मुंबई

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी एकसंध; अंबादास दानवेंना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई : आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सविस्तर व सकारात्मक चर्चा पार पडली असून, या सर्व निवडणुकांमध्ये आघाडी एकसंघपणे लढणार असल्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार तथा माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असून काँग्रेस पक्षाचा त्यांना ठाम पाठिंबा आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी गांधी भवन येथे महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे, शिवसेना नेते माजी मंत्री अनिल परब, खा. अनिल देसाई, आ. मिलिंद नार्वेकर, उमेदवार अंबादास दानवे यांची सविस्तर चर्चा झाली. दूरध्वनीवरून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशीही चर्चा झाली. या बैठकीत विधान परिषद निवडणुकीसह आगामी राज्यसभा विधानपरिषद निवडणुका तसेच संविधान लोकशाही विरोधी भाजपा महायुती विरोधातील आगामी रणनितीबाबत सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, २०१९ साली भारतीय जनता पक्षाने अवलंबलेली लोकशाहीविरोधी धोरणे, सत्तेचा गैरवापर, दडपशाही आणि संस्थांचा दुरुपयोग या पार्श्वभूमीवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन प्रमुख पक्ष एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना झाली. या आघाडीने ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’च्या माध्यमातून भारतीय संविधानाचे संरक्षण, महाराष्ट्रधर्माचे पालन, तसेच राज्यातील पुरोगामी, समावेशक आणि प्रबोधनपर परंपरेचे जतन व संवर्धन करण्याची स्पष्ट बांधिलकी व्यक्त केली होती. महाराष्ट्राची सामाजिक-राजकीय परंपरा ही शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारसरणीवर आधारित असून, त्या पुरोगामी मूल्यांना बाधा पोहोचवणाऱ्या कोणत्याही प्रतिगामी शक्तींविरोधात महाविकास आघाडी सातत्याने लढत राहिली आहे आणि लढत राहील.

भाजपने संविधानाच्या दहाव्या अनुसूचीची पायमल्ली करत असंवैधानिक मार्गाने सत्तांतर घडवून आणले. त्यामुळे ५० खोके, एकदम ओके सारख्या घोषणांनी राज्याच्या राजकारणात पैशाचे व सत्तेच्या गैरवापराचे गलिच्छ राजकारण पुढे आले. २०२४ च्या निवडणुकांमध्येही पैसा व प्रशासनाचा गैरवापर झाल्याचे त्यांनी सांगितले. तरीही लोकशाही मूल्यांचा आदर राखत महाविकास आघाडीने निवडणुकीचे निकाल स्वीकारले, असे त्यांनी स्पष्ट केले.

देशपातळीवर भाजपविरोधी विचारधारा एकत्र आणण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीची निर्मिती झाली असून, काँग्रेस नेतृत्वाखालील ही आघाडी लोकशाही, संविधान आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. महाराष्ट्रातही महाविकास आघाडी आणि राष्ट्रीय स्तरावरील इंडिया आघाडी एकत्रितपणे २०२९ च्या निवडणुकांकडे वाटचाल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः उमेदवारी न स्वीकारता अंबादास दानवे यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या वैयक्तिक प्रामाणिकतेचा दाखला असल्याचे नमूद करत सपकाळ म्हणाले की, “हा निर्णय महाविकास आघाडीचा सामूहिक निर्णय मानून काँग्रेसने त्याला पूर्ण समर्थन दिले आहे. तसेच, या प्रक्रियेत अधिक आधी समन्वय झाला असता तर अधिक चांगले झाले असते, असे नमूद करत हा कोणताही वाद नसून आघाडीतील संवाद प्रक्रियेचा एक भाग आहे, असे स्पष्ट केले.

राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला संधी देण्यात आली होती, तर सध्याच्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेना (उद्धव ठाकरे गट)ला प्रतिनिधित्व मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात काँग्रेस पक्षाला प्राधान्याने प्रतिनिधित्व देण्यात येईल, याबाबत तिन्ही पक्षांमध्ये सकारात्मक व सुस्पष्ट चर्चा झाली आहे. आज झालेला निर्णय ही कोणतीही माघार नसून परस्पर सामंजस्यातून घेतलेला निर्णय आहे. आघाडीतील प्रत्येक घटक पक्षाचा सन्मान राखत पुढील राजकीय रणनीती ठरवली जाईल,” असे त्यांनी अधोरेखित केले. महाविकास आघाडीतील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी घटक पक्षांमध्ये सातत्याने संवाद वाढवण्याची गरज असल्याचेही सपकाळ यांनी नमूद केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत किंवा राज्य व राष्ट्रीय पातळीवरील निवडणुकांवर सर्व स्तरांवर महाविकास आघाडी एकत्रितपणे रणनीती आखणार आहे. भाजप हा राष्ट्रीय पातळीवरील आमचा प्रमुख विरोधी पक्ष असून, त्यांच्या संविधानविरोधी धोरणांविरुद्ध महाविकास आघाडीचा संघर्ष भविष्यातही कायम राहील. त्याचबरोबर राज्यातील महायुतीतील घटक पक्ष शिंदे गट व अजित पवार गट यांच्याविरुद्धही राजकीय लढा सुरूच राहील, असा निर्धार सपकाळ यांच्यासह महा विकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page