लातूर जिल्ह्यातील २ अपघातांत पिता-पुत्रासह ४ जण ठार

लातूर : औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर करजखेडा (जि. धाराशिव) येथे चौकातील उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातात जीवन बसवंत पाटील (रा. अलमला, ता. औसा) यांचा जागीच मृत्यू झाला तर चेतन बुके यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात उमरगा रेतू पाटीजवळ शेतकरी व त्यांच्या मुलास भरधाव कारने उडविले. यात दोघांचाही मृत्यू झाला.
लातूरहून सोलापूर येथे नित्यानंद बुके यांना मुलगी पाहण्यासाठी चेतन माणिकराव बुके, मोहन वैजनाथ बुके, नित्यानंद मोहन बुके आणि जीवन बसवंत पाटील हे होंडा सिटी (क्र. एमएच २४ एएफ १५९९) या कारने प्रवास करत होते. ते करजखेडा चौकातील उड्डाणपुलावर आले असता बोलेरो जीप (क्र. एमएच ४५ एझेड ५४४९) चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत प्रथम वॅगनार (क्र. एमएच २५ एडब्ल्यू ४३६१) कारला पाठीमागून धडक दिली. त्यानंतर जीपने डिव्हायडर ओलांडून राँग साईडने येत होंडा सिटी कारला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात जीवन बसवंत पाटील यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला तर चेतन माणिकराव बुके, मोहन वैजनाथ बुके आणि नित्यानंद मोहन बुके हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. तसेच वॅगनार कारमधील प्रवाशांनाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, उपचारादरम्यान चेतन माणिकराव बुके यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी संगमेश्वर पाटील, आलमला यांच्या तक्रारीवरून बोलेरो जीप चालक संतोष अंकुश थोरवे (रा. पुनवर, ता. करमाळा, जि. सोलापूर) याच्या विरोधात बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.



