लातूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशीलतेमुळे लातूरच्या ‘त्या’ कष्टकरी शेतकरी कुटुंबाला मोठा दिलासा; अवघ्या काही तासांत मिळाली बैलजोडी आणि नुकसानभरपाई!

लातूर : वादळी पावसात वीज पडून बैल दगावल्याने, शेतातील कामे पूर्ण करण्यासाठी पत्नीलाच बैलाच्या जागी जोखडाला जुंपण्याची वेळ आलेल्या लातूर जिल्ह्यातील एका भूमिहीन शेतकऱ्याच्या मदतीला थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावून आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे या शेतकरी कुटुंबाला अवघ्या काही तासांत नवीन बैलजोडी आणि दगावलेल्या बैलाची नुकसानभरपाई मिळवून देण्यात आली आहे. यामुळे या कष्टकरी कुटुंबावर ओढावलेले मोठे संकट टळले असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील काशिनाथ गायकवाड हे भूमिहीन शेतकरी आहेत. त्यांच्याकडे असलेल्या एका बैलजोडीच्या मदतीने गायकवाड आणि त्यांच्या पत्नी हौसाबाई परिसरातील इतर शेतकऱ्यांची जमीन कसतात. नांगरणी, पेरणी, वखरणी अशी मिळेल ती कामे करून या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, शुक्रवारी (५ जून) झालेल्या वादळी पावसात वीज पडून त्यांच्या जोडीतील एका बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ऐन पेरणीच्या तोंडावर उदरनिर्वाहाचे साधन हिरावले गेल्याने आणि हातात घेतलेली कामे पूर्ण करायची असल्याने, हताश झालेल्या काशिनाथ गायकवाड यांच्यावर पत्नी हौसाबाई यांनाच बैलाच्या जागी जोखडाला जुंपण्याची वेळ आली होती.

मुख्यमंत्र्यांची तात्काळ दखल आणि प्रशासनाची गती

या अत्यंत वेदनादायी प्रसंगाची वृत्त माध्यमांद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचताच, त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मुख्यमंत्री सचिवालयाला कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांनी लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्याशी संपर्क साधून महसूलसह सर्व यंत्रणांना गायकवाड कुटुंबाला तत्काळ मदत करण्याचे आदेश दिले.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनासह तहसील कार्यालय, पशुसंवर्धन आणि कृषी विभागाची सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आणि अवघ्या काही तासांतच गायकवाड यांच्या घरापर्यंत पोहोचली.

अवघ्या काही तासांत मदत सुपूर्द

प्रशासनाने दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे काशिनाथ गायकवाड यांना दगावलेल्या बैलाच्या नुकसानभरपाईची रक्कम आणि नवीन बैल तात्काळ सुपूर्द करण्यात आले. यामुळे आता हौसाबाई यांना बैलाच्या जागी जोखडाला उभे राहावे लागणार नाही. मुख्यमंत्र्यांचे निर्देश आणि जिल्हा प्रशासनाने दाखवलेल्या या संवेदनशीलतेमुळे गायकवाड कुटुंबाने प्रशासनाचे आणि मुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार मानले आहेत. ऐन संकटाच्या काळात सरकारने दाखवलेल्या या तत्परतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page