितले. याची सर्वाधिक हळहळ आपल्याला राहील, असेही ते म्हणाले.
दादांच्या काम करण्याच्या पद्धतीबाबत बोलताना फडणवीस यांनी अनेक आठवणी सांगितल्या. मंत्रालयात कुठल्याही अधिका-यांपेक्षा आधी पोहोचणारे ते नेते होते. सकाळी नऊ वाजता ते आपल्या दालनात बसलेले असायचे. वेळेचे काटेकोर पालन आणि कामातील शिस्त हे त्यांच्या स्वभावाचे मुख्य गुण होते. एखादा निर्णय त्यांना योग्य वाटला नाही तर ते फाईल थांबवून सविस्तर चर्चा करत. निर्णय घाईत न घेता विचारपूर्वक घेण्याची त्यांची सवय होती, असे त्यांनी स्पष्ट केले.
दादांच्या काही वैयक्तिक सवयींचाही फडणवीस यांनी उल्लेख केला. त्यांना दूध पिण्याची आवड होती. दादांच्या साध्या सवयी आणि स्वच्छतेकडे असलेले लक्ष त्यांना विशेष वाटायचे. ते चप्पल वापरत, पण पाय नेहमी स्वच्छ ठेवत, अशी आठवण त्यांनी सांगितली. अजितदादांचे नेतृत्व, कामातील सातत्य आणि प्रशासनातील पकड यामुळे ते वेगळे ठरले, असे फडणवीस यांनी अधोरेखित केले. मुख्यमंत्री होण्याची क्षमता असूनही ती संधी त्यांना मिळाली नाही, ही खंत त्यांनी पुन्हा व्यक्त केली. राज्याच्या राजकारणात त्यांनी निर्माण केलेला ठसा कायम राहील आणि त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्र त्यांना नेहमी लक्षात ठेवेल, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
ही खंत मनाला चटका लावणारी
यंदा दादांनी आपला १२ वा अर्थसंकल्प सादर केला असता आणि पुढील वर्षी १३ वा अर्थसंकल्प मांडून बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या विक्रमाशी बरोबरी केली असती, असे त्यांनी नमूद केले. मात्र अचानक त्यांच्या जाण्यामुळे ही परंपरा थांबली, असेही ते म्हणाले. या वेळी अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी स्वत:वर आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ख-या अर्थाने ते माझे दादाच होते
फडणवीस यांनी सांगितले की, अजितदादांसोबत त्यांचे नाते केवळ राजकीय नव्हते, तर ते अधिक वैयक्तिक आणि भावनिक होते. दादा माझ्यापेक्षा ११ वर्षांनी मोठे होते. ख-या अर्थाने ते माझे दादाच होते, असे ते म्हणाले. २०१४ नंतर दोघांमध्ये अधिक जवळीक निर्माण झाली आणि एका दशकाहून अधिक काळ परस्परांमध्ये मैत्री व सुसंवाद राहिला. सकाळी ६ वाजता कामाला सुरुवात करण्याची त्यांची सवय होती, याचा उल्लेख करत त्यांनी त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले.
स्पष्ट निर्णयक्षमता हे वैशिष्ट्य
अजित पवार हे एका पिढीचा आत्मविश्वास होते, असे सांगताना फडणवीस यांनी त्यांच्या कामकाजातील काटेकोरपणाचा विशेष उल्लेख केला. दादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही, असे ते म्हणाले. शेवटची भेटच अखेरची ठरेल, असे कधी वाटले नव्हते, ही खंत त्यांनी व्यक्त केली.
मागे-पुढे न पाहणारे नेते
कठोर निर्णय घ्यायचे असतील तर मागे-पुढे न पाहणारे नेते म्हणजे अजितदादा, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. एखादा निर्णय वादग्रस्त असला तरी तो ठामपणे मंत्रिमंडळासमोर मांडण्याची त्यांची तयारी असायची. वित्त विभागाने लाडकी बहिण योजनेचा भार अर्थसंकल्पावर मोठ्या प्रमाणात पडेल, त्यामुळे पुनर्विचार करावा, असा सल्ला दिला होता. मात्र त्या सूचनांनंतरही दादांनी ठाम भूमिका घेत तो विषय मंत्रिमंडळात आणला, याची आठवण त्यांनी करून दिली.
राजकारणात आणि प्रशासनात मोठी पोकळी
सभागृहातील वातावरण यावेळी गंभीर झाले होते. फडणवीस यांच्या शब्दांतून सहकार्याचा, जिव्हाळ्याचा आणि आदराचा सूर स्पष्टपणे जाणवत होता. अजितदादांनी घडवलेली कार्यपद्धती, अर्थसंकल्पीय परंपरा आणि निर्णयक्षम नेतृत्व ही राज्यासाठी मोठी संपत्ती होती, असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात मोठी पोकळी निर्माण झाली असून ती भरून काढणे कठीण आहे.



