नागपुरात ३०० किलोबनावट पनीर जप्त

नागपूर : नागपूर येथे शुद्ध पनीरच्या नावे अनलॉग पनीरची विक्री केली जात असल्याची माहिती ‘एफडीए’ला मिळाली. त्यानुसार विभागाच्या पथकाने शनिवारी दारोडकर चौक परिसरातील वर्धमान खवा भंडार येथे छापा टाकला. त्यावेळी तिथे २३१ किलो ‘अनलॉग पनीर’ तसेच पोत्यांमध्ये ८२ किलो खवा अस्वच्छ स्थितीत आढळला. त्यानंतर पनीरचा साठा ताबडतोब नष्ट करण्यात आल्याचे एफडीएचे सहायक आयुक्त अभय देशपांडे यांनी सांगितले.
सध्या सणासुदीच्या काळामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच प्रिय असलेले आणि कुठल्याही भाजीबरोबर सहज एकरूप होऊन जाणारे पनीर आणि सणासुदीच्या दिवसांत पेढा, बर्फी किंवा तत्सम गोड पदार्थांमधील अविभाज्य घटक असलेला खवा या दोन्ही वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ असू शकते.
काही दिवसांपूर्वी मस्कासाथ येथून २ लाख २७ हजार रुपयांची ७७८ किलो सोप जप्त करण्यात आली होती. लेबल नियमानुसार नसणे आणि भेसळीच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. सणासुदीचा काळ सुरू असल्याने एफडीएने विशेष मोहीम हाती घेतली आहे. भेसळीचा संशय असेल तर त्यांनी तत्काळ एफडीएशी संपर्क साधावा, असे आवाहन देशपांडे यांनी केले.
‘अनलॉग पनीर’ म्हणजे काय?
अनलॉग पनीर हे पारंपरिक पनीरची नक्कल असलेले एक कृत्रिम उत्पादन आहे. हे पनीर ख-या दुधाऐवजी तर वनस्पती तेल, स्टार्च आणि दुधाच्या घन पदार्थांपासून बनवले जाते. हे पनीर दिसायला आणि चवीला ख-या पनीरसारखेच असते. परंतु, त्यातील पौष्टिक गुणधर्मांमध्ये फरक असतो. त्यात दुग्धजन्य प्रोटीनऐवजी वनस्पतिजन्य प्रोटीन वापरले जाते. अनलॉग पनीर निर्मितासाठी रितसर परवाना घ्यावा लागतो. ते खुले विकता येत नाही.



