VIP दौऱ्यांना डिझेलची कमतरता नाही, मग जगाच्या पोशिंद्यालाच रांगेत का उभे केले? वाशीम-अकोल्यातील रणकंदनानंतर व्यवस्थेवर कडक ताशेरे!

विशेष प्रतिनिधी, महाराष्ट्र मिशन वाशीम/अकोला : देशाचा कणा आणि जगाचा पोशिंदा म्हटल्या जाणाऱ्या शेतकऱ्यावर आज इंधनाच्या एका-एका थेंबासाठी रस्त्यावर उतरण्याची आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याची अत्यंत दुर्दैवी वेळ आली आहे. वाशीम आणि अकोला जिल्ह्यात सध्या तीव्र इंधनटंचाई निर्माण झाली असून, डिझेल मिळवण्यासाठी पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांची प्रचंड झुंबड उडत आहे. या गर्दीतून आणि तणावातून अनेक पंपांवर शेतकऱ्यांमध्ये चक्क लाथाबुक्क्यांनी हाणामारी झाल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.
पेट्रोल पंपांवर रणकंदन; संयम सुटला!
गेल्या काही दिवसांपासून वाशीम आणि अकोला परिसरातील पेट्रोल पंपांवर डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी आणि ट्रॅक्टर चालवण्यासाठी डिझेल अत्यंत आवश्यक आहे. मात्र, पंपांवर साठा मर्यादित असल्याने डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना भर उन्हात तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. अशातच आधी डिझेल कोणाला मिळणार, यावरून वाद पेटत असून वाशीममधील एका पंपावर शेतकऱ्यांचे दोन गट एकमेकांशी भिडले. वाद इतका विकोपाला गेला की तिथे थेट हाणामारी सुरू झाली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तीव्रतेने व्हायरल होत असून, यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
शेतीची कामे ठप्प; अर्थचक्र धोक्यात!
ट्रॅक्टरसाठी डिझेल उपलब्ध होत नसल्याने हंगरपट्टी, नांगरणी आणि शेतीची इतर महत्त्वाची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला असताना, वेळेत कामे झाली नाहीत तर मोठे नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. “आम्हाला अन्नदाता म्हणणारी ही व्यवस्था डिझेलसारख्या मूलभूत गरजेसाठी आम्हाला भिकार्यासारखे रांगेत उभे करत आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया एका हतबल शेतकऱ्याने ‘महाराष्ट्र मिशन’शी बोलताना दिली.
प्रशासनाचा ढिसाळ कारभार की साठेबाजी?
एकीकडे प्रशासन इंधनाचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा करत असताना, प्रत्यक्षात मात्र पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक पाहायला मिळत आहेत. ही कृत्रिम टंचाई आहे की प्रशासनाचा ढिसाळ कारभार, असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे.
‘महाराष्ट्र मिशन’चा परखड सवाल: मंत्र्यांच्या गाड्यांना आणि शासकीय दौऱ्यांना कधी इंधन कमी पडत नाही, मग घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरला डिझेल का मिळत नाही? अन्नदात्याला अशा पद्धतीने रस्त्यावर आणणाऱ्या जबाबदार यंत्रणेवर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे!



