भाजपला स्वतःची मुले मोठी करण्याचा सल्ला; शर्मिला ठाकरेंचा खणखणीत टोला

मुंबई: इतर राजकीय पक्षांचे नेते फोडण्यापेक्षा भाजपने स्वतःची मुले मोठी करावीत, असा खणखणीत टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी लगावला आहे. ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे पक्ष फोडल्याचा आरोप करत त्यांनी भाजप, आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेतील कार्यकर्त्यांच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “दुसऱ्यांची मुले चोरण्यापेक्षा तुमच्या संघटनेतील मुलांना संधी द्या, त्यांनी आयुष्यभर फक्त दुसऱ्यांच्या सतरंज्या उचलायच्या का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
एका कार्यक्रमात बोलताना शर्मिला ठाकरे यांनी महागाई आणि सरकारी धोरणांवर जोरदार टीका केली. पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या पुढे गेले असताना भाजप का गप्प आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. १२ वर्षांपूर्वी याच मुद्द्यांवर आंदोलन करणारे नेते आता का बोलत नाहीत, असा सवाल करत त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले. तसेच, विमानतळ उभारणीच्या नावाखाली होणाऱ्या खर्चावरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. हजारो कोटी रुपये खर्च करून विमानतळे बांधायची आणि नंतर ती बंद करून टाकायची, हा काय प्रकार आहे? असा सवाल करत त्यांनी चिपी विमानतळाच्या उदाहरणावरून सरकारी नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
याशिवाय, पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. शेतकरी हरित लवादाकडे दाद मागत आहेत, मात्र सर्वोच्च न्यायालयापासून सर्व संस्था सरकारवर अवलंबून असल्याने कुठेही न्याय मिळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पर्यावरणाचा मुद्दा मांडताना, सरकारकडून विकासाच्या नावाखाली शेकडो वर्षे जुनी झाडे तोडली जात असून, त्यामुळे वाढलेला उन्हाळा आणि पावसाचे अनिश्चित चक्र याला सरकार जबाबदार असल्याचे त्या म्हणाल्या. सरकार केवळ देशाची नव्हे, तर देशाच्या अर्थव्यवस्थेचीही वाट लावत आहे, अशी जळजळीत टीका करत शर्मिला ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.



