मेळघाटात संतापजनक प्रकार; आश्रमशाळेतील ३० ते ४० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा!

अमरावती : अमरावतीच्या मेळघाट परिसरातून एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. धारणी तालुक्यातील टीटंबा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील ३० ते ४० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या मेळघाट दौऱ्यावर असतानाच ही घटना घडल्यामुळे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.
नेमकी घटना कशी घडली?
टीटंबा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत सुमारे ४०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गुरुवारी (ता. २५) रात्रीचे जेवण झाल्यानंतर काही वेळातच अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना उलट्या, मळमळ आणि पोटदुखीचा तीव्र त्रास जाणवू लागला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत शाळा प्रशासनाने बाधित विद्यार्थ्यांना तातडीने धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, सध्या त्यांच्यावर डॉक्टर व आरोग्य पथकाकडून योग्य ते उपचार सुरू आहेत.
कारणांचा शोध आणि प्रशासनाची भूमिका
मिळालेल्या माहितीनुसार, या आश्रमशाळांना ‘सेंट्रल किचन’मधून जेवणाचा पुरवठा केला जातो. या माध्यमातून परिसरातील ८ ते ९ शाळांना अन्न पाठवण्यात आले होते; मात्र इतर कोणत्याही शाळेत अशा प्रकारची घटना घडली नसून, केवळ टीटंबा येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनाच त्रास झाल्याचे समोर आले आहे. विषबाधेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. एकादशीच्या दिवशी तयार केलेले उपवासाचे पदार्थ, दूषित पाणी किंवा अन्नाची गुणवत्ता खालावल्यामुळे हा प्रकार घडला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. प्रशासनाने अन्न व पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याची तयारी केली आहे.
प्रकल्प बालविकास अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व बाधित विद्यार्थ्यांवर व्यवस्थित उपचार सुरू असून कोणत्याही विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक नाही, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. असे असले तरी, आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा प्रकारच्या घटनांमुळे सेंट्रल किचनमधील अन्न सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पालकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.



